राजापुर-नगर
प्रकार : गढी
जिल्हा : अहमदनगर
पुणे नगर जिल्ह्यांची भटकंती करताना या दोन्ही जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आपल्याला अनेक गढ्या पहायला मिळतात. यातील काही गढ्या परीचीत तर काही गढ्या पुर्णपणे अपरिचित आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर या गावात आपल्याला अशीच एक पेशवेकालीन अपरिचित गढी पहायला मिळते. जहागीरदार गढी म्हणुन ओळखली जाणारी हि गढी खुद्द गावालाच इतकी अपरिचित आहे कि ब्राम्हणाची गढी याशिवाय त्यांना या गढीची इतर कोणतीही माहिती नाही. गढीच्या मालकाचे नाव विचरले असता ते देखील त्यांना ठामपणे सांगता येत नाही. काही जण ती देशपांडे यांची गढी असल्याचे सांगतात तर काही लोक ती कुलकर्णी यांची गढी असल्याचे सांतात. श्रीगोंदा तालुक्यात असलेली हि गढी श्रीगोंदा या तालुक्याच्या ठिकाणाहुन ५२ कि.मी.अंतरावर तर पुणे जिल्ह्यातील शिरूरपासून हिंगणी दुमाला मार्गे १२ कि.मी अंतरावर आहे. राजापुर गढीला या मार्गाने जाताना हिंगणी दुमाला गावाच्या नगरकोटाचे दोन दरवाजे तसेच पवार यांची गढी देखील पहाता येते. राजापुर गावात प्रवेश करताना गोविंद महाराजाचे मंदिर असुन या मंदीराच्या आवारात एक धेनुगळ पहायला मिळते.
...
राजापुर गढी हि राजापुर गावाच्या वरील बाजुस असलेल्या टेकडीवर बांधलेली असुन राजापुर गाव टेकडीखाली कुकडी नदीच्या काठावर वसलेले होते. कुकडी नदीवर बांधलेल्या नव्या धरणामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली व हे गाव डोंगरावर गढीच्या आसपास स्थलांतरित झालेले आहे. गढीचे वंशज फार पुर्वी हे गाव व गढी सोडून गेल्याने गढी ओस पडलेली आहे पण आजही सुस्थितीत आहे. गढीत प्रवेश करण्यापुर्वी मुख्य दरवाजाच्या समोरच विटांनी बांधलेले एक समाधी मंदिर अथवा शिवमंदिर पहायला मिळते. माथ्यावर कळस असलेल्या या मंदीरात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. गढीचा दरवाजा व शेजारील बुरुज चुन्याचा वापर करून घडीव दगडात बांधलेला असुन उर्वरित तटबंदी रचीव दगडांनी बांधलेली आहे. पश्चिमाभिमुख असलेल्या या दरवाजाच्या वरील भागात विटांनी बांधलेली नगारखान्याची भक्कम इमारत असुन त्यावर दर्शनी भागात कोरीवकाम केलेले आहे. संपुर्ण गढी साधारण एक एकरवर पसरलेली असुन गढीच्या तटबंदी मध्ये एकुण आठ बुरुज आहेत. गढीचा दरवाजा दोन भक्कम बुरुजात बांधलेला असुन असुन उर्वरित सहा बुरुज तटबंदीमध्ये पहायला मिळतात. गढी ओस पडल्याने गढीची लाकडी दारे मात्र गायब झाली आहेत. गढीत प्रवेश केल्यावर दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. येथुन पुढे आल्यावर तटबंदीच्या भिंतीत दरवाजावरील नगारखान्यात जाण्यासाठी बंदीस्त जिना आहे. या जिन्याने वर आले असता नगारखान्याच्या खोलीत देखील प्रचंड झाडी वाढलेली दिसते. या नगारखान्यातुन दिसणारा दूरवरचा प्रदेश पहाता या गढीच्या स्थानाचे महत्व ध्यानी येते. गढीत असलेला वाडा पूर्णपणे नष्ट झाला असुन त्याचे रुपांतर मातीच्या ढिगाऱ्यात झाले आहे. या ढिगाऱ्यावर व आसपास देखील मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे. या झाडीतुन वाट काढत फिरत असताना हिरव्यागार पाण्याने भरलेली चौकोनी आकाराची एक विहीर पहायला मिळते. या विहिरीशेजारी तटबंदीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बुरुजात प्रसंगी गढीबाहेर जाण्यासाठी लहान दरवाजा आहे. या दरवाजाच्या अलीकडे गढीबाहेर जाण्यासाठी लहान भुयारी चोर दरवाजा असुन त्याच्या पायऱ्यावर कचरामाती जमा झाल्याने त्याची केवळ वरील चौकट व काही पायऱ्या पहायला मिळतात. बुरुजातील दरवाजाने बाहेर पडल्यावर आपली गढीची फेरी पुर्ण होते. गावाच्या खालील बाजुस कुकडी नदीच्या दिशेला एक मध्ययुगीन शिवमंदिर आहे. या मंदिराकडे जाताना वाटेवर एका मध्यम आकाराच्या दगडी मंदीरात मिशी असलेला व पनवतीला पायाखाली दाबलेला चपेटदान आवेशातील पेशवेकालीन हनुमान मुर्ती पहायला मिळते. नदीपात्राच्या थोडे वरील बाजुस असलेल्या या मंदीराच्या आवारात नंदीमंडप असुन या मंडपाला लागून काही विरगळ व मुर्ती ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या भिंतीवर एक शिलालेख आहे पण झीज झाल्याने तो नीट वाचता येत नाही. मंदिर पाहुन झाल्यावर आपली राजापुर गावाची भटकंती पुर्ण होते.
© Suresh Nimbalkar