राजधेर

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ४३३० फुट

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्रात सर्वात जास्त दुर्गसंपदा नाशिक जिल्ह्याला लाभली आहे. या जिल्ह्यात सह्याद्रीच्या सेलबारी-डोलबारी, त्र्यंबक-अंजनेरी, अजंठा-सातमाळा या उपरांगेवर ६५ पेक्षा जास्त किल्ले असुन यातील चांदवड तालुक्यातून जाणाऱ्या अजंठा-सातमाळ डोंगररांगेवर कोळधेर,राजधेर, इंद्राई, चांदवड,मेसणा,कात्रा यासारखे किल्ले वसले आहेत.चांदवड तालुक्यात अजंठा-सातमाळ डोंगररांगेवर असलेला राजधेर हा एक महत्वाचा किल्ला. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले राजधेरवाडी गाव चांदवड या तालुक्याच्या ठिकाणापासुन १० कि.मी. अंतरावर तर नाशिक शहरापासुन ७० कि.मी. अंतरावर आहे. हे गाव राजधेर व इंद्राई किल्ल्याच्या कुशीत वसलेले असुन राजधेरवाडीत प्रवेश करताना उजव्या बाजुस राजधेर किल्ला व डाव्या बाजुस इंद्राई किल्ला नजरेस पडतो. राजधेरवाडी गावातुन शाळेच्या थोडे पुढे जाउन उजवीकडून किल्ल्याखाली असलेल्या पठारावर जाण्यासाठी कच्चा रस्ता असुन तेथुन पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी ठळक पायवाट आहे. ... याशिवाय कोळधेर-राजधेर भटकंती करताना खाली राजधेरवाडी गावात न उतरता पठारावरून थेट किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते. राजधेरवाडी गावातुन कोळधेर-राजधेर अशी दोन गडांची भटकंती एका दिवसात सहजपणे करता येते. राजधेर वाडीतुन किल्ल्याच्या पायथ्याशी जाईपर्यंत सावलीसाठी कोणतेही झाड नसल्याने शक्यतो सकाळी लवकरच चढाई सुरु करावी. वाट पूर्णपणे मळलेली असुन काही ठिकाणी वाट समजण्यासाठी दिशादर्शक चुना फासलेला आहे. किल्ल्याच्या वाटेवर झाडी नसल्याने चुकण्याची शक्यता नाही. या वाटेने जाताना किल्ल्याखाली असलेल्या पठाराचे दोन टप्पे पार करून जावे लागते. यातील पहिल्या टप्प्यावरील पठारावर आपल्यला चारही बाजूस कोरलेली स्तंभाच्या आकाराची एक विरगळ पहायला मिळते. पठाराच्या दुसऱ्या टप्प्यात किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर काही ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या आहेत. यात एका ठिकाणी उध्वस्त बुरुजाचा खालील गोलाकार भाग व एका वास्तुचा चौथरा पहायला मिळतो. हे ठिकाण म्हणजे किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवरील मेट असावे. येथुन किल्ल्याच्या कातळकड्यालगत किल्ल्यावर जाण्यासाठी असलेली शिडी नजरेस पडते. या शिडीच्या दिशेने वाटचाल करताना काही ठिकाणी खडकात खोदलेल्या पायऱ्या पार करत आपण किल्ल्याच्या कातळकड्यापाशी पोहोचतो. राजधेरवाडीतुन इथवर येण्यास साधारण दीड तास लागतो. या ठिकाणी किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या ब्रिटीशांनी सुरुंग लावुन तोडल्याने गावकऱ्यांनी किल्ल्यावर जाण्यासाठी साधी लोखंडी शिडी बसवली होती. पण आता वनखात्याने येथे ४० फुट उंचीची भक्कम शिडी नव्याने बसवलेली आहे. शिडीशिवाय वर चढणे कठीण आहे. शिडीच्या थोडे अलीकडे उजव्या बाजूस कातळात दोन दालन असलेली एक भली मोठी गुहा आहे. या गुहेत उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन आतील भागात कमानीवजा दगडी बांधकाम केले आहे. सध्या या गुहेत पाणी साठलेले असुन स्थानीक लोक या गुहेला घोडयांची पागा म्हणुन ओळखतात. गुहा पाहुन शिडीने चढुन गेल्यावर आपण थेट किल्ल्याच्या ढासळलेल्या पुर्वाभिमुख दरवाजात पोहोचतो. या दरवाजाच्या बाहेरील बाजुस डावीकडे असलेल्या बांधकामात पर्शियन भाषेतील शिलालेख कोरलेला दगड बसवलेला आहे. या शिलालेखात अलावर्दीखानाने चांदवड, इंद्राई किल्ल्यासोबत राजदेहेर किल्ला जिंकल्याचा उल्लेख आहे. येथुन किल्ल्यावर जाणारा प्रवेशमार्ग पुर्णपणे कातळात कोरलेला असुन दरवाजाचा आतील भाग देखील कातळात कोरलेला आहे. येथुन कातळात तिरकी खाच मारत कोरलेल्या पायऱ्यांनी सावधपणे वर जाताना डाव्या बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्यासाठी कातळात कोरलेल्या दोन गुहा पहायला मिळतात. यातील एक गुहा अर्धवट कोरलेली आहे. पायऱ्यांच्या टोकाला किल्ल्याचा दुसरा उध्वस्त उत्तराभिमुख दरवाजा असुन या दरवाजाच्या आसपासच्या भागात किल्ल्याची तटबंदी व इतर बांधकाम पहायला मिळते. हे बांधकाम मोठ्या प्रमाणात गाडले गेले आहे. या दरवाजातुन आपला गडाच्या माचीवर प्रवेश होतो. राजधेर किल्ला माची व बालेकिल्ला असा दोन भागात विभागलेला असुन गडाचा परीसर दक्षिणोत्तर १२ एकरवर पसरलेला आहे. बालेकिल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासुन ३९५० फुट आहे. माचीवर आल्यावर तीन वाटा फुटतात. एक वाट सरळ बालेकिल्ल्याच्या कातळ टेकडीच्या दिशेने तर उरलेल्या दोन वाटा डावीकडे व उजवीकडे माचीवर जातात. आपल्याला प्रथम किल्ल्याची माची फिरायची असल्याने उजवीकडची वाट पकडायची. या भागात मोठया प्रमाणात असलेले वास्तु अवशेष पहाता येथे किल्ल्याची मुख्य वस्ती असावी. या ठिकाणी तीन कमानी असलेली इमारत असुन मुघल शैलीतील बांधकाम असलेली हि वास्तु आजही सुस्थितीत आहे. या इमारतीच्या परिसरात खुप मोठया प्रमाणात घरांचे चौथरे आहेत. माचीच्या शेवटी किल्ल्याचे उत्तर टोक असुन या टोकाला बुरुज बांधलेला आहे. या बुरुजावर ढालकाठीची म्हणजेच ध्वजस्तंभाची जागा आहे. माची पाहुन सुरवातीच्या ठिकाणी येऊन डावीकडची वाट पकडायची. या ठिकाणी मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असुन अनेक अवशेष या झाडीत लपलेले आहेत. वाटेच्या सुरवातीच्या भागात हमामखाना असुन या हमामखान्याच्या वरील बाजुस असलेल्या गोलाकार झरोक्यातून एक मोठे पिंपळाचे झाड उगवलेले आहे. त्याच्या पुढील बाजुस वाडयाच्या भिंती असुन आत एक थडगे आहे. हे पाहुन मागे फिरावे व सरळ जाणाऱ्या वाटेने कातळावर चढावे. या वाटेवरून थोडे पुढे गेल्यावर कातळात जमिनीखालील पातळीत खोदलेली दोन दालने असलेली मोठी गुहा आहे. हि गुहा जमिनीच्या पातळीत खोदलेली असल्याने जवळ जाईपर्यंत दिसत नाही. सध्या येथे एका बाबांचे वास्तव्य असुन त्यांनी हि गुहा साफसफाई करुन नीटनेटकी ठेवली आहे. गुहेत उतरण्यासाठी लाकडी शिडी लावलेली आहे. गुहेच्या डाव्या बाजुस काही अंतरावर कातळात खोदलेले लहान चौकोनी टाके असुन या टाक्याचा वरील भाग दगडी भिंत व त्यावर घुमट बांधुन बंदीस्त करण्यात आला आहे. या वास्तुत शिरण्यासाठी एक लहान दरवाजा ठेवलेला आहे. हि वास्तु नेमकी काय असावी याचा बोध होत नाही. मंदिराच्या थोडे पुढे गेल्यावर दोन खांबावर तोललेली अजुन एक गुहा आहे. सध्या या गुहेत पाणी साठलेले आहे. गुहा पाहुन परत बंदीस्त टाक्याकडे यावे. या टाक्याकडून समोर झुडपात जाणारी वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने जाते. या वाटेच्या सुरवातीला एक खुप मोठा बांधीव तलाव असुन या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. तलावाच्या काठावर सहजपणे नजरेस न पडणारी एक लहान गुहा असुन या गुहेत शिवमंदिर आहे. या गुहेच्या तोंडावरील कमान विटांनी बांधलेली आहे. तलावाच्या वरील बाजुने बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर झुडपात लपलेल्या ११ लहान मोठया टाक्यांचा समुह पहायला मिळतो. यातील आठ टाकी कातळात कोरलेली खांबटाकी आहेत. या टाक्याकडून पश्चिम टोकाकडे जाताना बालेकिल्ल्याच्या पोटात खोदलेल्या गुहांचा समुह पहायला मिळतो. या गुहांच्या तोंडाकडील भागात कातळात व्हरांडा कोरलेला असुन या गुहेकडे जाण्याचा मार्ग देखील कातळात कोरलेला आहे. या गुहेच्या पुढील बाजुस कातळात कोरलेले पण मातीने बुजलेले एक टाके आहे. वाटेच्या उजवीकडे खालील बाजुस माचीवर किल्ल्याची साधारण १०० फुट लांब एकसंध तटबंदी व या तटबंदीत असलेल्या टेहळणीच्या जागा पहायला मिळतात. या तटबंदीतुन खाली उतरण्यासाठी एक लहान दरवाजा आहे. या दरवाजाबाहेर जाता येते पण पुढील वाट नष्ट झाल्याने खाली उतरता येत नाही. येथुन बालेकिल्ल्याचा खडा चढ चढुन आपण किल्ल्याच्या सर्वोच्च भागात पोहोचतो. बालेकिल्ल्याच्या या भागात पाण्याने भरलेली दोन मोठी टाकी व दोन अर्धवट बुजलेली टाकी याशिवाय एका वास्तुचा चौथरा व अर्धवट शिल्लक असलेली भिंत पहायला मिळते. शिडीपासुन सुरवात केल्यानंतर संपुर्ण गडमाथा फिरण्यास २ तास लागतात. गडमाथ्यावरुन सटाणा,मालेगाव,चांदवड हि शहरे तसेच चांदवड, कांचन मांचन, मांगीतुंगी, न्हावीगड,कोळधेर,इंद्राई, धोडप,साल्हेर,चौल्हेर हे किल्ले दिसतात. बालेकिल्ल्याच्या पुर्व बाजुने खाली उतरताना कातळात कोरलेले अजून एक टाके पहायला मिळते. प्राचीन काळापासुन उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना चांदवड हा एक महत्वाचा घाटमार्ग होता. त्यामुळे या घाटमार्गावर नजर ठेवण्यासाठी चांदवडचा किल्ला बांधला गेला व त्याच्या सरंक्षकफळीत राजधेर, इंद्राई, कोळधेर व मेसणा या किल्ल्यांची निर्मिती केली गेली. चांदोर पर्वतरांगेत असलेले राजधेर किल्ल्याचे स्थान पहाता त्याचे महत्व लक्षात येते. गडाचा कातळात कोरलेला मार्ग व गडावरील खांबटाकी,गुहा गडाच्या प्राचीनतेची साक्ष देतात. किल्ल्यावरील पाण्याची टाकी व इतर अवशेष पहाता या किल्ल्यावर मोठया प्रमाणात वस्ती असावी. दरवाजाजवळ असलेल्या शिलालेखानुसार निजामशहाच्या ताब्यात असलेला हा किल्ला इ.स. १६३६ च्या जुन महीन्यात शहाजहान बादशहाचा सरदार अलावर्दीखान याने लढाई करून जिंकला. १५ एप्रिल १८१८ रोजी चांदवड किल्ला जिंकल्यावर कॅप्टन म्याकडॉवेल याने तोफांचा मारा करत राजधेर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उध्वस्त केला व किल्ला ताब्यात घेतला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!