यमकणमर्दी
प्रकार : एकांडा बुरुज
जिल्हा : बेळगाव
उंची : 0
श्रेणी : सोपी
कोल्हापुर बेळगाव महामार्गाने बेळगावला जाताना संकेश्वरनंतर १७ कि.मी. अंतरावर महामार्गाच्या डावीकडे यमकनमर्दी हे लहान शहर आहे. महामार्गालगत असलेल्या या गावाच्या मध्यभागी आवर्जून पहावा असा साधारण ४० फुट उंचीचा आगळावेगळा बुरुज आहे. महामार्गाजवळ असलेला हा बुरुज फारसा कोणाला माहीत नसल्याने कोणीही येथे फिरकत नाही. पण दुर्गस्थापत्यातील हि अनोखी सरंचना पहाण्यासाठी दुर्गप्रेमी व अभ्यासकांनी एकदा तरी या बुरुजाला भेट दयायला हवी. संकेश्वरपासुन १६ कि.मी.वर तर बेळगावपासुन केवळ ३२ कि.मी. अंतरावर असलेला हा कोट हुक्केरी या तालुक्याच्या ठिकाणापासुन १६ कि.मी.वर आहे. महामार्गापासून साधारण १ कि.मी. आत असलेला हा बुरुज महामार्गावरून दिसत असल्याने रस्त्याचा मागोवा घेत आपण सहजपणे या बुरुजापर्यंत पोहोचतो. या बुरुजाच्या आतील भागात दोन कोठारे असुन सध्या या कोठारांचा दारू पिण्यासाठी व पत्ते खेळण्यासाठी वापर केला जात असल्याने थोडे सावधगिरीने पुढे निघावे.
...
बुरुजावर जाण्यासाठी लहान दरवाजा असुन हा दरवाजा १० फुट उंचीवर बांधलेला आहे. नंतरच्या काळात या दरवाजापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. दरवाजाच्या वरील बाजुस बुरुजाच्या टोकावर बुरुजाबाहेर बंदीस्त दगडी सज्जा असुन त्यामधुन या दरवाजापर्यंत आलेल्या शत्रूवर हल्ला करण्याची सोय केली आहे. दरवाजातुन आत शिरल्यावर कमानीदार गोलाकार पायरीमार्ग आहे. या पायरीमार्गावर प्रकाश येण्यासाठी तसेच बंदुकीचा मारा करण्यासाठी झरोके ठेवलेले आहे. पायरीमार्गावर उजव्या बाजुस एक कोठार असुन या कोठाराच्या आत अजुन एक खोली आहे. हे बहुदा दारूगोळ्याचे कोठार व शस्त्रागार असावे. येथुन पुढे बुरुजाच्या माथ्याकडे अजुन एक खोली आहे. हि बहुदा बुरुजावरील सैनिकांची राहण्याची सोय असावी. येथुन बुरुजाच्या माथ्यावर आले असता बुरुजाच्या मध्यभागी असलेला उंचवटा पहायला मिळतो. या उंचवट्यावर विटांनी बांधलेल्या आठ गोलाकार कमानी आहेत. या भागात जाण्यासाठी बांधकामात दगड रोवुन पायऱ्या केल्या आहेत. विटांच्या प्रत्येक कमानीखाली मशाल रोवण्यासाठी दगडी खाचा आहेत पण इतक्या मशाली का ? याचे उत्तर मिळत नाही. बुरुजाच्या काठावर गोलाकार फांजी असुन या फांजीवर चढण्यासाठी दोन ठिकाणी पायऱ्या बांधल्या आहेत. बुरुजात प्रवेश करणाऱ्या दरवाजाच्या वरील बाजुस असलेल्या सज्ज्यात जाण्यासाठी लहान दरवाजा आहे. बुरुजावर गोलाकार फेरी मारल्यावर आपले दुर्गदर्शन पूर्ण होते. बुरुज पहाण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. उत्तर कोकणात फिरताना पोर्तुगीजांनी समुद्रकिनारी असे एकटे बुरुज बांधल्याचे पहायला मिळतात पण घाटमाथ्यावर असे एकटे बुरुज पहायला मिळत नाहीत. पेशवेकाळात बांधलेला असाच एक बुरुज अर्नाळा किल्ल्याजवळ पहायला मिळतो.पण त्या बुरुजाच्या बांधणीत व या बुरुजाच्या बांधणीत खूप फरक आहे. अगदी जवळचेच उदाहरण घ्यायचे झाले तर कित्तुर भुईकोटाच्या मध्यभागी देखील असा बुरुज आहे पण त्याला किल्ल्याच्या तटबंदीचे सरंक्षण आहे. पण यमकनमर्दी बुरुज या सर्व बुरुजाहुन वेगळा असुन त्याला स्वतःचे सरंक्षण वगळता इतर कोणतेही सरंक्षण नाही. यमकनमर्दी किल्ल्याचा इतिहास सध्या तरी माझ्या वाचनात आलेला नाही पण बुरुजाचे एकुण बांधकाम पहाता हे ३५० ते ४०० वर्ष जुने असावे.
© Suresh Nimbalkar