रुपापेठ

प्रकार : एकांडा बुरुज

जिल्हा : चंद्रपुर

श्रेणी : सोपी

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याची भटकंती करताना आपल्याला मोठ्या प्रमाणात पोर्तुगीजांनी निर्माण केलेली एकांडा बुरुजांची साखळी पहायला मिळते. त्यामुळे माझा असा समज झाला होता कि एकांडा बुरुज हि पोर्तुगीजांनी संरक्षणाच्या दृष्टीने निर्माण केलेली साखळी हि त्यांचीच युद्धशास्त्रातील देणगी आहे. पण चंद्रपूर जिल्ह्याची भटकंती करताना मला चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अशी एक दोन नव्हे तर चनई-विहीरगाव-रुपापेठ-दुर्गाडी अशी चक्क चार बुरुजांची साखळी पाहायला मिळाली आणि एकांडा बुरुज हि पोर्तुगीजांनी देणगी आहे हा माझा समज खोटा ठरला. या चार बुरुजापैकी सर्वात जुना एकांडा बुरुज म्हणुन रुपापेठ येथील बुरुजाचा उल्लेख करता येईल. नावातच पेठ म्हणजे बाजारपेठ असलेल्या या पेठेच्या रक्षणासाठी या बुरुजाची बांधणी करण्यात आली असावी. आज रुपापेठ गाव त्याच्या मूळ जागेवरून स्थलांतरित होऊन काहीशा दूर अंतरावर वसले असले तरी रुपापेठ बुरुजाच्या आसपास असलेल्या वस्तीच्या खाणाखुणा आजही कायम आहेत. आजचे रुपापेठ गाव चंद्रपूर जिल्ह्यापासून ७० कि.मी. अंतरावर तर कोरपना या तालुक्याच्या ठिकाणाहुन २० कि.मी. अंतरावर आहे. ... कोरपना-अदिलाबाद महामार्गापासुन हे गाव फक्त २ कि.मी.आत आहे. सध्या रुपापेठ बुरुज एका माळावर असुन त्याच्या आसपास कोणतीच वस्ती नाही त्यामुळे सर्वप्रथम आपण रुपापेठ गावात जावे व तेथुन कोणाला तरी सोवत घेऊन बुरुजाकडे यावे. गावापासुन बुरुज फक्त १० मिनिटाच्या अंतरावर असला तरी बुरुजाकडे जाणाऱ्या वाटेला असंख्य पायवाटा असल्याने तेथे भरकटण्याची दाट शक्यता आहे. गोलाकार आकाराचा हा बुरुज साधारण ४० फुट उंच असुन बुरुजाच्या बांधकामात लहान चपट्या दगडांचा वापर केलेला दिसून येतो. बुरुजाचे एकुण बांधकाम पहाता हा बुरुज गोंड राजांच्या काळात बांधला गेला असावा असे वाटते. बुरुजाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असुन त्यावर मोठमोठी झाडे वाढलेली आहेत. या झाडांच्या मुळांनी बुरुजाचे प्रवेशद्वार झाकोळलेले असुन त्याच्या जीर्ण अवस्थेमुळे त्यावर चढणे धोकादायक आहे. बुरुजाचे प्रवेशद्वार बाहेरून दिसत नसले तरी ते विहीरगाव बुरुजाप्रमाणे जमिनीपासुन काही उंचावर असावे. बुरुजाच्या पडझडीमुळे त्याचा आतील भाग म्हणजे कोठार,खोली, अंतरगत जिना हे देखील गाडले गेले असावेत. संपुर्ण बुरुज पहाण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. चंद्रपूर जिल्ह्याची भटकंती करताना खाजगी वाहन सोबत असल्यास चनई-विहीरगाव-रुपापेठ-दुर्गाडी अशी चार दुर्गस्थाने अर्ध्या दिवसात पाहुन होतात. गोंड राजांच्या काळात काही ठिकाणी प्रशासकीय कामासाठी गढी तर काही ठिकाणी गावाच्या-शहराच्या रक्षणासाठी एकांड्या बुरुजाची बांधणी देखील करण्यात आली. रुपापेठ बुरुजाची बांधणी देखील याच कारणाकरता करण्यात आली असावी. स्थानिकात इतिहासाबद्दल पुर्णपणे अज्ञान असल्याने या बुरुजाचा इतिहास अबोल आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!