मोहनदर
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : ३३८५ फुट
श्रेणी : मध्यम
महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यांची स्वतःची अशी खास ओळख आहे. काही किल्ले त्यांच्या इतिहासासाठी, काही किल्ले त्यांच्या आकारासाठी तर काही किल्ले त्यावरील वास्तुंसाठी प्रसिध्द आहेत. नाशिक जिल्ह्य़ातील कळवण तालुक्यात सातमाळा डोंगररांगेत असलेला मोहनदर हा किल्ला असाच त्यावर असलेल्या निसर्गनवलामुळे प्रसिध्द आहे. हे नवल म्हणजे किल्ल्याच्या डोंगरात असलेले नेढे. महाराष्ट्र भटकताना अनेक डोंगरावर आपल्याला निसर्गनिर्मित नेढे दिसतात पण मोहनदर किल्ल्यांच्या डोंगरात असलेले नेढे मात्र आगळेवेगळे असुन ते पहाण्यासाठी मोहनदर किल्ल्याला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. इतिहासात शिडका किल्ला म्हणुन ओळखला जाणारा हा किल्ला सध्या किल्ल्याखाली असलेल्या मोहनदरी या गावाच्या नावानेच ओळखला जातो. मोहनदरी गावाच्या नावाची उत्पत्ती सांगताना गावकरी सांगतात गावाच्या दक्षिणेला असलेल्या टोका तसेच पश्चिमेला असलेल्या सुपा हया डोंगराच्या दरीत पुर्वी मोठया प्रमाणात मोहाची झाडे होती तसेच हे गाव या दोन डोंगराच्या दरीत असल्याने गावाला मोहनदरी हे नाव मिळाले.
...
नाशिकहुन दिंडोरी-वणीमार्गे मोहनदरी गाव ५६ कि.मी. अंतरावर असुन वणीहून हे अंतर १३ कि.मी.आहे. सप्तशृंगीगडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावात जाण्याआधी २.कि.मी. अलीकडे मुख्य रस्त्यावर मोहनदरी गावात जाणारा फाटा फुटतो. या फाट्यापासून मोहनदरी गाव ४ कि. मी.आत आहे. मुख्य रस्त्याहुन मोहनदरी गावाकडे जाताना गावामागे पुर्वपश्चिम पसरलेला किल्ला व त्याच्या पश्चिम भागात असलेले नेढे आपले लक्ष वेधुन घेते. या रस्त्याने जाताना वाटेत ५ फुट उंचीचे ४ समाधी दगड पहायला मिळतात. या विरगळ नसुन या भागात फिरताना असे समाधी दगड जागोजागी पहायला मिळतात. किल्ल्यावर जाण्यासाठी तीन वाटा असल्या तरी एक वाट निसरडी व वेळखाऊ आहे तर दुसऱ्या वाटेसाठी प्रस्तरारोहणाच तंत्र आणि साहित्य असणे आवश्यक आहे. मुळात किल्ल्यावर व नेढ्यात जाण्यासाठी या दोन्ही वाटांची फारशी गरज नसुन तिसऱ्या वाटेने कमी वेळात हि दोन्ही ठिकाणे सहजपणे पहाता येतात. गडावर जाऊन येण्यास साधारण चार तास लागतात व गडावर पिण्याचे पाणी नसल्याने गावातूनच पाणी भरून घ्यावे. किल्ल्यावर चढाई मोहनदरी गावातील आश्रमशाळेकडून सुरु होते. हि वाट किल्ल्याच्या पुर्व टोकाला वळसा मारत शेजारील डोंगराच्या घळीमधून किल्ल्यावर जाते. या वाटेने गडाचा डोंगर डाव्या हातास ठेवत पुर्व दिशेला गडाच्या टोकाकडे चढण्यास सुरवात करावी. साधारण पाउण तासात आपण किल्ल्याच्या पुर्व टोकाच्या कड्याखाली पोहोचतो. येथुन मोहनदर किल्ला परत डाव्या हाताला ठेवत अर्ध्या तासात आपण किल्ला व त्याच्या शेजारील डोंगराच्या खिंडीत येतो. कडयाच्या अलीकडील वाटेवर काही प्रमाणात घसारा असला तरी हि वाट मात्र सरळसोपी आहे. खिंडीत आल्यावर डावीकडील वाट किल्ल्यावर तर उजवीकडील वाट शेजारील डोंगरावर जाते. समोर जाणाऱ्या दोन वाटा असुन डोंगराला समांतर जाणारी वाट नेढ्याकडे जाते तर घळीत उतरत जाणारी वाट घळीतील दरवाजाकडे जाते. आपण डावीकडील वाटेने सर्वप्रथम किल्ला फिरून घ्यावा. खिंडीतून पाच मिनिटांची चढाई केल्यावर उध्वस्त तटबंदीतुन आपला किल्ल्याच्या पुर्व भागात प्रवेश होतो. किल्ल्याचा हा सर्वात उंच भाग असुन या भागात मोठया प्रमाणात तुटलेली तटबंदी तसेच खिंडीच्या दिशेने असलेला उध्वस्त बुरुज दिसतो. या भागात काही वास्तुंचे चौथरे देखील दिसुन येतात. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ३३९० फुट असुन गडाचा निमुळता होत गेलेला माथा चार टप्प्यात साधारण ५ एकर परिसरावर पसरलेला आहे. गडाच्या पुर्व टोकाला दोन टप्पे असुन तेथे कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. येथुन उंचवटा उतरून गडाच्या पश्चिम टोकाकडे निघाल्यावर सर्वप्रथम कातळात खोदलेली तीन टाकी दिसुन येतात. यातील दोन टाक्यात शेवाळलेले पाणी असुन एक टाके मातीने भरलेले आहे. वाटेच्या पुढील भागात कोरडे पडलेले जोडटाके व त्यापुढे मातीने भरलेले अजुन एक टाके पहायला मिळते. गडफेरी करताना तटबंदीवर काही ठिकाणी चौकीचे अवशेष दिसतात. किल्ल्याच्या पश्चिम टोकावर कातळात खोदलेले एक मोठे टाके असुन ते गाळाने भरलेले आहे. या टाक्यापुढे गडाचे पश्चिम टोक असून त्यावर भगवा झेंडा लावलेला आहे. या टोकाच्या खालील बाजुस नेढे आहे पण ते पहाण्यासाठी इथून उतरता येत नाही. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. गडाचा आकार फारच निमुळता असल्याने गडफेरी करण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गडावरून सातमाळ रांगेतील अहिवंतगड, कण्हेरा, सप्तशृंगी, मार्कंड्या, रवळ्या-जवळ्या,धोडप हे किल्ले तसेच चणकापूर धरण पहायला मिळते. किल्ला फिरून झाल्यावर नेढे पहाण्यासाठी खिंडीत येऊन किल्ल्याच्या डोंगराला चिटकून जाणाऱ्या वाटेने पुढे निघावे. हि वाट किल्ल्याचा डोंगर डाव्या बाजुला व दरी उजव्या बाजुला ठेवत १५ मिनीटात आपल्याला थेट नेढ्याखाली आणुन सोडते. वाटेवर वाढलेली झाडी वगळता वाट तशी सोपी आहे. या बाजुने नेढ्यात चढण्यासाठी व्यवस्थित नैसर्गिक खाचा आहेत. नेढ्याच्या आसपास मधमाशांची पोळी असल्याने इथे सावधपणे वावरावे. नेढे पाहुन खिंडीकडे परत जाताना घळीत किल्ल्याचा डोंगर व समोरील डोंगर यांना जोडणारी तटबंदी दिसते. घळीत उतरून या तटबंदीपर्यंत गेले असता येथे किल्ल्याचा उध्वस्त पुर्वाभिमुख दरवाजा व त्याशेजारील बुरुज पहायला मिळतो. दरवाजा पाहुन खिंडीत परतताना डाव्या बाजूस उतारावर एका वास्तुचे अवशेष दिसुन येतात. इथे आपली खऱ्या अर्थाने गडफेरी पूर्ण होते. इतिहासात या गडाची नोंद कुठे येत नसली तरी अहीवंतगडाचा शेजार पहाता शिडका किल्ला अहीवंत गडाचा सरंक्षक दुर्ग असावा. इ.स.१६७० साली शिवरायांनी अहिवंतगड जिंकून घेतला त्यावेळी हा गडदेखील स्वराज्यात दाखल झाला असावा.
© Suresh Nimbalkar