मोटी दमण

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : वापी

उंची : 0

श्रेणी : सोपी

मुंबईहुन १८० कि.मी.अंतरावर दिव दमण शहर आहे. महाराष्ट्राबाहेर असलेल्या या शहरात पोर्तुगीज संस्कृती व मराठा इतिहासाशी नाते सांगणारा एक सुंदर किल्ला आहे. दमण शहरातुन वाहणाऱ्या दमणगंगा नदीमुळे या शहराचे मोटी दमण व नानी दमण असे दोन भाग पडले आहेत. पोर्तुगीज हि दर्यावर्दी जमात असल्याने पोर्तुगालशी थेट संबंध ठेवण्यासाठी व दमण शहराच्या रक्षणासाठी त्यांनी दमणगंगा खाडीमुखावर दोन किल्ले बांधले. हे दोन्ही किल्ले एकमेकासमोर असुन यातील मोटी दमण किल्ला दमणगंगा नदीच्या दक्षिण तीरावर आहे. पोर्तुगीजांची मुळ वसाहत हि मोटी दमण किल्ल्यात असल्याने मोटी दमण किल्ला नानी दमण किल्ल्यापेक्षा आकाराने मोठा आहे. मराठयांचा या किल्ल्याशी आलेला संबंध म्हणजे इ.स १७३९ साली मराठयांच्या वसई मोहिमेच्या काळात या किल्ल्यावरून वसई किल्ल्यावरील पोर्तुगीजांना मदत मिळू नये यासाठी मराठा फौजांनी या किल्ल्याची नाकेबंदी केली होती. ... पोर्तुगीजांचे येथे बस्तान बसण्यापुर्वी हा प्रांत गुजरातचा सुलतान महंमदशहा बेगडा याच्या ताब्यात होता. बंदराच्या रक्षणासाठी त्याने दमणला किल्ला बांधला होता. इ.स.१५२३ साली पोर्तुगीजांनी शहाकडे व्यापार करण्याची परवानगी मागितली व व्यापार सुरु केला. पण काही काळात त्याच्याशी वाद झाल्याने इ.स.१५२९ साली पोर्तृगीजांनी दमण बंदरावर हल्ला केला. इ.स.१५२९ ते १५५९ या काळात पोर्तुगीजांनी अनेकदा या बंदरावर हल्ले केले. शेवटी गोव्याचा गव्हर्नर कॉन्स्टेटिनो डी. ब्रगांझा याने सुमारे ३००० सैनिक आणि १०० युद्धनौकांसह दमणवर हल्ला करत येथील बंदर व किल्ला ताब्यात घेतला. गोव्याला परत जाताना गव्हर्नर ब्रगांझा याने बंदर आणि किल्ल्याच्या रक्षणासाठी कप्तान दियागो द नऱ्होना याची मेजर म्हणुन नेमणुक करून त्याच्या दिमतीला १२०० सैनिक दिले. यानंतर इ.स.१५५९ साली दमणचा जुना किल्ला पाडून त्याजागी नवीन किल्ला बांधायला सुरवात झाली. दक्षिणेकडील दरवाजावर असलेल्या शिलालेखानुसार हा दरवाजा व या भागातील बुरुजाचे काम मुघल शासक अकबर याच्या काळात झालेल्या आक्रमणानंतर १५८१ साली पुर्ण झाले तर उत्तरेकडील दरवाजावरील शिलालेखानुसार या भागातील किल्ल्याचे बांधकाम इ.स.१५९३ साली पुर्ण झाले. म्हणजे या संपुर्ण किल्ल्याचे बांधकाम करण्यास २४ वर्ष लागली. इ.स.१५९३ साली बांधलेला हा किल्ला आजवर नांदता असल्याने त्याच्या मुळ रुपात पहायला मिळतो. किल्ल्याचे बांधकाम म्हणजे पोर्तुगाल वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. साधारण आयताकृती आकाराचा हा किल्ला ८४ एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत बाणाच्या आकाराचे दहा बुरुज आहेत. किल्ल्याच्या पश्चिम बाजुस अरबी समुद्र ,उत्तरेस दमणची खाडी असुन उरलेल्या दोन दिशाना खोल खंदक खोदुन किल्ला संरक्षित केला आहे. किल्ल्याची तटबंदी साधारण ३ कि.मी. लांब असुन १० फुट रुंद व २० फुट उंच या तटबंदीत उत्तरेला एक व दक्षिणेला एक अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. याशिवाय किल्ल्याला समुद्राच्या दिशेने पश्चिमेकडे असलेला तिसरा सध्या विटांनी बंद करण्यात आला आहे. किल्ल्यात गिरीजाघर,न्यायालय, रुग्णालय, महाविदयालय, सचिवालय, नगरपालिका कार्यालय, टपाल कार्यालय यासारख्या महत्वाच्या सरकारी वास्तु आहेत. किल्ल्यात पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक विहिरी खोदल्या आहेत. एक प्रकारे स्वयंपूर्ण असे संपुर्ण शहरच या किल्ल्यात वसले आहे. याशिवाय किल्ल्याच्या पश्चिम तटावर जहाजांना इशारा देण्यासाठी जुने दीपगृह आहे. किल्ल्याच्या पश्चिम तटाबाहेर नव्याने दीपगृह उभारण्यात आले आहे. किल्ला आजपर्यंत नांदता असल्याने व त्याची योग्य काळजी घेतल्याने अपवाद वगळता किल्ल्याचे दरवाजे,बुरुज,तटबंदी खंदक हे सर्व अवशेष व आतील वास्तु आजही सुस्थितीत आहेत. किल्ल्याच्या दोन्ही मुख्य दरवाजावर पोर्तुगीज राजचिन्ह व शिलालेख कोरलेले असुन पोर्तुगीज शैलीत संपुर्ण दरवाजा सजवला आहे. नानी दमण किल्ला पाहुन पादचारी पुलावरून खाडी ओलांडुन मोटी दमण किल्ला पहायला आल्यास आपला उत्तरेकडील दरवाजातुन किल्ल्यात प्रवेश होतो. या दरवाजासमोर किल्ल्याचे बंदर असुन तेथे बोटी थांबण्यासाठी नव्याने धक्का बांधला आहे. दरवाजातुन आत जाणारा सरळ रस्ता दक्षिणेकडील दुसऱ्या दरवाजातुन बाहेर पडतो. या दरवाजाच्या बाहेरील बाजुस तीन शिलालेख कोरलेले असुन दरवाजाला असलेली लाकडी दारे आजही सुस्थितीत आहेत. किल्ल्याचे दरवाजे मोठे असल्याने या दरवाजातून मोठया प्रमाणात वाहनांची रहदारी सुरु असते. येथे डावीकडील बाजुस तटावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. तटावर जाण्यासाठी अनेक ठिकाणी अशा पायऱ्या बांधल्या आहेत पण तटावर न जाता आपण किल्ल्यातील वास्तु पहात सरळ रस्त्याने किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाकडे निघावे. वाटेत आपल्याला किल्ल्यातील जुन्या वास्तुं तसेच त्यांच्या आवारात ठेवलेल्या काही तोफा पहायला मिळतात. या रस्त्याने जाताना वाटेच्या उजव्या बाजुस आपल्याला बॉम जिजस नावाचे इ.स.१६०३ ते १६०६ दरम्यान बांधलेले चर्च पहायला मिळते. या चर्चची कलाकुसर व आतील लाकडावरील कोरीव काम आवर्जुन पहावे असे आहे. चर्चच्या अलीकडे उजवीकडे जाणारा रस्ता आपल्याला १७ व्या शतकात बांधलेल्या पडक्या इमारतीकडे नेतो. संत डॉमिनिकन मॉनसेटरी म्हणुन ओळखली जाणारी हि इमारत म्हणजे पोर्तुगीज बांधकामाचा उत्तम नमुना आहे. १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय फौजा मोटी दमण किल्ल्यात शिरल्या असता पोर्तुगीज सैन्याने या इमारतीचा आधार घेतला. त्यावेळी मराठा रेजिमेंटबरोबर झालेल्या चकमकीत या इमारतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. मराठा रेजिमेंटने केलेल्या कामगिरीबद्दल त्याचे स्मारक मोटी दमण किल्ल्यात उभारण्यात आले आहे. हि इमारत पाहुन मुळ रस्त्यावर येत किल्ल्याच्या दक्षिण दरवाजात यावे. या दरवाजाबाहेर एक शिलालेख कोरलेला असुन दरवाजाची कमान सुशोभित केलेली आहे. या दरवाजाची लाकडी दारे आजही सुस्थितीत असुन त्यावर भलेमोठे टोकदार खिळे ठोकलेले आहेत. या दरवाजा शेजारी असलेल्या बुरुजाला लागुन तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या बुरुजाखाली तळघर असुन त्यात जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे पण तटावरून हे तळघर पहायला मिळते. या बुरुजावर असलेल्या चौथऱ्यावर झेंडा उभारण्यासाठी लाकडी खांब रोवलेला असुन त्याशेजारी घंटा बांधण्याची कमान आहे. घंटा बांधण्यासाठी असलेल्या या कमानी जवळपास सर्व बुरुजावर आहेत. या दिशेला किल्ल्याबाहेर खंदक असुन त्यात आजही पाणी भरलेले असते. या बुरुजावरून सुरवात करून किल्ल्याला प्रदक्षिणा करत दुसऱ्या बाजूने या बुरुजावर आल्यावर आपली संपुर्ण गडफेरी होते. किल्ल्याची तटबंदी साधारण १० फुट रुंद असुन काही ठिकाणी हे अंतर २० फुट आहे. तटबंदी व बुरुजावर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या व तोफांचा मारा करण्यासाठी झरोके बांधले असुन काही ठिकाणी केवळ एक माणुस उभा राहू शकेल अशा आकाराचे गोलाकार आडोसे बांधले आहेत. बुरुजांवर आणि तटबंदीवर सैनिक उभा राहण्यासाठी असलेले हे गोलाकार आडोसे म्हणजे हे कॅप्सुल बुरुज पोर्तुगिज बांधणीचे खास वैशिष्ठ आहे. किल्ल्यात फिरताना किल्ल्याच्या अंतर्गत भागात सहा तर तटबंदीवर २५ पेक्षा जास्त तोफा पहायला मिळतात. या सर्व तोफा व्यवस्थित जागी रचलेल्या आहेत. किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबुत असुन तटाला लागुन अनेक कोठारे व पहारेकऱ्याच्या खोल्या तसेच काही तळघरे आहेत. या सर्व वास्तुत जाण्यासाठी तटावर भुमीगत दरवाजे तसेच पायऱ्या बांधलेल्या आहेत. हे सर्व पहात साधारण ३ कि.मी.लांबीची ही तटबंदी पार करण्यासाठी दोन तासापेक्षा जास्त वेळ लागतो. वापी ते दमण हे अंतर १२ कि.मी. असुन वापी रेल्वे स्थानकातून बस, रिक्षा आणि खाजगी वहानाने दमणला जाता येते. नानी दमण बस स्थानकापासुन खाडीवरील पादचारी पुल पार करून पंधरा मिनिटात आपण किल्ल्याच्या उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!