रसाळगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रत्नागिरी

उंची : १७४० फुट

श्रेणी : सोपी

उत्तरदक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर असलेल्या एका उपरांगेवर महिपतगड, सुमारगड व रसाळगड हे दुर्गत्रिकुट वसले आहे. जावळीच्या खोऱ्यात वसलेल्या या दुर्गत्रिकुटाची भटकंती म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. या त्रिकुटातील रसाळगड हा किल्ला दक्षिणेला सर्वात शेवटी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अवशेषसंपन्न गिरीदुर्गांत रसाळगडाचा क्रमांक सर्वात वर लावता येईल इतके अवशेष या गडावर आहेत. दक्षिणोत्तर पसरलेल्या या गडाचे क्षेत्रफळ साधारणपणे २७ एकर इतके असुन गडाची उंची समुद्रसपाटीपासून १६०० फुट तर पायथ्यापासून १२०० फुट आहे. मुंबई-गोवा रस्त्यावरील खेडच्या भरणा नाक्यापासून १८ कि.मी.अंतरावर रसाळगडाचा पायथा आहे. रसाळगडाच्या पायथ्यापर्यंत जायला पक्का रस्ता असून किल्ल्याच्या पायऱ्याजवळ गाडी लावता येते. इथून थेट माथ्याकडे जायची वाट लागते. ... नुकत्याच बांधलेल्या या पायऱ्यांच्या सुरवातीला एक प्लास्टिकची पाण्याच्या टाकी असुन या टाकीत गडावरील पाणी नळाने खाली आणुन ते गडाखालील घेरा रसाळगड वाडीत पुरवलेले आहे. महीपत-सुमारगडावरून येणारी वाट या खिंडीतच रसाळगडला मिळते. इथून किल्ल्याकडे नजर टाकली की किल्ल्याचे दोन दरवाजे नजरेस पडतात व रसाळगडचे सुंदर दर्शन होते. गडाच्या पहिल्या दरवाजाच्या उजव्या बाजुस एक नैसर्गिक बुरुज आहे. टाकीपासून पुरातत्त्व खात्याने अलीकडेच बांधलेल्या पाय-यांच्या वाटेने आपण वीस मिनिटात गडाचे तीन दरवाजे पार करून माथ्यावर दाखल होतो. गडाच्या पहिल्या दरवाजा बाहेर डाव्या बाजूस एक छोटीशी वाट गेली आहे. या वाटेने गेल्यास आपल्याला तटाबाहेरच एक भुमिगत टाके व टेहळणी करणाऱ्याला बसण्यासाठी खडकात खोदलेली खोली पहायला मिळते. गडाच्या पहिल्या दरवाजातून आत आल्यावर दुस-या दरवाजाकडे जाताना वाटेत मिशा असलेल्या आणि कमरेला खंजीर लावलेल्या मारुतीचे शिल्प पहायला मिळते. येथुन पुढे जाताना एका पायरीवर विरगळ शिल्प आढळून येते. थोड पुढे गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो. गडाखालुन टोकाला दिसणारा तो हाच दरवाजा असुन दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस वर दरवाजावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. येथुन पुढील भागात गडाचा पुर्णपणे उध्वस्त झालेला तिसरा दरवाजा असुन या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटावर एक भली मोठी तोफ दिसते तर उजव्या बाजुस साचपाण्याची तीन टाकी दिसुन येतात. दरवाजाच्या उजव्या बाजुस असणारा बुरुज पीरबुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजावर एक कबर असुन या कबरीला लागुनच एक उध्वस्त मुर्ती ठेवली आहे व शेजारी एक तोफ पडलेली आहे. या बुरुजावरून रसाळगडाचा प्रचंड विस्तार नजरेस पडतो. संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठारच आहे. गडाच्या तटबंदीवर फेरी मारताना ठिकठिकाणी तटावर व बुरुजावर तोफा पडलेल्या दिसतात. गडावर पसरलेल्या लहानमोठया १६ तोफा हे या किल्ल्यांचे वैशिष्ट आहे. यातील काही तोफांवर इंग्रजी अक्षरे व चिन्हे कोरली आहेत. गडाच्या मध्यभागी अलीकडील काळात जीर्णोद्धार केलेले झोलाई देवीचे मंदिर आहे. पीरबुरुजावरून झोलाई मंदिराकडे जाताना दोनही बाजुस ढासळलेली तटबंदी,घरांचे अवशेष, साचपाण्याची टाकी व काही तोफा दिसुन येतात. मंदिराच्या समोरील भागात जुन्या मंदिराचे लाकडी कोरीवकाम असलेले खांब पहायला मिळतात. मंदिराच्या आतील कोनाड्यात अनेक सापडलेल्या मुर्ती ठेवल्या आहेत. मंदिराचा गाभारा दगडी बांधकामात असुन त्यात झोलाई,वाघजाई व भैरवाची मुर्ती आहे. रात्रीच्या मुक्कामास हे मंदीर उपयुक्त आहे. गडावर दर तीन वर्षांनी झोलाई देवीची जत्रा भरते. मंदिराच्या समोर दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. मंदिराच्या आवारात दोन लहान तोफा, सतीशीळा व काही प्राचीन मुर्ती पहायला मिळतात. मंदिराच्या मागील बाजूस एक गणपतीची घुमटी असुन यातील गणपतीची मूळ मुर्ती भग्न झाल्याने घुमटीच्या मागील बाजुस ठेवलेली आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याची दोन मोठी तळी असुन यातील एका तळ्यात पिण्यायोग्य पाणी वर्षभर असते. मंदिरामागे पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवटा असलेला १४० x १७० फुट आकाराचा ६ बुरुजांचा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा ढासळलेला असुन तुटलेल्या तटबंदीतुन आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. बालेकिल्ल्याच्या उत्तरेकडील तटबंदीत एक लहानसा दरवाजा आहे. बालेकिल्ल्याच्या एका बुरूजावर ३ तोफा असुन आतील भागात वाड्याचे व सदरेचे अवशेष आहेत. बालेकिल्ल्याच्या बाहेर उत्तर दिशेला पाण्याची चार टाकी तर मागील पठारावर अजुन एक मोठे तळे आहे. या पठारावर एक तोफ असुन घरांचे विखुरलेले अवशेष दिसतात. पठाराच्या टोकाला माचीपासून किंचित सुटावलेला एक बुरुज आहे. इथुन गडाच्या दक्षिण दिशेला असलेल्या माचीकडे निघाल्यावर सर्वप्रथम कातळात कोरलेली तटाबाहेर जाणारी वाट दिसते. हा गडाचा दुसरा दरवाजा अथवा चोरवाट असावी. येथून पलीकडे एक दगडी बांधकामातील २० x ६० फुट आकाराचे तीन दरवाजाचे चांगल्या अवस्थेत असणारे कोठार दिसते. हे धान्य कोठार असावे असे वाटते. कोठाराच्या दोन दरवाजाच्या दगडी चौकटीत वरील बाजुस गणपतीचे तर खालील बाजुस मानवी मुख व नक्षी कोरलेली आहे. मंदिराशिवाय येथे देखील ५० माणसे सहज राहु शकतात. या कोठाराच्या आवारात एक तुटलेली तोफ जमिनीत उलटी पुरलेली दिसुन येते. तोफेशेजारी काही वास्तूंचे अवशेष विखुरलेले आहेत. येथुन थोड पुढे गेल्यावर माचीच्या उजव्या बाजुला थोडेसे खाली उघड्यावर एक शिवलिंग व नंदी तसेच झिजलेलं गजलक्ष्मी शिल्प दिसुन येते. येथुन पुढील वाट आपल्याला माचीच्या टोकावर घेवून जाते. जाताना वाटेत पाण्याची टाकी व काही वीरांच्या समाध्या दिसतात. माचीच्या दक्षिण टोकाला एक भक्कम बुरुज असुन इथून एक सोंड खाली उतरते. या सोंडेखाली एक खांबटाके असुन तिथपर्यंत जायचा रस्ता खूप अवघड आहे. इथे आपली गडप्रदक्षिणा पुर्ण होते. संपूर्ण गडफेरीस दोन तास लागतात. किल्ल्याच्या माथ्यावरून पश्चिमेकडे पालगड व मंडणगड,महाबळेश्वरच्या डोंगररांगा, सुमारगड आणि महिपतगड. इशान्येकडे मकरंदगड तर आग्नेय दिशेला वासोटा व नागेश्वराचे सुळके इतका मोठा प्रदेश नजरेस पडतो. गडावर असणारे तीन मोठे तलाव, सात मध्यम आकाराची टाकी व दहाबारा लहान टाकी तसेच गडावर मोठया प्रमाणात विखुरलेले अवशेष यावरून गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी. पुरातत्त्व खात्याने गडावर बरीच डागडुजी केली आहे. बालेकिल्ला आणि झोलाईदेवी मंदिर यामध्ये असलेले दोन्ही तलाव तसेच गडावर येणाऱ्या पायऱ्या बांधून काढल्या आहेत. गडाचा इतिहास मोठया प्रमाणावर उपलब्ध नाही. रसाळगड तेराव्या शतकात बहामनी राजवटीत बांधला अन् १६६०च्या कोकण मोहिमेत रसाळ-सुमार-महीपत हे दुर्गत्रिकुट शिवरायांनी स्वराज्यात आणलं. पुढे सन १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे यांनी रसाळगड घेतला. नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रे कडून सर्व किल्ले घेतले पण रसाळगड मात्र राहिला. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळगड मराठयांच्या ताब्यात आला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!