रायकोट

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : धुळे

उंची : २१०० फुट

श्रेणी : सोपी

सुरत-बु-हाणपूर या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी धुळय़ाच्या कोंडाईबारी घाटात रायकोट हा छोटेखानी किल्ला अहिर राजांनी बांधला. रायकोट किल्ला धुळ्यापासून ८६ कि.मी.अंतरावर असुन हा किल्ला घाटमाथ्याचा पठाराला बिलगूनच आहे. त्रिकोणी आकाराच्या या किल्ल्याचे क्षेत्रफळ १२ एकर असुन किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची १६५० फुट आहे. रायकोट गाव किल्ल्याच्या पठारावर असल्याने या वाटेने आपण थेट गडाच्या उंचीवर पोहोचतो. रायकोट गावात प्रवेश करण्यापुर्वी मारुतीचे मंदिर लागते या मंदीराच्या बाजूने एक कच्चा रस्ता जाताना दिसतो. हा रस्ता जिथे संपतो तिथुन पायवाट आपल्याला दोन डोंगरांमध्ये असलेल्या नैसर्गिक खंदकात घेऊन जाते. किल्ल्यावर जाताना किल्ल्याच्या अलीकडील पठारावर एक तलाव व नैसर्गिक खंदकाच्या वरील बाजुस तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. सध्या गावकऱ्यांनी शेतीसाठी गडावर ट्रक्टर नेण्यासाठी या खंदकात वाट बनवली आहे. ... हा खंदक चढून गेल्यावर आपण किल्ल्यात प्रवेश करतो. इथेच पडीक तटबंदी तसेच पुढे डावीकडे गेल्यावर भग्न बुरूज दिसतो. बुरूजाकडून पुढे उजवीकडच्या बाजुला कड्याला बिलगुन पायऱ्या खोदलेल्या दिसतात. हि वाट खाली मोरकरंज गावात उतरते. किल्ल्यावर मोठय़ा प्रमाणात शेती केली जात असल्याने अनेक अवशेष नष्ट झालेले आहेत. आजमितीला गडावर ढासळलेली तटबंदी, एक बुरुज, उध्वस्त वास्तुचे अवशेष, बांधीव तळे, एक विहीर व एक साचपाण्याचा तलाव इ.अवशेष पहायला मिळतात. या किल्ल्याचा आकार व घेर पाहाता यावर फारशी शिबंदी नसावी. किल्ल्याचा इतिहास उपलब्ध नसुन स्थानिक लोकांना किल्ल्याबाबत फारच कमी माहिती आहे. तीन बाजूंनी तासलेले कडे असल्यामुळे केवळ जमीनीच्या बाजुला म्हणजे रायकोट गावाच्या दिशेने तटबंदी उभारून तटबंदी बाहेर खंदक खोदलेला आहे. किल्ल्याच्या तीन बाजूंनी असलेली दरी ‘माकडदरी’ या नावाने ओळखली जाते. गडावरुन माकडदरीचे अप्रतिम दृश्य दिसते. रायकोट गावातुन गडावर येणाऱ्या वाटेशिवाय अजुन एक वाट मोरकरंज गावातुन गडावर येते. या वाटेवर घसारा असुन दगडात खोदून काढलेल्या पायऱ्या आहेत पण वापरात नसल्याने त्या खूप मोठया प्रमाणावर ढासळून त्यांच्यावर माती जमा झाली आहे. या पायऱ्याजवळ १०फूट x२० फूट आकाराची एक गुंफा आहे. या वाटचालीत आपण पायथ्यापासून किल्ला चढून जातो. रायकोट गावातुन गडावर जाण्यास दहा मिनिटे लागतात तर गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. अनवट वाटेवरला हा गड आज गावकऱ्यांच्या अज्ञानामुळे शेवटची घटका मोजतोय.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!