रूपगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : तापी
उंची : १६७० फुट
श्रेणी : मध्यम
महाराष्ट्र गुजरात सीमेवरील डांग भागात सोनगड व रुपगड हे दोन मराठमोळे किल्ले आहेत. यातील सोनगड किल्ला शहरात असुन वाहतुकीची सोय असल्याने बऱ्यापैकी प्रचलित आहे याउलट रुपगड किल्ला पुर्णा अभयारण्यातील घनदाट जंगलात असल्याने पुर्णपणे अपरीचीत आहे. रुपगड किल्ल्यावर जाण्यासाठी सुरत-बारडोली-व्यारा-सोनगड असा गाडीमार्ग असुन हे अंतर ८८ कि.मी.आहे. बर्डीपाडा व वाडीरुपगड हि किल्ल्याच्या पायथ्याची गावे सोनगडपासुन २५ कि.नी.अंतरावर आहेत. वाडीरुपगड येथुन चढाई सुरवात केल्यास पायथ्यापासुन संपुर्ण गड चढुन यावा लागतो. याउलट बर्डीपाडामार्गे गेल्यास बर्डीपाडा येथुन कालीबेल येथे जाणाऱ्या रस्त्याने ३.५ कि.मी. अंतर पार करून आपण किल्ल्याखालील डोंगराच्या खिंडीत पोहोचतो. या रस्त्याने आपण किल्ल्याचा जवळपास अर्धा चढ चढुन येतो. ओळखीची खुण म्हणजे या खिंडीत देवीची लहान घुमटी असुन पार बांधलेले आंब्याचे मोठे झाड आहे. स्थानिक रिक्षाचालकांना हे ठिकाण परिचित आहे. येथे रस्त्याच्या उजवीकडील मळलेल्या वाटेने गडाकडे निघाल्यावर वाटेच्या सुरवातीस बऱ्यापैकी तटबंदी शिल्लक असलेला गडमाथा नजरेस पडतो.
...
या वाटेने अर्ध्या तासात आपण गडाच्या पश्चिमेकडे उतरलेल्या सोंडेजवळ व तेथुन समोरचा गोलाकार बुरुज नजरेत ठेवत नंतर त्याला डावी मारत १५ मिनिटात गडमाथ्यावर पोहोचतो. या वाटेने तुटलेल्या तटबंदीतुन आपला गडावर प्रवेश होतो. साधारण त्रिकोणी आकार असलेला गडमाथा समुद्रसपाटीपासुन १६७० फुट उंचावर असुन ३.५ एकरवर पसरलेला आहे. गडाच्या दक्षिण दिशेला तुटलेला कडा असल्याने नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. त्यामुळे गडाची तटबंदी हि पश्चिम व उत्तर दिशेला दिसुन येते. गडात प्रवेश केल्यावर सोंडेवरील बुरुज पाहुन डावीकडील तटाच्या काठाने गडफेरी सुरु करावी. या वाटेने गडाच्या दक्षिणोत्तर टोकावर जाईपर्यंत कोणतेच अवशेष दिसुन येत नाही. येथुन उजवीकडे वळल्यावर तटबंदीजवळ कातळात खोदलेला ४० x ५० फुट आकाराचा आयताकृती तलाव पहायला मिळतो. या तलावात उतरण्यासाठी दोन बाजुना पायऱ्या कोरलेल्या आहेत. तलावाच्या वरील बाजुस एक वाड्याचा चौथरा असुन यावर आता ध्वजस्तंभ बांधला आहे. येथुन सुरु होणारी किल्ल्याची तटबंदी आपण प्रवेश केला त्या ठिकाणापर्यंत आजही शिल्लक आहे. ओबडधोबड दगड वापरून चुन्यात बांधलेल्या या तटबंदीत लहानमोठे १० बुरुज दिसुन येतात. यातील तीन बुरुजाच्या आतील भागात पाण्याची टाकी असुन दोन टाकी साधारण १० फुट खोल तर तिसऱ्या बुरुजाला लागुन असलेले चौकोनी आकाराचे टाके चांगलेच मोठे असुन साधारण २० फुट खोल आहे. अशा प्रकारची एक वेगळीच रचना या किल्ल्यावर दिसुन येते. येथुन थोडे पुढे आल्यावर कधीकाळी दोन बुरुजात असलेला पण आता पुर्णपणे नष्ट झालेला गडाच्या दरवाजाचा भाग पहायला मिळतो. या दरवाजाच्या समोरील बाजुस एक लहान कातळ उंचवटा असुन दरवाजातील पायऱ्या उतरून त्यावर चढता येते. किल्ल्याचा दरवाजा बाहेरून दिसु नये यासाठी हा कातळ तसाच ठेऊन त्यावर कधीकाळी पहारा असावा. दरवाजा व कातळटप्पा यामध्ये उतरल्यावर डाव्या बाजुस कड्यालगत एक पायवाट गेली आहे. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर कातळात कोरलेले लहान खांब टाके व त्यापुढे काही अंतरावर एक कपार आहे. या कपारीत पाण्याचा जिवंत झरा आहे. येथुन मागे फिरावे व दरवाजा चढुन आपली पुढील गडफेरी सुरु ठेवावी. या भागात असलेल्या तटाची उंची ८-१० फुट असुन काही ठिकाणी तटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. किल्ल्याच्या तटावरून फेरी मारताना गिरा नदीच्या खोऱ्यात असलेले घनदाट जंगल तसेच खुप दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. रुपगड किल्ल्याचा इतिहास सुरु होतो तो पेशवेकाळापासुन. शाहू महाराजांचे सरदार खंडेराव दाभाडे यासोबत पिलाजीराव गायकवाड असत. शाहू महाराजांनी त्यांना सेना सरनोबत ही पदवी देऊन पेशव्यांच्या दिमतीस दिले व त्यावेळच्या खानदेशातील डांग भागात पाठविलें. सुरत बंदर व खानदेशातील बऱ्हाणपूर यांना जोडणारा मध्ययुगीन व्यापारीमार्ग घनदाट जंगल असलेल्या या डांग प्रांतातुन जात असे. शिवाजी महाराजांनी देखील सुरतेची लूट याच मार्गाने स्वराज्यात नेल्याचे काही इतिहासकार मानतात. पिलाजीरावांनी येथील भिल्ल आदिवासी लोकांना सोबत घेऊन १७२१ मध्ये सोनगड व रूपगड या किल्ल्यांची निर्मिती केली. रुपगड पासुन जवळच असलेला सोनगड किल्ला हि त्यांनी आपली राजधानी बनवली. पण कालांतराने त्यांचा पुत्र दमाजीराव गायकवाड याने राज्यकारभाराच्या सोयीसाठी आपली राजधानी बडोदा येथे स्थलांतरित केली.
© Suresh Nimbalkar