रांझे

प्रकार : गढी

जिल्हा : पुणे

उंची : 0

श्रेणी : सोपी

शिवचरित्रात असलेल्या अनेक महत्वाच्या घटनांपैकी एक घटना म्हणजे शिवरायांनी केलेला रांझे पाटलांचा निवाडा. बदअंमल केल्याप्रकरणी महाराजांनी रांझे पाटलांचा चौरंग करण्याची शिक्षा सुनावली होती. रांझे पाटील पुण्याजवळील रांझे गावचे असल्याने त्यांचा या गावात आजही वाडा असावा या समजुतीने तोरणा किल्ल्याच्या भटकंतीत संध्याकाळ प्रवासात न घालवता आम्ही रांझे पाटलांचा वाडा पाहण्याचे ठरवले. रांझे गाव पुण्यापासून २५ कि.मी.अंतरावर असुन खेड-शिवापूर येथुन २ कि.मी.अंतरावर आहे. तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावापासुन हे अंतर ३४ कि.मी.असले तरी हा रस्ता फारसा सोयीचा नसल्याने महामार्गावरून खेड शिवापूर येथे पोहोचुन रांझे गावात जाणे जास्त सोयीचे आहे. रांझे गावास भेट दिली असता रांझे पाटलाचा वाडा काय त्याचा एक दगडसुद्धा आज जागेवर शिल्लक नाही. हा वाडा आज पुर्णपणे भुईसपाट झाला असुन त्याजागी आज आमराई उभी राहिली आहे. पण आमची रांझे गावची फेरी व्यर्थ गेली नाही कारण रांझे पाटलांचा वाडा गावात नसला तरी होळकरांचे दिवाण रांझेकर यांचा वाडा मात्र अवशेष रुपात आम्हाला रांझे गावात पहायला मिळाला. या वाड्याच्या अंतर्गत भागाची पडझड झालेली असली तरी त्याच्या चारही बाजुच्या भिंती मात्र शिल्लक आहेत. ... वाड्याचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असुन आजही त्याच्या कमानीसकट ताठ मानेने उभा आहे. या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक आहेत. दरवाजाने आत शिरल्यावर दोन्ही बाजुस दालनांचे चौथरे असुन वाड्याच्या आतील भिंतीचा भाग नजरेस पडतो. या भिंती पहाता कधीकाळी हा वाडा तीन मजली असल्याचे दिसुन येते. या भिंतीचा पहिल्या मजल्यापर्यंतचा भाग घडीव दगडात बांधलेला असुन त्यावरील भाग विटांनी बांधलेला आहे. या दोन्ही मजल्यावरील भिंतीत अनेक कोनाडे बांधलेले आहेत. वाड्याच्या दर्शनी चौकात मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे. वाड्याच्या काही भागात नव्याने बांधलेल्या खोल्या असुन तेथे वृद्धाश्रम चालवला जातो. वाडयाच्या मागील भागात घडीव दगडात बांधलेला चौक आजही शिल्लक असुन त्यात तुळशी वृंदावन बांधलेले आहे. येथुन वाडयाच्या दुसऱ्या भागात जाण्यासाठी दरवाजा असुन या भागात चौकोनी आकाराची पायविहीर आहे. येथुन वाड्याबाहेर जाण्यासाठी भुयारी मार्ग असुन या वाटेने आपण वाड्याबाहेर असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिरात पोहोचतो. सुमारे दोनशे वर्षापुर्वी बांधलेले हे मंदीर चारही बाजूने प्रकारच्या भिंतीत बंदीस्त असुन रांझेकर यांची खाजगी मालमत्ता आहे. मंदीराच्या दर्शनी भागात दीपमाळ असुन आतील बाजुस गरुडाची मुर्ती आहे. मंदिराचे मुखमंडप –सभामंडप – गर्भगृह असे भाग पडलेले असुन आत विष्णु व लक्ष्मी यांच्या मुर्ती स्थापन केलेल्या आहेत. मंदीर पाहुन चौकात आल्यावर आपली वाड्याची फेरी पुर्ण होते. या वाड्याबाहेर पश्चिम बाजुला आपल्याला रांझेश्वर महादेवाचे पेशवेकालीन मंदिर पहायला मिळते. या मंदीरात पुष्करणी प्रमाणे पाण्याची तीन कुंडे बांधलेली आहेत. या मंदीराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हनुमानाचे मंदिर आहे. रांझेकर यांचा वाडा व मंदीर परिसर पहाण्यास एक तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!