रनाळे
प्रकार : गढी
जिल्हा : नंदुरबार
उंची : 0
श्रेणी : सोपी
अदीवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी एक दोन नव्हे तर तब्बल १७ किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी या स्वरुपात अस्तित्वात होते. आजच्या संगणकाच्या युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व किल्ल्यांचा अभ्यासपुर्ण दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. यातील हटमोईदा व अष्टे या दोन गढी पुर्णपणे नष्ट झालेल्या असुन उरलेले १५ गढीकिल्ले त्यांचे उर्वरित अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आजही उभे आहेत. या १५ किल्ल्यात १ गिरिदुर्ग असुन ३ भुईकोट २ नगरकोट तर उरलेल्या ९ गढी आहेत. स्थानिकांची उदासीनता या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. रनाळा गढी हे त्याचेच एक उदाहरण आहे. खानदेश प्रांत साडेबारा रावळाचे वतन म्हणुन देखील ओळखला जातो. रावळ हि येथील कुळांना मिळालेली पदवी असुन या रावळात सिसोदिया, सोळंकी, परमार, प्रतिहार अशी वेगवेगळी कुळे आहेत.
...
हि साडेबारा वतन म्हणजे १.दोंडाईचा २.मालपुर ३.सिंदखेडा ४.आष्टे ५.सारंगखेडा ६.रंजाणे ७.लांबोळा ८.लामकानी ९.चौगाव १०. हटमोईदा ११.रनाळा १२.मांजरे १३.करवंद हे अर्धे वतन खानदेशात व अर्धे खानदेश बाहेर असल्याने अर्धे वतन म्हणुन ओळखले जाई. यातील आष्टे, लांबोळा, चौगाव, हटमोईदा या ४ गढी पुर्णपणे नष्ट झालेल्या असुन ४ गढी आजही त्यांच्या मूळ रुपात शिल्लक आहेत तर उरलेल्या ५ गढी त्यांचे अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आहेत. यात रनाळा गढीचा समावेश होतो. रनाळा गढी नंदुरबार शहरापासुन १५ कि.मी. अंतरावर आहे. रनाळा गावातील शानि मंदिराकडून एक रस्ता सरळ प्राथमिक आरोग्यकेंद्राकडे जातो. या आरोग्यकेंद्राच्या कुंपणाला लागुनच रनाळा गढीचा मुख्य अवशेष असलेला एकमेव बुरुज उभा आहे. शिल्लक बुरुजाची उंची साधारण १५ फुट असुन बुरुजाचे खालील बांधकाम घडीव दगडात केलेले असुन वरील बांधकाम विटांमध्ये केले आहे. बुरुजाच्या पुढील भागात असलेल्या जुन्या प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या आवारात एक जुनी विहीर असुन या विहिरी शेजारील उंचवट्यावर चुन्याने बांधलेली पाण्याची टाकी आहे. या टाकीतील पाणी बहुदा खापरी नळाने गढीत फिरवले असावे. या विहिरीच्या आसपास काही घडीव दगड दिसुन येतात. गढीची तटबंदी पुर्णपणे नष्ट झाल्याने गढीच्या आकाराचा अंदाज करता येत नाही. गढीचे अवशेष पहाण्यास दहा मिनिटे पुरेशी होतात. गढीच्या पुढील बाजूस असलेल्या नदीच्या काठावर एक जुने शिवमंदीर दिसुन येते. आज या गढीचा एक बुरुज, पाण्याची विहीर व टाकी वगळता कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत त्यामुळे हि गोष्ट ध्यानात ठेवुनच या ठिकाणाला भेट दयावी. १३ व्या शतकात सोळंकी सरदार सुजानसिंह रावल यांनी सोनगिरी किल्ल्यावर हल्ला करून तो ताब्यात घेतला. त्यांचे वंशज केसरीसिंह यांचा मुलगा मोहनसिंह याने तोरखेड़ा गढ़ी बांधली व जवळपास २२५ गावावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले त्यात रनाळे गावाचा समावेश होता. थोरले बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत कांताजीराव कदमबांडे यांनी गुजरात मोहिमेत पराक्रम गाजवला. त्यावेळी या रावळाचे वतन असलेला धुळे, रनाळा, कोपर्ली, तोरखेड हा भाग त्यांना जहागिरी म्हणून मिळाला. वेळोवेळी सत्ताबदल झाले तरी या रावळाचे अधिकारात त्या त्या काळातील सत्ताधीशांनी कोणतेही बदल केले नाही.
© Suresh Nimbalkar