रामटेक

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नागपुर

उंची : १५१० फुट

श्रेणी : सोपी

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुर जिल्ह्यात रामटेक व नगरधन हे दोन महत्वाचे किल्ले आहेत. नागपुर शहरापासुन जवळच असलेल्या या किल्ल्यांना जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय असल्याने एका दिवसात हे दोन्ही किल्ले सहजपणे पाहुन होतात. यातील रामटेक हा गिरीदुर्ग व त्याच्या आसपासचा परीसर धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याने येथे सतत भाविकांची वर्दळ असते त्यामुळे नीटपणे किल्ला पहायचा असल्यास शक्यतो सार्वजनीक सुट्टीचा दिवस टाळावा. नागपुर- रामटेक हे अंतर ४८ कि.मी.असुन रामटेक या तालुक्याच्या ठिकाणीच रामटेकचा किल्ला आहे. नागपूर-जबलपूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मनसर गावातून रामटेककडे जाण्यासाठी फाटा फुटतो. या रस्त्याने रामटेक गावात शिरण्यापुर्वी दुरूनच शहराच्या उत्तरेस पायथ्यापासुन ३६० फुट उंच टेकडीवर असलेला किल्ला व त्यावरील मंदिराचे शिखर दिसण्यास सुरवात होते. ... समुद्रसपाटीपासुन १४५० फुट उंचावर असलेल्या या किल्ल्याचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग असुन माचीच्या दक्षिण व पश्चिम बाजूस कड्याचे नैसर्गिक सरंक्षण लाभले आहे तर उत्तरेकडील बाजुस काही प्रमाणात तटबंदी आहे. हि तटबंदी नागपूरकर रघूजीराजे भोसले यांच्या काळात बांधली आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी एकुण पाच मार्ग असुन किल्ल्याच्या दक्षिणेस नव्याने बांधलेला पायरीमार्ग व एक मुळची पायवाट आहे. किल्ल्याच्या पुर्व बाजुने गडावर येणारा गाडीमार्ग तसेच अंबाला तलावाकडून येणारा जुना पायरीमार्ग असुन उत्तरेस नव्याने बांधलेला दुसरा पायरीमार्ग आहे. यातील दोन पायरीमार्ग थेट बालेकिल्ल्यात जातात तर गाडीमार्ग,अंबाला तलावाकडून येणारा पायरीमार्ग व मुळची पायवाट गडाच्या माचीत येते. रामटेक गावातुन गडावर येणारा गाडीमार्ग रामटेक गावाबाहेर पडुन गडाच्या संपुर्ण डोंगराला वळसा घालत पुर्व बाजूने गडाच्या माचीवर नव्याने बांधलेल्या कालिदास स्मारकाजवळील वाहनतळावर येतो व तसाच पुढे डोंगराची प्रदक्षिणा करत रामटेक गावात उतरतो. येथे येण्यासाठी यस.टी बस नसल्याने खाजगी वाहन हा पर्याय उपलब्ध आहे. किल्ल्याच्या माचीवर धृम्रेश्वर महादेव, नरसिंह,त्रिविक्रम,हनुमान मंदीर अशी चार मंदीरे असुन शेंदुर बावडी नावाची पुष्करणी आहे. गडफेरी करताना सर्वप्रथम किल्ल्याचा माचीचा भाग फिरून घ्यावा. किल्ल्याच्या माचीची तटबंदी कालिदास स्मारकापासून सुरु होऊन किल्ल्याला वेढा घालत बालेकिल्ल्याच्या खालील बाजूस असलेल्या लोखंडी मनोऱ्याकडे जाते. लोखंडी मनोरा असलेली हे टेकडी लहानशा खिंडीने बालेकिल्ल्यापासुन वेगळी केली आहे. वाहनतळाकडून पुढे रामटेक गावात जाणाऱ्या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर उजवीकडे शेंदुर बावडी पुष्करणी पहायला मिळते. या पुष्करणीत उतरण्यासाठी पायऱ्या असुन काठावर कोरीव खांब असलेली अनेक दालने आहेत. अंबाला तलावाकडून येणारा पायरीमार्ग या पुष्करणीजवळ येतो. पुर्वी गडाच्या माचीला पाणीपुरवठा करणारा हा एकमेव स्त्रोत आहे. रस्त्याच्या पुढील भागात त्रिविक्रम मंदिराकडे जाणारी ठळक पायवाट असुन १० मिनिटात आपण तेथे पोहोचतो. या ठिकाणी आपल्याला त्रिविक्रम मंदीर व काही वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. ते पाहून परत वाहनतळाजवळ यावे व येथील कालिदास स्मारक पाहुन घ्यावे. महाकवी कालिदास यांच्या ग्रंथातील प्रसंगावर चितारलेली येथील चित्रे आवर्जुन पहाण्यासारखी आहेत. वाहनतळाच्या मागील बाजुस डोंगर उताराच्या दिशेने काही अंतरावर धृम्रेश्वर महादेवाचे मंदीर आहे. रामटेक गावातुन किल्ल्यावर येणारी मूळ वाट या मंदिराकडूनच वर येते. या वाटेवर माचीच्या तटबंदीत असलेला एक दरवाजा पहायला मिळतो. धृम्रेश्वर मंदीर पाहुन बालेकिल्ल्याच्या दिशेने निघाल्यावर वाटेत नरसिंह मंदीर आहे. मंदिराच्या आतील गाभाऱ्यात नरसिंहाची एका पायावर बसलेल्या अवस्थेतील ६ फुट उंचीची मुर्ती आहे. मंदिराच्या आतील व बाहेरील भागात फारसे कोरीव काम दिसुन येत नाही. मंदिराच्या आवारातुन संपुर्ण बालेकिल्ल्याची तटबंदी व त्यातील वेगवेगळ्या आकाराचे बुरुज पहायला मिळतात. हे सर्व बांधकाम वेगवेगळ्या काळात झाल्याचे ठळकपणे दिसुन येते. येथुन बालेकिल्ल्याच्या दिशेने जाताना वाटेत एक दर्गा पहायला मिळतो. निमुळत्या आकाराच्या टेकडीवर असलेला रामटेकचा बालेकिल्ला ११५० फुट लांब व १३० फुट रुंद असुन चार भागात विभागलेला आहे. बालेकिल्ल्याच्या तटबंदीत वराह,सिंहपुर,भैरव व गोकुळ असे एकुण चार दरवाजे आहेत. बालेकिल्ल्याचा १२ फुट उंचीचा पहिला दरवाजा दक्षिणाभिमुख असुन त्यावर मोठया प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. दरवाजाच्या आतील बाजुस असलेल्या वराहमुर्तीमुळे वराह दरवाजा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या दरवाजाशेजारी चौकोनी आकाराचा बुरुज असुन काही अंतरावर तटबंदीच्या टोकाला दुसरा चौकोनी बुरुज आहे. दरवाजाच्या आतील बाजुस दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. बालेकिल्ल्याची तटबंदी १०-१२ फुट रुंद असुन तटबंदीला बाण व बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. दरवाजातून काही पायऱ्या चढुन आत आल्यावर उजवीकडे एका चौथऱ्यावर दगडी मंडपात अखंड पाषाणातील सहा फुट उंचीची वराहाची मुर्ती आहे तर डावीकडे महानुभाव पंथातील चक्रधरस्वामींचे मंदीर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूने बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या भागात असलेल्या सिंहपुर दरवाजाकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. बालेकिल्ल्याचा वरील भाग आडवी तटबंदी बांधुन खालील भागापासून वेगळा केला असुन तटबंदीच्या दोन्ही टोकाला गोलाकार बुरुज आहेत. तटबंदीच्या मध्यभागी असलेला उत्तराभिमुख दरवाजा थेट समोर न बांधता तटबंदीला वळण देऊन बांधला आहे. या दरवाजाच्या अलीकडे उजवीकडील बाजुस तटबंदीखालुन गडावर येणारा नव्याने बांधलेला पायरीमार्ग आहे. दरवाजाच्या आतील बाजुस देवड्या असुन तटावर व दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजाच्या आतील बाजुस उजवीकडे असलेल्या तटबंदीला लागुन दोन कोठारे असुन मध्यभागी एक विहीर आहे. या विहिरीचे तोंड आता बंदीस्त केलेले आहे. बालेकिल्ल्याच्या तिसऱ्या भागालादेखील इतर भागाप्रमाणे आडवी तटबंदी बांधलेली असुन या तटबंदीच्या मध्यभागी गडाचा तिसरा पुर्वाभिमुख भैरव दरवाजा आहे. तटबंदीच्या उजवीकडील टोकाला गोलाकार बुरुज असुन डावीकडील टोकावर तटबंदीत अष्टकोनी आकाराचा बुरुज आहे. आतील बाजुने पोकळ असलेल्या या बुरुजाच्या खालील भागात खिडक्या असलेले कोठार आहे. कोरीवकामाने सजवलेल्या भैरव दरवाजाच्या वरील बाजुस नगारखाना असुन आतील बाजुस कमानीदार देवड्या आहेत. दरवाजाच्या वरील टोकावर दोन मिनार असुन दरवाजाबाहेर एक तोफ ठेवलेली आहे. दरवाजाच्या आतील भागात तटबंदीला लागुन दोन्ही बुरुजावर तसेच तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग असुन येथुन संपूर्ण किल्ला व त्याखालील रामटेक गाव तसेच दूरवर असलेल्या नगरधन किल्ल्याचे दर्शन होते. दरवाजाच्या डाव्या बाजुस तटबंदीला लागुन अगस्ती ऋषींचा आश्रम आहे. येथुन पुढील भागात किल्ल्यातील मुख्य मंदिरांचे संकुल असुन त्यात जाण्यासाठी शिखर असलेला गोकुळ दरवाजा आहे. दरवाजाच्या पुढील भागात एका कट्ट्यावर मध्यम आकाराची तोफ ठेवलेली आहे. मंदीर संकुलात न जाता प्रथम मंदिराच्या डावीकडील मंदिराचा भाग पाहुन घ्यावा. दरवाजाच्या डाव्या बाजूस दशरथ मंदिर असुन दक्षिणात्य पद्धतीने बांधलेले हे संपुर्ण मंदीर कोरीवकामाने सजवले आहे. दशरथ मंदिर व तटबंदी यामधील भागात चौकोनी आकाराचा तलाव असुन या तलावात उतरण्यासाठी तीन बाजुना पायऱ्या तर चौथ्या बाजुस भुमीगत दरवाजा आहे. कोरीवकामाने सजलेल्या या दरवाजाच्या कमानीवर दगडी छत्री उभारली आहे. तलावाच्या पुढे आल्यावर पायऱ्या उतरुन एका लहान दरवाजाने आपण मंदीर संकुलाबाहेर असलेल्या दुहेरी तटबंदीत उतरतो. मंदीर संकुलातून येथे येण्यासाठी एक दिंडी दरवाजा असुन तो सध्या विटांनी बंद करण्यात आला आहे. दोन तटबंदीमध्ये असलेल्या या भागात चावीच्या आकाराची एक विहीर असुन गडाबाहेर जाण्यासाठी बाहेरील तटबंदीत एक लहान दरवाजा आहे. संकटकाळी गडाबाहेर पडण्यासाठी असलेल्या या दिंडी दरवाजाला आता पायऱ्या बांधुन रामटेक गावातुन गडावर येण्याचा राजमार्ग बनविला आहे. या भागात तटबंदीला लागुन एक लहान बुरुज बांधलेला आहे. हा भाग पाहुन झाल्यावर मागे फिरून गोकुळ दरवाजाने मंदीर संकुलात प्रवेश करावा. दगडी बांधकाम असलेली दरवाजाची इमारत तीन मजली असून आतील बाजूस अतिशय रेखीव व सुबक कोरीवकाम केलेले आहे. पुर्वाभिमूख असलेल्या या दरवाजाने आत शिरल्यावर आतील बाजुस ओसरी असुन समोरच संगमरवरी मुर्ती असलेले लक्ष्मणाचे मंदिर आहे. लक्ष्मण मंदिराच्या उजव्या बाजूला हनुमानाचे मंदिर असुन मागील बाजुस रामसीतेचे मुख्य मंदीर आहे. या मंदिरात राम-सीता यांच्या काळ्या पाषाणात घडवलेल्या मुर्ती चांदीच्या नक्षीदार प्रभावळीत उभ्या आहेत. हे मंदिर नागपूरचे राजे रघुजी भोसले यांनी छिंदवाड्यातील देवगड किल्ल्याच्या विजयानंतर बांधले आहे. लक्ष्मण मंदिर व राम मंदिरात नागपुरकर भोसल्यांनी वापरलेली शस्त्रे कपाटात ठेवलेली आहेत. राम मंदिराच्या डाव्या बाजूला कौसल्यामाता व सुमित्रामाता यांची देवळे असुन मागील बाजुस लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे. याशिवाय मंदिराभोवती इतर काही देवतांची मंदीरे आहेत. संपुर्ण मंदीर संकुल कोरीवकामाने नटलेले आहे. मंदीर संकुलातून बाहेर पडल्यावर आपली दोन तासाची गडफेरी पुर्ण होते. रामटेकचे संदर्भ थेट पुराणकाळातच जोडले जातात. रामाने या ठिकाणी विश्रांती घेतल्याने या ठिकाणाचे नाव रामटेक पडले असा समज जनमानसात रूढ आहे. मौर्य, सातवाहनानंतर इ.स.२७० ते इ.स.५०० या काळात विदर्भावर वाकाटकांची सत्ता होती. नंदीवर्धन, प्रवरपूर(मनसर), वत्सगुल्म (वाशीम) ही ठिकाणे त्याकाळी प्रसिद्ध होती. यातील नंदीवर्धन म्हणजे आजचे नगरधन ही वाकाटकांची राजधानी रामटेकच्या सानिध्यात असल्याने राजधानीजवळ असलेला हा गिरीदुर्ग नगराच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्वाचा होता. विंध्यशक्ती (इ.स. २५० ते इ.स. २७०), प्रवरसेन पहिला (इ.स. २७० ते इ.स. ३३०), हरीसेन (इ.स. ४७५ ते इ.स. ५००) हे वाकाटकांचे महत्त्वाचे राजे होऊन गेले. विंध्यशक्ती हा वाकाटक घराण्याचा संस्थापक होता. विंध्यशक्तीचा पुत्र प्रथम प्रवरसेन हा सर्वात बलशाली राजा होता. इ.स.३९५ मधे प्रथम प्रवरसेन याचा पुत्र रुद्रसेन (व्दितीय) याचे लग्न प्रभावती (चंद्रगुप्त विक्रमादित्यची मुलगी) बरोबर झाले. रुद्रसेन (व्दितीय) याने आपली राजधानी नंदिवर्धन येथे आणली. इ.स. ४०५ मधे राजा रुद्रसेनचा मृत्यु झाल्याने राज्यकारभार राणी प्रभावतीच्या ताब्यात आला. चंद्रगुप्त (व्दितीय) याने या प्रदेशाची व्यवस्था लावण्यासाठी राणी प्रभावतीसोबत महाकवी कालिदासांची प्रशासक म्हणून नेमणूक केली. कवी कालीदास यांनी मेघदूत हे अजरामर काव्य याच ठिकाणी रचल्याचे मानले जाते. वैष्णवभक्त असलेल्या राणी प्रभावती व तिच्या वंशजांनी रामगिरीवर नरसिंह, त्रिविक्कम,वराह,गुप्तराम मंदिरे उभारली. नरसिंह मंदिरात असलेल्या ब्राम्ही शिलालेखात याचा उल्लेख येतो. बाराव्या शतकातील मराठीचा आद्यग्रंथ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या लीळाचरित्र या ग्रंथात चक्रधरस्वामी भारतभर भ्रमण करताना भरुच-गुजरात येथून रामटेकला आल्याचे व तेथे दहा महिने त्यांचे वास्तव्य असल्याचा उल्लेख येतो. स्वामीनी या ठिकाणी धर्मोपदेश केला. १३ व्या शतकातील येथे बांधलेल्या लक्ष्मण मंदिरावरील शिलालेखात या डोंगराचा उल्लेख सिंदुरगिरी व तपोगिरी या नावाने येतो. पेशवेकाळात नागपूरकर रघुजी भोसल्यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी करताना गडावरील मंदिरांचा जिर्णोध्दार केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी याच गडावर ध्यानधारणा केली.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!