राजाचे कुर्ले

प्रकार : गढी

जिल्हा : सातारा

उंची : 0

श्रेणी : सोपी

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्यात सातारपासून ३४ कि.मी.वर मध्ययुगीन काळात भरभराटीस आलेले राजाचे कुर्ले नावाच गाव आहे. या गावात अक्कलकोट येथील भोसले वंशजापैकी एक असलेल्या तुळजाजी भोसले यांनी १८०७ साली बांधलेली एक गढी आहे. मराठेशाहीच्या उत्तरार्धात बऱ्याच सरदारांनी त्यांच्या प्रदेशात भुईकोटवजा गढ्या बांधल्या. यातील बरेच भुईकोट गढी हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करणे व स्वसंरक्षण यासाठी होत होता. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत आहेत. खाजगी मालकीचे हे भुईकोट व गढ्या आज मोठया प्रमाणात उध्वस्त झाले असुन इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. स्थानिकांची उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. काही प्रमाणात आजही आपले अस्तित्व टिकवुन ठेवणारी अशीच एक गढी म्हणजे राजाचे कुर्ले येथील राजे भोसले यांची गढी. ... या गढीची माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नसल्याने या गढीची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील हे गाव सातारा शहरापासुन पुसेसावळीमार्गे ४८ कि.मी.वर असुन पुसेसावळी येथुन ५ कि.मी. अंतरावर आहे. गावात प्रवेश करताना गावाच्या वेशीवरील कमान आपले लक्ष वेधुन घेते. नव्याने बांधलेल्या या कमानीत जुन्या कोटाच्या दरवाजाचे कोरीव दगड व शिल्प वापरलेली आहेत. कधीकाळी या संपुर्ण गावाला तटबंदी असुन त्या तटबंदीत दोन दरवाजे असल्याचे गावकरी सांगतात. गावाच्या मध्यभागी असलेली हि गढी म्हणजे चौबुर्जी कोट असुन चौकोनी आकाराची हि गढी एक एकरवर पसरलेली आहे. या कोटातील ३ बुरुज आजही शिल्लक असुन चौथा बुरुज मात्र काळाच्या ओघात पुर्णपणे नष्ट झाला आहे. गढीच्या आतील भागात एकुण चार वाडे असल्याचे सांगण्यात येते. यातील दोन वाडे पुर्णपणे नष्ट झाले असुन एका चौसोपी वाड्याचा फक्त चौथरा तर दुसऱ्या चौसोपी वाड्याचा चौथरा व भिंती शिल्लक आहेत. गढीचे चार भाग पडल्याने गढी पहाण्यासाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणाहुन आत जावे लागते तसेच तटबंदीला फेरी मारत गढी पहावी लागते. गढीच्या आत नव्याने बांधलेल्या घरातुन भोसले यांचे वंशज रहात असुन त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चौथा बुरुज हा मातीचा असल्याने तो फार आधीच नष्ट झाला आहे. शिल्लक असलेले तीन बुरुज मात्र घडीव दगडात बांधलेले असुन त्यांचा फांजीवरील भाग विटांनी बांधला आहे. बुरुजांच्या या बांधकामात खिडक्या तसेच बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या दिसुन येतात. बुरुजाच्या आतील बाजुने बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. एक बुरुज वगळता उर्वरित दोन बुरुजावर मोठया प्रमाणात झाडी वाढली असल्याने वरील भागात जाता येत नाही. एका बुरुजावर चढुन संपुर्ण गढी एका नजरेत पहाता येते. गढीची तटबंदी मोठया प्रमाणात नष्ट झाली असुन उर्वरीत तटबंदी पहाता या तटबंदीला फांजी नसल्याचे दिसुन येते. गढीचा मुख्य प्रवेशमार्ग दोन दरवाजांचा असुन काटकोनात या दरवाजांची रचना केली आहे. मुख्य प्रवेशद्वार पुर्वाभिमुख असुन त्याच्या आतील बाजूस राहण्यासाठी खोल्या आहेत. गढीत १ लहान व २ मोठया अशा एकुण ३ विहिरी असुन यातील एका विहिरीत हि विहीर तुळजाजी शिवाजीराजे भोसले यांनी शके १८४७ म्हणजे सन १९२५ साली बांधल्याचा शिलालेख आहे. गोलाकार आकाराची हि विहीर व त्यात तळापर्यंत उतरत जाणाऱ्या गोलाकार पायऱ्या आवर्जुन पाहण्यासारख्या आहेत. संपुर्ण गढी पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. याशिवाय गावातील धाकूबाई मंदिराजवळ असलेले प्राचीन झीज झालेले गजलक्ष्मी शिल्प, वीरगळी व भग्न शिल्पे या गावाच्या प्राचीनतेची साक्ष देतात. या मंदिराच्या आवारात असलेल्या एका घराच्या भिंतीत एक शिलालेख बसवलेला आहे. कलचुरी घराण्यातील देवनागरी लिपीत असलेला हा शिलालेख साडेआठशे वर्षे जुना असल्याचे इतिहास संशोधकांचे मत आहे. या शिलालेखाच्या सुरुवातीस धेनूशिल्प कोरलेले असुन हे शिल्प राजा व प्रजा यामधील नात्याचे प्रतिक मानले जाते. शिलालेखाच्या वरील भागात चंद्र-सुर्य कोरलेले असुन त्यापुढे शिवलींग कोरले आहे. या शिलालेखाची सुरुवात शके १०८५ सुभानु नाम संवत्सर याने झाली असुन शिलालेखावर 'सुवर्ण वृषभ ध्वज, समस्त भुवन आश्रय, श्री पृथ्वी वल्लभ, कालांजरपुरवराधिश्वर या पदव्यांनी वर्णन केलेला कलचुरी चक्रवर्ती भुजबलमल्ल देव म्हणजेच बिज्जलदेव द्वितीय याचा मांडलिक, महामंडलेश्वर, पंचमहाशब्द प्राप्त, विष्णू वंशोद्भव, जादव नारायण, जादवकुलकमल, विकसित भास्कर या पदव्यांनी गौरविलेला सिंघणदेव याने हे भूदान चंद्रग्रहणाच्या दिवशी दिल्याचा उल्लेख आढळतो. अक्कलकोटकर शहाजी भोंसले हे १७८९ ला मरण पावल्यावर त्यांचा मुलगा फतेसिंग उर्फ आबासाहेब गादीवर आले. शहाजीस तुळजाजी नांवाचा आणखी एक मुलगा होता. त्याचे व फत्तेसिंगाचें वितुष्ट आल्याने फत्तेसिंगानें तुळजाजीस कैद केले पण कैदेतून निसटुन तुळाजाजी पेशव्याकडे गेला व त्यानें पुणे दरबारी तक्रार केली. सदाशिवराव भाऊ माणकेश्वर यांच्या मध्यस्थीनें दोन्ही भावांत सलोखा होऊन तुळजाजीनें सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यांत कुर्ला वगैरे ८१०० रुपये उत्पन्नाचीं गांवें घेऊन कुर्ले येथे १८०७ सालीं स्वतंत्र गादी स्थापन केली तेव्हापासून कुर्ले गाव राजाचे कुर्ले म्हणुन ओळखले जाऊ लागले. तुळजाजी भोसले यांच्यानंतर त्यांचे पुत्र शिवाजीराजे गादीवर आले. इ.स.१८९८ सालीं अक्कलकोटकर दुसरे शहाजी निपुत्रिक मरण पावल्याने त्यांच्या पत्नीने पहिल्या शहाजीचे कुर्ले येथील वंशज गणपतजी भोंसले यांचे पुत्र फत्तेसिंग यास दत्तक घेतलें.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!