रावेर

प्रकार : गढी

जिल्हा : जळगाव

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका संपुर्ण भारतात केळीसाठी प्रसिद्ध आहे. जळगावची केळी म्हणजे रावेर तालुका हे समीकरणच आहे. माझ्यासारख्या भटक्याची या तालुक्याच्या शहराशी नाळ जुळून आली ते येथे असलेल्या रावेर किल्ल्याच्या अवशेषांमुळे. मुळात रावेर येथे किल्ला आहे हे बहुतांशी दुर्गप्रेमीना माहित नाही पण यापेक्षा खेदाची गोष्ट म्हणजे रावेर येथील किल्ला किल्ल्याशेजारी रहाणाऱ्या लोकांना देखील माहित नाही. चला तर आठवणीतुन मातीमोल झालेल्या या किल्ल्याची डोळसपणे भटकंती करुया. रावेर हे तालुक्याचे शहर जळगाव जिल्हयापासुन ८० कि.मी. अंतरावर असुन नाशिक-आग्रा महामार्गापासून १५८ कि.मी.अंतरावर आहे. रावेर हे मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील स्थानक असल्याने मुंबई -पुणे येथुन ट्रेनने देखील येथे जाता येते. रावेर शहरात असलेला हा किल्ला रावेर -रसलपूर मार्गावर नदीकाठी असलेल्या लहान टेकडीवर वसलेला आहे. वाढलेल्या लोकवस्तीमुळे आता या नदीचे नाल्यात रुपांतर झाले आहे. आज रावेरचा किल्ला आपल्याला दिसत नसला तरी त्याचे अवशेष मात्र त्याच्या अस्तित्वाची जाणीव देत ठामपणे उभे आहेत. अर्थात हे देखील काही काळाचे सोबती आहेत हे सांगायला नको. ... जुनी उर्दु शाळा विचारली असता आपण सहजपणे या किल्ल्याजवळ पोहोचतो. किल्ल्याचा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन दरवाजाची उजवी बाजु त्या शेजारी असलेल्या तटबंदीचा पाया आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. किल्ल्याच्या आतील भागात पाच सहा घरे असुन नगरपालिकेची इमारत आहे. माती काढण्यासाठी टेकडीचे मोठ्या प्रमाणात खोदकाम झालेले असुन त्यात जमिनीखाली असलेले जुन्या वास्तुतील खापरी नळ पहायला मिळतात. नदीच्या दिशेला टेकडीच्या काठावर असलेली किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. या उंचवट्यावरून बहुतांशी रावेर शहर नजरेस पडते. किल्ल्याच्या उत्तर पश्चिम टोकावर असलेला बुरुज आजही शिल्लक असुन त्यावर पिरबाबाचे थडगे स्थापन झाले आहे. कदाचित त्यामुळेच हा बुरुज शिल्लक राहीला असावा. या बुरुजावरून नदीकाठाच्या दिशेला उतरण्यासाठी नव्याने पायऱ्या बांधल्या आहेत. या पायऱ्यांनी खाली उतरले असता नदी काठाच्या दिशेला शिल्लक असलेली किल्ल्याची उर्वरीत तटबंदी पहायला मिळते. पायऱ्या चढुन वर आल्यावर आपली किल्ल्याची प्रदक्षिणा पुर्ण होते. किल्ल्याचे अवशेष पहाण्यासाठी १५ मिनिटे पुरेशी होतात. आता थोडा किल्ल्याचा इतिहास पाहुया. इतिहासात रवागड म्हणुन ओळखला जाणारा हा किल्ला नावाचे अपभ्रंश होऊन कालांतराने रावेर म्हणुन ओळखला जाऊ लागला. माझ्या वाचनात आलेला या किल्ल्याचा ऐतिहासिक उल्लेख म्हणजे इ.स. १८०३ मध्ये सुराजीराव निंबाळकर यांनी रावेर किल्ला व प्रांत यशवंतराव होळकर यांच्याकडून घेऊन आपल्या यावल जहागिरीत समाविष्ट केला. इ.स.१८१८मध्ये रावेर किल्ला व प्रांत ब्रिटिशांनी ताब्यात घेतला. किल्ल्यापासुन काही अंतरावर केशवकुंड व नागझरी कुंड असे दोन हौद पहायला मिळतात. हे दोन्ही हौद अहिल्याबाई होळकार यांनी बांधल्याचे स्थानिक सांगतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!