रत्नदुर्ग

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : रत्नागिरी

उंची : १८० फुट

श्रेणी : सोपी

कोकणामधील रत्नागिरी शहराला धार्मिक, सांस्कृतीक तसेच ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे. लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान, सावरकर स्मारक, ऐतिहासिक पतितपावन मंदिर, विठ्ठल मंदिर, भाटेचा समुद्रकिनारा, नारळ संशोधन केंद्र, मत्स्यालय, मांडवी जेट्टी यासारख्या ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटकांची वर्दळ येथे वर्षभर सुरू असते. या रत्ना गिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. सिंधुसागराच्या काठावर असलेल्या एका डोंगरावर रत्न‍दुर्ग बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार साधारणपणे घोडयाच्या नालेसारखा असून याचा परिसर १२० एकरपेक्षा जास्त भूभागावर पसरला आहे. किल्ल्याची रचना माची व बालेकिल्ला अशी दोन भागात विभागलेली आहे. शहराच्या पश्चिमेला असलेल्या समुद्रातील भुशीरावर तीन टेकडय़ा आहेत. या तीन टेकडय़ा पैकी दोन टेकडय़ा पुर्वेकडे असून एक पश्चिमेकडे आहे. ... पश्चिमेकडे समुद्राच्या दिशेने असलेल्या टेकडीवर बालेकिल्ला उभारला असून पूर्वेकडील उर्वरित दोन टेकड्यांच्या आधारे माचीची रचना केली आहे. या दोन्ही टेकड्यावर तटबंदी उभारून त्यात बुरुज बांधलेले आहेत. आता आपण ज्या रस्त्याने किल्ल्यात प्रवेश करतो तो डोंगर व तटबंदी फोडून आत आणलेला आहे. या रस्त्याच्या उजव्या बाजुस काही अंतरावर उंचावर किल्ल्यात प्रवेश करण्याचा मुल मार्ग असुन त्यातील दरवाजा आजही शिल्लक आहे. गाडी रस्त्याने ही लहानशी खिंड पार केली की उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता टेकडीवर जातो. या कच्च्या रस्त्याने पाच मिनिटात आपण किल्ल्याच्या तटबंदीवर पोहोचतो. मुख्यप्रवेशद्वाराची आतली बाजू आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेरील भागही उत्तमपैकी बंदिस्त केलेला असून तेथे लहान दरवाजा ठेवलेला आहे. या प्रवेशद्वाराच्या आत मारुतीचे लहानसे मंदिर आहे. मंदिराचा दरवाजा दक्षिणेकडे असून मुर्ती मात्र पश्चिमेकडे तोंड करुन आहे. मंदिराच्या मागील बाजूने दरवाजावर जाण्यासाठी पायर्यां चा मार्ग आहे. दरवाजाच्या वर गेल्यावर मोठा आणि लहान असे दोन्ही दरवाजे तसेच त्याच्या भोवतालची तटबंदी पहायला मिळते. या तटबंदीवरुन उत्तरेकडे चालत जाता येते. ही पायवाट रुंद असून ती दुरुस्त केलेली असल्यामुळे फिरण्यास सोयीची आहे. या भागातून पुर्वेकडील रत्नागिरी शहराचे तसेच समुद्राचे दर्शन होते. येथून बालेकिल्लाही उत्तम दिसतो. भगवती बंदराचे दर्शन मोहवून टाकते. या तटबंदीवर फिरुन आपण पुन्हा प्रवेशव्दाराजवळून खाली खिंडीतील गाडी मार्गावर यायचे. थोड पुढे गेल्यावर लगेचच एक गाडीमार्ग डावीकडे वर चढतो. तटबंदीच्या फांजीवरुन जाणारा हा गाडीमार्ग डांबरी केलेला आहे. या रस्त्याने तटबंदीच्या कडे कडेने दीपगृहापर्यंत जाता येते. दीपगृह सायंकाळी ४ ते ५ या वेळेत पहाण्यासाठी खुले असते. येथे ५ तोफा असून येथील बुरुजाला सिद्ध बुरुज म्हणतात. हा परिसर पाहून आपण पुन्हा मुळ रस्त्यावर येतो. येथुन समोरच असलेल्या बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले असते. प्रवेशव्दाराजवळच उपहारगृह असून तेथे चहापानाची व्यवस्था होऊ शकते. काही पायर्याप चढून आपण बालेकिल्ल्यामधे प्रवेश करताना दोन्ही बाजुंना दोन मंदिरांच्या घुमटी आहेत व समोर भगवतीदेवीचे देखणे मंदिर आहे. शिवकालीन असलेल्या या मंदिराचा आजवर तीन वेळा जिर्णाद्धार केलेला आहे. १६९० मध्ये कान्होजी आंग्रे यांचे वडील शेखोजी आंग्रे यांनी भगवती देवीसाठी घुमट बांधला. नंतर १७०० मध्ये शाहू महाराजांनी बावडेकर संस्थानचे रामचंद्रपंत नाईक परांजपे यांना मंदिरासाठी आर्थिक मदत दिली. त्यावेळी भगवती देवीचे मंदिर बांधले गेले. या मंदिराचा दुसरा जीर्णोद्धार १९४१ मध्ये रत्नागिरीतील कै. भागोजीशेठ बाळोजी कीर यांनी केला. त्यानंतर १९८८-८९ मध्ये पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या दारात सरखेल कान्होजी आंग्रे यांचा पुतळा आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारही बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते. हाच तो तीन तोंडाचा भुयारी मार्ग. मंदिराच्या जवळ असलेले ते भुयार तीनशे फूट खोल आहे. भुयाराचा शेवट खाली समुद्रकिना-याजवळ होतो. आज हा भुयारी मार्ग वापरात नसला तरी दीपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येतांना लागणाऱ्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट खाली समुद्रकिनाऱ्यावर ज्याठिकाणी होतो तेथे असलेली एक प्रचंड गुहा स्पष्ट दिसते ती बंद करण्यात आली आहे. इथुन पुढे गेले असता समुद्राचे मनोरम दर्शन घडवणारा एक बुरूज लागतो. या बुरुजाचे नाव रेडे बुरूज असून यावर एक स्तंभ उभारला आहे. किल्ल्यात एक लहान तळे व एक खोल विहीर आहे. बालेकिल्ला आटोपशिर आकाराचा असून फारसे वास्तुविशेष नसल्यामुळे अर्ध्या तासात तटबंदीवरुन पुर्ण फेरी मारता येते. गडावरुन अथांग पसरलेल्या सागरात विहरत असलेल्या बोटी आपले लक्ष वेधून घेतात. रत्नदुर्गाचा देखणा बालेकिल्ला आणि दूरपर्यंत दिसणारा सागर किनारा आपल्या स्मरणात रहाण्यासारखाच आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा बंदर आणि शंकराचे श्री भागेश्र्वर मंदिर आहे. भागेश्वर मंदिर कै.भागोजीशेठ कीर यांनी बांधले. मंदिरातील कलाकुसर प्रेक्षणीय असुन मंदिराच्या खांबांवर पशुपक्ष्यांची सुंदर सुंदर चित्रे कोरलेली आहेत. गाभाऱ्यात शंकराची पिंड असून मंदिराचा सभामंडप भव्य आहे. मंदिराचे बांधकाम हा स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या सभोवती नारळी, पोफळी व फुलझाडांनी बहरलेली बाग आहे. परिसरातील रम्य वातावरणामुळे मंदिराचे सौंदर्य खुलून दिसते. खालच्या आळीत कालभैरवाचे मंदिर आहे. मंदिर कान्होजी आंग्रे यांचे पुत्र सेखोजी आंग्रे यांच्या काळात बांधले गेल्याचे सांगितले जाते. मंदिराचा परिसर रम्य आहे. किल्ल्यावरून उतरल्यावर निवांतपणे काही क्षण तेथे घालवता येतात. बहामनी राजवटीत बांधणी करण्यात आलेला हा किल्ला पुढे आदिलशहीच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७० साली तो शिवशाहीमधे आणला. त्याची डागडुजी करुन तो लष्करीदृष्टय़ा भक्कम केला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी १७९० साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबुती आणली. छत्रपती संभाजीराजांनी रत्नदुर्गास भेट दिली होती. करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात असलेल्या रत्नदुर्ग पुढे आंग्रे घराण्याच्या ताब्यात होता. पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने रत्नदुर्गावर ताबा मिळवला. पुढे पंतप्रतिनिधी कडून १८१८ मधे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. किल्ला संपुर्णपणे पहायला चार ते पाच तास लागतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!