मोरगिरी

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पुणे

उंची : ३५४० फुट

श्रेणी : कठीण

लोणावळा म्हणजे मुंबई-पुण्याकडील पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले शहर. आता तर येथील पवना धरणाच्या परिसरात एक रात्र राहण्यासाठी होत असलेली तंबुची सोय यामुळे नको त्या पर्यटकांचा देखील या भागात वावर वाढला असुन लोहगड-विसापुर-तुंग-तिकोना या किल्ल्यांवर देखील त्यांचे अस्तित्व दिसु लागले आहे. पण आजही या सर्वापासुन अलिप्त असलेला अपरिचित गड म्हणजे किल्ले मोरगिरी. इतिहासात या किल्ल्याची कोठे नोंद नसल्याने व काहीसा अवघड श्रेणीत हा किल्ला असल्याने दुर्गप्रेमी वगळता कोणीही या किल्ल्याच्या वाटेला जात नाही. या भागात वहानांची फारशी सोय नसल्याने खाजगी वाहन वापरणे जास्त सोयीचे आहे. अशा या अपरिचित दुर्गाची आज आपल्याला भटकंती करायची आहे. मोरगिरी किल्ल्याची चढाई दोन टप्प्यांमध्ये असुन गडमाथ्यावर जाण्यासाठी केवळ एकच वाट आहे. गडाखाली प्रचंड मोठे पठार पसरलेले असुन या पठारावर जाण्यासाठी अनेक ठिकाणाहुन मार्ग आहेत. पठाराखाली असलेले मोरवे गाव हे किल्ल्याला जवळचे गाव असुन तेथुन किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग आहे. ... दुसरा मार्ग तुंग किल्ल्याकडे जाताना वाटेत असलेल्या एस्सार ऍग्रोटेक या कंपनी जवळुन जातो पण हा मार्ग जास्त प्रमाणात वापरात नाही. मोरवे येथे जाण्यासाठी तळेगाव येथुन सकाळी ९ दुपारी १२ व संध्याकाळी ५ वाजता वस्तीची बस असुन हि बस कामशेत-पवनानगर-जवणमार्गे मोरवे येथे पोहोचते याशिवाय स्वारगेट येथुन मोरवे गावासाठी दुपारी १२ वाजता बस सुटते पण ती फारशी सोयीची नाही. याशिवाय लोणावळा येथुन घुसळखांबमार्गे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पठाराखाली पोहोचता येते. कामशेत ते मोरवे हे अंतर ३३ कि.मी.असुन घुसळखांबमार्गे लोणावळा ते मोरवे हे अंतर २३ कि.मी.आहे. याशिवाय पुणे-पौड-जवण-अजिवली-मोरवे हे अंतर ६३ कि.मी आहे. मोरवे गावातुन मोरगिरी किल्ला व त्यावरील भगवा झेंडा सहजपणे नजरेस पडतात. मोरवे गावातुन लोणावळा येथे जाताना साधारण २ कि.मी.अंतरावर ब्रह्माहेवन हे गृहसंकुल आहे, या संकुलाच्या अलीकडे डावीकडे एक डांबरी रस्ता डोंगराच्या दिशेने वळतो. येथे कात्यायनी उपवनचा फलक लावलेला आहे. या रस्त्याने पुढे गेल्यावर डावीकडे बंद पडलेले हॉटेल असुन एक कच्चा रस्ता उजवीकडे वर जाताना दिसतो. हा कच्चा रस्ता थेट डोंगराला भिडलेला असुन वाहन सोबत असल्यास या रस्त्याने शेवटपर्यंत जाता येते. रस्ता जेथे संपतो तेथे एक ठळक पायवाट झाडीत शिरताना दिसते. या पायवाटेने १० मिनिटात आपण पठारावरून खाली उतरलेल्या एका घळीत पोहोचतो. या घळीतून चढाईला सुरवात केल्यावर अर्ध्या तासात आपण पठारावर पोहोचतो. येथे समोर डाव्या बाजुला दाट झाडीमागे दक्षिणोत्तर पसरलेला मोरगिरी किल्ल्याचा माथा व त्यावर फडकणारा झेंडा नजरेस पडतो. पठारावरून गडाचा डोंगर उजवीकडे व दरी डावीकडे ठेवत पायवाटेने चालायला सुरवात केल्यावर १० मिनिटात आपण किल्ल्याच्या खाली उतरलेल्या दक्षिण धारेवर पोहोचतो. येथे वाट दाखवण्यासाठी दगड रचुन बाण बनवलेला आहे. येथुन किल्ल्यावर जाणारी वाट म्हणजे उभा चढ असुन सुरवातीची ५ मिनिटांची वाट दाट झाडीतुन जाणारी आहे. उर्वरीत अर्ध्या तासाचा चढ तीव्र घसाऱ्याचा असुन चांगलाच दमछाक करणारा आहे. एका ठिकाणी पायवाट काही प्रमाणात मोडलेली असल्याने सुरक्षेसाठी दोर वापरणे गरजेचे आहे. या वाटेने गडाच्या कातळ माथ्याखाली आल्यावर कातळात कोरलेल्या ४-५ पायऱ्या नजरेस पडतात. त्या चढुन वर आल्यावर कातळात कोरलेले पाण्याचे टाके पहायला मिळते. या टाक्यापासुन काही अंतरावर दुसरे टाके कोरलेले आहे. या दोन्ही टाक्यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. येथे किल्ल्याच्या माथ्यावरून एक चिंचोळी घळ खाली आलेली आहे पण तेथुन वर जाण्यास वाट मात्र नाही. येथुन समोर दिसणाऱ्या सोलरदिव्याच्या दिशेने सावधपणे वाटचाल करत आपण एका लहान गुहेपाशी पोहोचतो. या गुहेत जाखमाता देवीचे ठाणे असुन मुर्तीच्या ठिकाणी घडीव तांदळा स्थापन केलेला आहे. या गुहेत ४-५ लोक बसु शकतील इतपत जागा असुन आत पाण्याचे टाके आहे. पाण्यावर जरी शेवाळ जमा झाले असले तरी आतील पाणी पिण्यायोग्य आहे. या गुहेच्या उजवीकडील पायऱ्या तुटल्याने पुर्वी येथुन कातळावरून प्रस्तरारोहण करून वर माथ्यावर जावे लागत होते पण आता येथे १० फुट उंचीची लोखंडी शिडी लावल्याने सहजपणे वर जाता येते. शिडी चढुन वर गेल्यावर कातळात कोरलेल्या ८-१० पायऱ्या समोर येतात. या पायऱ्या व त्यापुढील टप्पा चढुन गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. पायथ्यापासुन गडमाथ्यावर येण्यास दीड तास पुरेसा होतो. किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासुन ३५४० फुट उंचावर असुन साधारण अर्धा एकरवर पसरलेला आहे. माथ्यावर झुडूपात लपलेले काही घरांचे अवशेष व कातळात कोरलेली पाण्याची दोन टाकी पहायला मिळतात. यातील एका टाक्यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही तर दुसरे टाके कोरडे पडलेले आहे. माथ्यावर बुरुज अथवा तटबंदी यासारखे बांधकामाचे कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत. गडमाथा फिरण्यासाठी १० मिनिटे पुरेशी होतात. माथ्यावरून कैलासगड,घनगड, तेलबैला, कोरीगड,राजमाची, लोहगड,विसापुर, तुंग-तिकोना हे किल्ले व खूप दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. सह्याद्रीच्या येन माथ्यावर असुनही गडाच्या डोंगराखाली असलेले प्रशस्त पठार हे या गडाचे वैशिष्ठ म्हणावे लागेल. किल्ल्याचे स्थान आणि त्यावरील अवशेष पाहाता कोकणातुन घाटमाथ्यावर येणाऱ्या कुरवंडे - आंबेनळी - पायमोडी - सव या घाटांवर टेहळणीसाठी हे ठिकाण वापरले जात असावे. मोरव्यातून मोराची पिसे पुण्यात पाठवली जात अशी नोंद पेशवे दफ्तरात येते पण ते मोरवे व मोरगिरी किल्ल्याखाली असलेले मोरवे एकच का? याबाबत संभ्रम आहे. टीप: मोरगिरीचे प्रस्तरारोहण एका ठिकाणी काहीसे अवघड असल्याने सुरक्षिततेसाठी दोराचा वापर करावा. पावसाळ्यात हि भटकंती धोक्याची असल्याने शक्यतो टाळावी व इतर काळात हि भटकंती करताना अनुभवी ट्रेकर्स सोबत करावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!