लखोजीराजे जाधव समाधी
प्रकार : समाधीस्थळ
जिल्हा : बुलढाणा
महाराष्ट्रात शिवपुर्व काळातील अथवा शिवकाळातील सरदारांच्या मोठया समाधी वास्तु फार कमी प्रमाणात दिसुन येतात. समाधी म्हणुन जे काही दिसते ते म्हणजे विरगळ, एखादा चौथरा तर काही ठिकाणी चौथऱ्यावर असलेले वृंदावन. शिल्पकारीने समृद्ध अशी सुंदर समाधी सहसा कोठे दिसुन येत नाही पण याला अपवाद आहे ती विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा येथे असलेली राजे लखुजी जाधवराव यांची समाधी. निजामशाही व आदिलशाही काळात स्वतःच्या कर्तुत्वावर व पराक्रमावर काही मराठा घराणी उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव हे एक प्रमुख घराणे होते. सोळाव्या शतकात लखुजी जाधवाना सिंदखेडची देशमुखी मिळाली व सिंदखेडच्या भरभराटीला सुरवात झाली. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई हि लखुजी जाधवरावांची कन्या. स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांचे आजोळ असलेलेले हे ठिकाण राजे लखोजीराव जाधव ह्यांच्या वतंनदारीतील मुख्य ठिकाण होते.
...
२५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजीराव जाधवराव त्यांचे दोन पुत्र अचलोजीराव व राघोजी आणी नातु यशवंतराव ( दत्ताजीराव यांचे पुत्र) यांचा निजामशहाने देवगिरीच्या दरबारात विश्वासघाताने खुन केला. या घटनेनंतर लखोजीराजे यांचे बंधु राजे भुतजी /जगदेवराव यानी इ.स.१६३० ते इ.स.१६४० दरम्यान त्यांच्या समाधीचे बांधकाम केले. स्मारक उभारणीसाठी दहा वर्ष लागली. यावेळी राजे लखोजी यांचा पुतळा देखील घडवला पण दुर्देवाने आज हा पुतळा गहाळ झालेला आहे. सिंदखेड गावाबाहेर पश्चिमेस जाधवरावांची स्मशानभुमी होती. येथे केवळ राजे लखुजी जाधवराव यांची समाधी नसुन जाधवराव राजपरिवारातील अनेकांच्या समाधी आहेत. येथे असलेल्या मुख्य समाधीचे बांधकाम उत्तर हिंदुस्थानातील इमारतींच्या शैलीत असुन या इमारतीत लखुजीराजे,दत्ताजीराव,अचलोजी,रघोजी व यशवंतराव यांच्या पाच समाधी आहेत तर इमारतीच्या आवारात लहानमोठया नऊ समाधी आहेत. यातील सहा समाधी सुस्थितीत असून तीन समाधींचे केवळ चौथरे शिल्लक आहेत. या समाधी शेजारी काही कोरीव शिल्प पडलेली आहेत. चौकोनी आकाराच्या या वास्तुचे संपुर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले असून त्यावरील घुमटाचे बांधकाम मात्र विटांनी करून त्याला चुन्याचा गिलावा दिलेला आहे. घडीव दगडांच्या चौथऱ्यावर उभी केलेली हि वास्तु काही किरकोळ तुटफुट वगळता आजही सुस्थितीत आहे. मुख्य इमारतीची आकार ५० x ५० फुट लांबरुंद असून उंची साधारण ४५ फुट आहे. या संपुर्ण इमारतीचे छत २४ कमानीवर तोललेले आहे. इमारतीचे बाह्यांग कमळाची फुले, पानाफुलांची वेलबुट्टी, नक्षीदार कोनाडे व जाळी, व्याघ्रशिल्पे तसेच अनेक प्रकारच्या भौमितीय आकृत्या काढुन सजवलेले आहे. इमारतीचे मुख्य दरवाजा पुर्वाभिमुख असुन त्याच्या द्वारशाखेवर अनेक वादक तसेच इतर काही मुर्ती कोरलेल्या आहेत. दरवाजाच्या वरील बाजुस दोन कीर्तिमुख असून या दोन्ही किर्तीमुखा शेजारी व्यालजोडी कोरलेली आहे. याशिवाय या वास्तूला उत्तर व दक्षिण दिशेला दोन लहान दरवाजे आहेत. दरवाजाशेजारी हत्तीवर आरुढ झालेले दोन सिंह कोरलेले असुन छताकडील बाजुस देखील दोन सिंह कोरलेले आहेत. दरवाजाच्या ललाट बिंबावर गणेशमुर्ती कोरलेली असून उंबरठ्याच्या दोन्ही बाजुस मुर्ती कोरलेल्या आहेत. दरवाजाच्या दोन्ही बाजुस मराठी शिलालेख कोरलेले असुन झीज झाल्याने आज हे शिलालेख वाचता येत नाही पण त्याचे आधीच वाचन झालेले आहे. यातील डावीकडील शिलालेखाचे वाचन याप्रमाणे सींदखेडचे देशमुख भानवसे वीटोजी सौ अरधांगी ठाकराईराणी त्यांचे पोटी जाधवराव लुकजी महाराज अरधांगी गिरिजाईराणी त्यांचे पोटी पुत्र दत्ताजी व अचलाजी व राघोजीराजे व जाधवराव लखुजी व पुत्र दत्ताजी त्यांचे पोटी येसवंतराजे व लिंबाजी. उजवीकडील शिलालेखाचे वाचन याप्रमाणे सींदखेडचे देशमुख भानवसे वीटोजी त्यांचे अरधांगी ठाकराईरानी त्यांचे सुपुत्र लखुजी महा. हे दोन्ही शिलालेख अर्धवट कोरलेले वाटतात. मुख्य दरवाजाने आत प्रवेश केल्यावर समोरच १२ x १२ फुट आकाराची राजे लखुजी जाधवराव यांची समाधी आहे. या समाधीच्या बाहेर व आतील बाजुस मोठया प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. एखादया लहान मंदिराप्रमाणे या समाधीची रचना असुन तिचे सभामंडप व गर्भगृह असे दोन भाग आहेत. सभामंडपाला एक लहान खिडकी असून आत शिवलिंग स्थापन केलेले आहे. येथील गर्भगृहात सिंहासनावर बसलेला राजे लखुजी यांचा पुतळा होता जो येथुन गहाळ झाला आहे. दरवाजाच्या डावीकडे दत्ताजीराजे यांची समाधी असून उजवीकडे यशवंतराव यांची समाधी आहे. इमारतीच्या मागील भागात अनुक्रमे अचलोजीराव व रघोजीराव यांच्या समाधी आहेत. या सर्व समाधींच्या आत शिवलिंगाची स्थापना केलेली असून माथ्यावर घुमट आहे. एका इमारतीत मध्यभागी मुख्य समाधी व चार टोकाला चार अशा एकुण पाच समाधी बांधून त्यांना मंदिराच्या पंचायतनाचे स्वरूप दिलेले आहे. या इमारतीत भग्न झालेल्या काही कोरीव मुर्ती पहायला मिळतात. मुख्य दरवाजाच्या उजवीकडे इमारतीच्या छतावर जाण्यासाठी लहान जिना असुन त्यातुन वर गेल्यावर प्रशस्त गच्ची व मधोमध घुमटाचा कळस पाहायला मिळतो. या ठिकाणी आपले समाधी दर्शन पुर्ण होते. सिंदखेडराजा गावात राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीबरोबर, सिंदखेडगढी, काळा कोट , रंगमहाल , निळकंठेश्वर मंदिर, सजना बारव, रामेश्वर मंदिर , पुतळा बारव , चांदनी तलाव आणि मोती तलाव या सारख्या अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत. सिंदखेडराजा शहर बुलढाणा शहरापासुन ८० कि.मी.अंतरावर तर जालना शहरापासुन केवळ ३० कि.मी. अंतरावर आहे.
© Suresh Nimbalkar