रिवा बुरुज

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : मुंबई

उंची : ८० फुट

श्रेणी : सोपी

मध्य रेल्वेच्या सायन स्थानकावर उतरुन पूर्वेकडील डाव्या हाताच्या फुटपाथने चालत गेल्यावर आपण शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ पोहोचतो. ह्या परिसरात टेकडीच्या उतारावर आयुर्वेदिक वनस्पतींची बाग केलेली आहे. येथे थोडे पुढे गेल्यावर आयुर्वेद महाविद्यालयाच्या वनौषधी बागेचे फाटक लागते त्याच्यातूनच आपण रीवा किल्ल्याला जातो. या टेहेळणीच्या बुरुजाकडे जाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे सायन वरून चुनाभट्टीकडे जाण्याकडे जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या उजव्या बाजूला एक तळे आहे व या तळ्यासमोरच रस्त्याच्या दुसऱ्या बाजुने बुरुजाकडे जाणाऱ्या वाटेची सुरवात होते. या मार्गावरुन जाताना टेकडीच्या पायथ्याशी एक जुनाट दरवाजा लागतो. हा दरवाजा अगदी पोर्तुगीज पद्धतीशी मिळताजुळता आहे. हा दरवाजा ज्या भिंतीत आहे ती भिंत विटांची असली तरी तटबंदीसारखी वाटते. हा दरवाजा ओलांडून आत गेल्यावर काही पायऱ्या चढून वर गेल्यानंतर डाव्या बाजूस काही घरे लागतात. ... थोडे पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला वर जाणाऱ्या घडीव पायऱ्यांची वाट आहे. या पायऱ्यांना दोन्ही बाजूंनी कठडे आहेत. हे कठडे मुंबईतील इतर अन्य ब्रिटिश किल्ल्यातील पायऱ्यांच्या कठड्यांसारखे आहेत. या पायऱ्या चढून गेल्यावर एक सपाट भाग लागतो व त्यापलीकडे टेकडीचा उंच भाग आहे. या सपाट भागातून आधी वर्णन केलेल्या पायवाटेकडे जाता येते. ह्या बागेतच टेकडीच्या माथ्यावर असलेला रिवा किल्ल्याचा एकमेव अवशेष म्हणजे काळ्या पाषाणात उभा असलेला टेहेळणी बुरुजच काय तो शिल्लक आहे. आसपासच्या स्थितीची व बुरुजाची पाहणी केली तर हा बुरुज कोणत्याही तटाला जोडून नव्हता हे अगदी सहजपणे लक्षात येते म्हणूनच या बुरुजाला टेहेळणीचा बुरुज असे संबोधले जाते. किल्ल्याच्या इतर वास्तुचा केवळ अंदाजच बांधावा लागतो. टेकडीच्या पायथ्याजवळ वस्ती व आयुर्वेदिक महाविद्यालय इमारत आहे पण टेकडीच्या मध्यापासून माथ्यापर्यंत झाडेझुडुपे वाढलेली आहेत. खुद्द टेहेळणी बुरुजाजवळच एक मोठे झाड वाढलेले आहे. त्यामुळे या बुरुजाची नीटपणे पाहणीही करता येत नाही. जवळ जवळ १० फुट उंचीचा गोलाकार असा हा बुरुज असुन त्याच्यावर चढण्यासाठी काहीही व्यवस्था नाही. पुर्वी शिडी किवा दोरी लावुनच वर चढावे लागत होते पण आता थोडेसे प्रस्तरारोहण करून बुरुजाच्या माथ्यावर जाता येते. पुर्णपणे भरीव असा हा दगडी बुरुज असुन ह्या बुरुजाचा पहारेचौकी सारखा उपयोग होत असावा. किल्ल्याच्या या सर्वोच्च भागातून आसपासच्या परिसराचे अगदी माहिम पर्यंतचे विहंगम दृश्य दिसते. माहीमच्या खाडीमुळे मुंबई बेटे मुख्य जमिनीपासून व साष्टी बेटांपासून वेगळी झाली होती. त्या काळात माहीमच्या खाडीतून व्यापार चालत असे. तसेच साष्टी बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात होते. १६६५ साली मुंबई बेट ब्रिटिशांच्या ताब्यात आले. त्यामुळे माहीमच्या खाडीतून चालणाऱ्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी व उत्तरेकडून होणाऱ्या पोर्तुगिज व मराठ्यांच्या संभाव्य हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इंग्रज अधिकारी जेरॉल्ड ऑगियरने इ.स. १६७२ मध्ये हा किल्ला बांधला. इ.स. १६७२ साली जंजिऱ्याच्या सिद्दीने मुंबईवर केलेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी जे नविन किल्ले बांधले त्यात सायनच्या टेकडीवर असणाऱ्या रिवा किल्ल्याचा समावेश होतो. १७३९ साली मराठ्यांनी साष्टी जिंकल्यानंतर मराठ्यांची सरहद्द मुंबईला भिडली. त्यावेळी सरहद्दीच्या संरक्षणाची जबाबदारी माहीम, काळा किल्ला, रीवा, शीव व शिवडी या किल्ल्यांवर पडली. नंतरच्या काळात मुंबईवर कोणतेही आक्रमण झाले नाही उलट ब्रिटिश साम्राज्यात भर पडत गेली. १९व्या शतकात संपुर्ण भारतभर ब्रिटिश सत्ता आली. या काळात विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे युद्धतंत्र पूर्णत: बदलून गेले व किल्ल्यांचे संरक्षण म्हणून असलेले महत्त्व नष्ट झाले. परिणामत: काळाच्या ओघात किल्ल्याची पडझड होऊन किल्ला जवळपास नष्ट झाला आहे. बुरुजाच्या माथ्यावरून अगदी माहिम पर्यंतचा परिसर ठळकपणे दिसून येतो. हे पाहिल्यानंतर टेहेळणीच्या व संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्याची उपयुक्तता लक्षात येते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!