रामशेज

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ३१२५ फुट

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्रातील जिल्ह्यामधील सर्वात जास्त किल्ले असलेला जिल्हा म्हणजे नाशिक. नाशिक हि रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. राम पंचवटीला वनवासात असताना त्यांचा मुक्काम काही दिवस या डोंगरावर होता म्हणुन याला रामशेज नाव पडले असे म्हणतात. नाशिक मधून पेठकडे जाणाऱ्या मार्गावर नाशिकपासून १५कि.मी.वर आशेवाडी नावाचे गाव रामसेज किल्ल्याच्या पायथ्याला वसले आहे. आशेवाडीतून कातळमाथा उंचावणारा रामसेजचा किल्ला दिसतो. या कातळमाथ्याच्या पूर्वेकडून गडाच्या माथ्यावर जाणारी पायवाट आहे. समुद्रसपाटी पासून या किल्ल्याची उंची साधारण ३२०० फूट इतकी आहे. किल्ल्याचे एकुण क्षेत्रफळ १६ एकर असुन लांबी २२०० फुट तर रुंदी ७०० फुट आहे. गड फारसा उंच नसल्याने तासाभरात आपण गडावर पोहोचतो. गडाच्या पायऱ्या सुरु होण्याआधी उजव्या बाजुला डोंगरात एक खोदीव गुहा दिसते. ... या गुहेला मध्यभागी कातळात एक छेद असून त्यातून गडाच्या वरील बाजुच्या पायऱ्या दिसतात. या गुहेपासून किल्ल्याच्या कातळातील पायऱ्या सुरु होतात. या पायऱ्या चढताना सर्वप्रथम एक प्रशस्त गुहा लागते. या मंदिरात रामासोबत मारुती, दत्तगुरू, दुर्गामाता यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. गुहेच्या बाजूलाच एक सहा ओळींचा शिलालेख कोरलेला असून त्याचे वाचन याप्रमाणे. १.श्री गणेशाय नमः २.स्वस्ति श्रीम नृप शालिवाहन शके १९८२ विक्रमनाम ३. संवत्सरे श्री राजा शाहु चरणी दृढ भाव पंतप्र ४.धान बाळाजी बाजीराव सुभेदार आपासत्रस ५. दाशिव सटवोजी मोहिते हंबीरराव कीले. पुढील सहावी ओळ अक्षरे पुसट झाल्याने वाचता येत नाही. शिलालेखाची सुरक्षितता उनपावसावर सोपवल्याने त्याची अवस्था बिकट झाली आहे. गुहेच्या शेजारी एक बारमाही पाण्याचे भुयारी टाके असुन याच्या आतच वरील बाजुस कोठार आहे. या कोठारात व टाक्यात उतरण्यासाठी बाहेरून तसेच गुहेतुन देखील एक वाट आहे. आजमितीला गडावर पिण्याच्या पाण्याची हि एकमेव सोय आहे. या गुहा मंदिरात १५-२० जण आरामात राहू शकतात. येथुन दहा-बारा पायऱ्या चढल्या कि भग्न दरवाजातून व तुटलेल्या तटबंदीतून आपला गडावर प्रवेश होतो. येथे उजव्या बाजुला तटबंदीला लागुनच दोनही बाजुला दुहेरी तटबंदीवजा बांधकाम पाहण्यास मिळते तर समोरच्या बाजूला एक दरवाजा आहे. या दरवाज्याची कमान आजही शिल्लक असून काही पायऱ्या उतरून खाली गेले असता कातळातील खांब टाके दिसते.अभ्यासकांच्या दृष्टीने हे टाके महत्वाचे आहे कारण या टाक्यात पुर्वीच्या काळी खडकातून चिरा कसा काढला जात असे हे पहाता येते. या ठिकाणी चिरा काढण्याचे काम अर्धवट राहिलेले असुन दगडातील खाचा व अर्धवट व पुर्ण काढलेले चिरे पहाता येतात. बरेच जण या जागेचा गुप्त दरवाजा असा उल्लेख करतात पण हा चुकीचा आहे कारण या टाक्याच्या खालील बाजुस कोणतीही वाट नाही. या टाक्याच्या समोरील बाजुस भिंत बांधलेली आहे. शिवकाळात या टाक्याचा उपयोग दारूकोठार अथवा धान्यकोठार म्हणून केला गेला असावा. टाके पाहून वर आल्यावर डावीकडे जाणारी वाट गडाच्या माचीवर घेऊन जाते. हि माची म्हणजेच आशेवाडी गावातून दिसणारी कातळटोपी. या माचीवर साचपाण्याचे एक टाके व खडकात खोदलेले एक टाके अशी दोन पाण्याची टाकी, एक ध्वजस्तंभ व खडकात खोदलेला वास्तुचा पाया व बुरुजाचे अवशेष नजरेस पडतात. माचीवरील अवशेष पाहून बालेकिल्ल्याकडे वळायचे. बालेकिल्ल्याकडे निघाले असता डाव्या बाजूस गडाच्या महादरवाज्याकडे जाणाऱ्या कातळातील पायऱ्या दिसतात. येथे दक्षिण दिशेला गडाचा मुख्य दरवाजा अखंड काळय़ा कातळात खोदलेला असून त्यावर शिल्प कोरलेली आहेत. या दोन दरवाजांच्या मधूनच एक पायऱ्यांची वाट खाली भूयाराकडे जाते. या वाटेने खाली उतरले असता सुरुवातीला लागलेल्या गुहेच्या वरच्या बाजुस आपण येतो. येथील खाचेतुन खालील गुहा नजरेस पडते. या खाचेचा उपयोग गडाबाहेर असणाऱ्या सैनिकांना अन्नपाणी देण्यासाठी केला जात असावा. मुळात या दरवाजाचे काम अर्धवट राहिलेले असुन हि खाच म्हणजे दरवाजातून खाली उतरत जाणारी व गुहेत उतरणारी अर्धवट कोरलेली वाट आहे. दरवाजा पाहून गडाच्या माथ्याकडे निघाले असता सर्वप्रथम चुन्याचा गोलाकार घाणा दिसतो पण यातील चाक मात्र आज जागेवर नाही. येथुन थोडे वर आल्यावर सपाटीवर एक पाण्याचा खोदीव बंधारा तलाव व समोरच एका शेजारी एक अशी चार पाण्याची टाकी दिसतात. थोडे आणखी वर गेल्यावर डाव्या बाजुला अलीकडेच बांधलेले देवीचे एक छोटे मंदिर लागते. मंदिरासमोर सिमेंटची एक गोलाकार दिपमाळ आहे. मंदिराच्या मागील बाजूने थोडे खाली उतरल्यावर सर्वप्रथम पाण्याची दोन जोड टाकी व त्यापुढे पाण्याची तीन जोड टाकी तसेच पुढे गडाचा दुसरा गुप्त दरवाजा लागतो. ह्या दरवाजाची रचना अप्रतिम आहे. हा दरवाजा कड्याला लागुन व जमिनीला समांतर असुन जवळ गेलो तरी त्याचे अस्तित्व चटकन लक्षात येत नाही. या दरवाजातून येणारी वाट मोडलेली असुन याच्या कड्यात कोरलेल्या पाय-या तोडून टाकलेल्या आहेत. दरवाजाच्या दोनही कमानी व अंतर्भाग मात्र शिल्लक आहे. दरवाजा पाहून परत मंदिराकडे फिरावे. मंदिराच्या समोरून पुढे जाणारी वाट गडाच्या टोकावरील पाण्याच्या टाक्यांकडे घेऊन जाते. या भागात तीन ठिकाणी पाण्याची जोडटाकी,वाडय़ाचे जोते व घरांचे पडके अवशेष पहायला मिळतात. रामसेजचा विस्तार फार मोठा नाही. गडावर पाण्याच्या टाक्या भरपूर असुनही पिण्यायोग्य पाणी कमी आहे. संपूर्ण गडाला कातळाचे आवरण असल्याने तटबंदी अशी बांधलेली नाहीच. गडाच्या या उंच भागातुन गडाची माची, सातमाळ रांग, त्र्यंबकरांग आणि समोर भोरगड, देहेरगड व आजूबाजूचे डोंगर दिसतात. रामसेज किल्ल्याच्या संपूर्ण गडफेरीला पायथ्याच्या आशेवाडी गावातून साधारण ३ तासाचा कालावधी पुरेसा आहे. दरवाज्याची कातळकोरीव रचना, पाण्याचे अंतर्भागात खोलवर पसरलेले टाके यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा. रामशेज प्रसिद्ध पावला तो छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत. मराठे आणि मोगल यांच्यातील संघर्षाचा रामसेज साक्षीदार आहे. हिंदवी स्वराज्य गिळंकृत करण्याचं स्वप्न पहात आलेल्या औरंगजेबाला या रामशेज गडानं तब्बल सहा वष्रे झुंजवलं. नाशिक परिसर मोगलांच्या ताब्यात असला तरी रामशेजचा किल्ला मात्र छत्रपती शिवाजीराजांनी जिंकून घेतलेला होता. हिंदवी स्वराज्य बुडवण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत उतरला तेव्हा त्याने प्रथम रामशेजला लक्ष्य केलं कारण औरंगजेबचे वडील शहाजान दख्खन जिंकण्यासाठी दक्षिणेत आले तेव्हा त्यांनी पहिल्या झटक्यातच रामशेज जिंकून दख्खनमध्ये प्रवेश केला. आपल्या युद्धाची सुरवात विजयाने व्हावी म्हणून औरंगजेबाने एप्रिल १६८२ ला रामसेज किल्ला जिंकून घेण्यासाठी शहाबुद्दीन खानाला दहा हजार सैन्य, प्रचंड दारुगोळा आणि तोफखाना देउन रवाना केले. त्याच्या सोबत कासीमखान, पीरगुलाम, रामसिंग बुंदेला, दातियाचा राजा रायबुंदेला अशी मातब्बर मंडळी होती. त्याने रामशेजला वेढा घातला. रामसेजला वेढा पडणार असे कळताच छत्रपती संभाजी महाराजांनी साल्हेरच्या किल्लेदाराला रामसेजला नेमले. रामसेजच्या या किल्लेदाराचे नाव दुर्देवाने आज तरी माहित नाही.मोगली सैन्याने रामशेजवर प्रखर हल्ला चढवला. गडावर सहाशे ते सातशे मावळे होते. मोगली सैन्य गडाला भिडताच वरच्या शिबंदीने वरुन दगडांचा मोठा मारा केला. या दगडांच्या वर्षावामुळे मोगलांना गडाला भिडताच येईना. मोठी हानी सोसुन सैन्य माघारी फिरले आणि गडाला वेढा घालून बसले. शहाबुद्दीन फिरोजजंगने गडाला मोर्चे लावले, सुरुंग लावले, अचानक हल्ले करुन वेढा आवळून बघितले तरीही रामशेजवर काहीही परिणाम झाला नाही. शहाबुद्दीनने रामशेज शेजारील टेकडीवर रामशेजपेक्षा उंच लाकडी बुरुज (दमदमा) उभा केला. या प्रचंड दमदम्यावर तोफा चढवुन गोळाबारी केली तरीही रामशेज शरण आला नाही. किल्ल्यावरील तोफगोळे संपल्याने गुरांच्या कातडय़ामध्ये दारु भरुन ती तोफेमधून उडवण्यात आली त्यामुळे पेटत्या कातडय़ाचे तुकडे मोगली छावणीवर पडू लागले व त्यामुळे लागणाऱ्या आगीने मोगलांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होवू लागले. मे १६८२ मध्ये संभाजी महाराजांनी रामशेजचा मोगलांचा वेढा फोडण्यासाठी रूपाजी भोसले व मानाजी मोरे यांना पाच ते सात हजार सैन्य देऊन रामशेजवर पाठवले. मराठयांचे सैन्य येत असलेले पाहून शहाबुद्दीन सैन्यानिशी मराठय़ांना अडवण्यासाठी धावला. गडाजवळच्या गणेश गावापाशी मराठे-मोघल एकमेकांवर तुटून पडले. मराठय़ांचा त्वेष जबरदस्त होता. मोगलांनी मराठय़ांसमोर माघार घेतली. मोगलांनी मार खाल्लेला बघून गडावरच्या शिबंदीचा उत्साह अजूनही वाढला. पण त्यांनी रामशेजच्या वेढयावर परिणाम होऊ दिला नाही. मराठयांनी हल्ला केल्याचे समजताच औरंगजेबाने १२ मे १६८२ला आपला सावत्र भाऊ खानजहान बहाद्दूर कोकल्ताश याला शहाबुद्दीन खानाच्या मदतीला पाठवला. शहाबुद्दीन व बहादूरखानने रामशेजवर जोरदार हल्ला चढवला. पण गडावरच्या मावळ्यांनी जोरदार प्रतिकार करत हल्ला परतवून लावला. या हल्ल्यात मोगलांकडील राजा दलपतराय जबर जखमी झाला. हल्ला नाकाम झालेला पाहून निराश झालेला शहाबुद्दीन वेढा सोडून जुन्नरला निघून गेला. पण जाताना तो प्रचंड लाकडी दमदमा त्याने पेटवून दिला. वेढय़ाची सारी जबाबदारी बहादूरखानावर येऊन पडली. बहादूरखान कोकलताश याने पराक्रमाची शर्थ केली पण मराठय़ांपुढे त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर गडावरच्या मराठय़ांना फसविण्याची युक्ती लढवण्यात आली. गडावर एकाबाजूने जोरदार हल्ला चढवायचा त्यामुळे गडावरील सर्व सैन्य त्याबाजूला गोळा होईल त्याच वेळी निवडक अशा मोगली सैन्याने मागच्या बाजूने गुपचूप किल्ल्याच्या आत प्रवेश करुन दरवाजा उघडायचा असे ठरवले होते. पण गडाचा किल्लेदार मात्र सावध होता. त्याने या भागात देखील सैन्य ठेवले होते. ठरल्याप्रमाणे हल्ल्याच्या बाजूला मोठा गोंधळ उडवला व मागच्या बाजूने दोनशे मोगल दोराच्या सहाय्याने कडा चढू लागले. पण दबा धरुन बसलेल्या मराठय़ांनी त्यांना जोरदार तडाखा दिला. दोराने वर चढणारे सैनिक खाली पाडले आणि बहादूरखानाची बहादूरी त्याच्याच अंगलट आली. गडावरची माणसे माणसे नसून भुते आहेत त्यांना शरण आणण्यासाठी भुतांच्या मांत्रिकाची मदत घेण्याचे ठरले. त्याने नव्वद तोळे वजनाच्या सोन्याचा एक नाग बनवला. नाग बनविण्याचा खर्च ३७६३०रुपये इतका आल्याचा उल्लेख मोगल दप्तरात सापडतो. त्या नागावर मंत्रांचा प्रभाव टाकला. हा नाग पाहताच सर्व मराठे गप पडतील असे त्याने सांगितले. मुहुर्त पाहून गडावर चढाई करण्याचे ठरवले. मांत्रिकाने नाग हातात धरला. तो पुढे करुन तो किल्ला चढू लागला. त्यामागून मोगल सैन्य निघाले. गडावरच्या मराठय़ांना काय चालले आहे ते समजेना. त्यामुळे ते तटावर येवून कुतहुलाने खाली बघू लागले. मराठे गप बसून बघतायेत हे पाहून मांत्रिकाला चेव चढला. त्याने हा नागाचाच प्रताप आहे असे मोगली सैन्याला सांगितले. सर्वजण गड चढू लागले. मांत्रिक जसा नजरेच्या टप्प्यात आला तसा त्याच्या हातातला तो नाग मराठय़ांना दिसला. एव्हाना मोगली सैन्य दगडाच्या माऱ्यात आले होते. गडावरून सणसणत आलेला दगड मांत्रिकाच्या छाताडात बसल्याबरोबर नाग उडून पडला आणि मांत्रिकही कोलमडून पडला. दगडांच्या प्रचंड वर्षावाने धूळधाण उडालेली मोगलांची सेना कशीबशी जीव वाचवून छावणीत परतली. रामशेजपुढे होत असलेली दुर्दशा पाहून औरंगजेब भयंकर संतापला. त्याने बहादुरखानाला वेढा उठवण्यास फर्मावलं. खान वेढा उठवून माघारी निघून गेला. बखरकार खाफीखान म्हणतो रामशेजवर अमाप संपत्तीचा चुराडा झाला, हजारो माणसे मारली गेली, प्रचंड दारूगोळा नष्ट झाला. तरीही औरंगजेब रामशेजचा नाद सोडण्यास तयार नव्हता. त्रिंबकगडावरील एक लोखंडी तोफ रामशेजवर जात असता मोगलांनी ती ताब्यात घेतली. औरंगजेबाने कासिमखान किरमाणी याला रामशेजवर पाठवलं पण त्यालाही यश आलं नाही. शेवटी औरंगजेबाने वेढा रद्द करून कासिमखानाला दुस-या कामगिरीवर पाठवलं. रामसेजचा किल्ला या किल्लेदाराने तब्बल साडेपाच वर्ष लढवला. रामशेजवरील मराठय़ांच्या पराक्रमावर खूश होऊन संभाजी महाराजांनी किल्लेदाराला चिलखती पोशाख, रत्नजडीत कडे व रोख रक्कम पाठवून त्याचा गौरव केला. त्यानंतर रामशेजवर आलेल्या नव्या किल्लेदाराला अब्दुल करीम नावाच्या जमीनदारामार्फत मुल्हेरचा किल्लेदार नेकनामखान याने वश केले व फितुरीने १६८७ मध्ये रामशेज औरंगजेबाच्या ताब्यात गेला. रामशेजवरील मराठय़ांच्या पराक्रमाचे वर्णन आपल्याला परकीय साधनामध्येच मिळते. या वेढय़ाच्या वेळी ३० जुलै १६८२ला कारवारकर इंग्रज सुरतकरांना कळवतात की मराठय़ांचे दहा हजार पायदळ घेऊन हंबीरराव वेढा घालून बसलेल्या सैन्यास पळवुन लावण्यासाठी गेल्याची व नंतर झालेल्या लढाईत जखमी झाल्याचे सांगतात. सन १८१८ मध्ये त्रिंबकगड इंग्रजांनी घेतल्यावर रामशेजवरील लोकांनी हा गड इंग्रजांच्या स्वाधीन केला. यावेळी इंग्रजांना गडावर आठ मोठय़ा तोफा, नऊ लहान तोफा, जंबुरे, २५१ पौंड दारू, तसेच गंधक, चांदी, पितळ, शिसे, ताग, तांबे, गालीचे व एक चिलखत सापडलं. हे चिलखत शिवाजी महाराजांचं होतं असं कॅप्टन ब्रिज यांनी २० जून १८१८च्या रिपोर्टमध्ये लिहून ठेवलं आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!