मैलगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : बुलढाणा

उंची : १७५० फुट

श्रेणी : मध्यम

बुलढाणा जिल्ह्यात असलेला एकमेव गिरीदुर्ग म्हणजे मैलगड. जळगाव जामोद तालुक्यात असलेला हा गिरीदुर्ग सातपुडा पर्वतरांगेत महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमारेषेवर आहे. बुलढाणा जिल्ह्याचे गॅझेटियर व वऱ्हाडचा इतिहास या पुस्तकातील नोंदीनुसार हा किल्ला अचलपूरच्या नबाबाने बांधला आहे पण ह्या ह्या किल्ल्यावर असलेल्या लेण्या व खांबटाकी पहाता हा किल्ला आधीपासुनच अस्तित्वात असावा. गडाच्या टोकावरील बुरुजाचे बांधकाम पहाता अचलपूरच्या नबाबाने याची काही प्रमाणात पुनर्बांधणी केली असावी. रायपुर हे मैलगड किल्ल्याच्या पायथ्याचे गाव जळगाव जामोद या तालुक्याच्या ठिकाणापासुन १८ कि.मी.वर तर खामगाव शहरापासुन नांदुरामार्गे ५० कि.मी.अंतरावर आहे. येथील अंतर्गत भागात दळणवळणाच्या फारशा सोयी नसल्याने खाजगी वाहन सोयीचे पडते. रायपुर गावात प्रवेश करण्यापुर्वीच डावीकडे मैलगड किल्ल्याचा डोंगर व त्याच्या टोकावर असलेला भलामोठा बुरुज नजरेस पडतो. ... गावात शिरण्यापूर्वी एक कच्चा रस्ता या गडाखाली असलेल्या ५-६ घरांच्या वस्तीकडे जातो. या रस्त्याने आपण थेट गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. किल्ल्यावर पाणी असले तरी ते वापरात नसल्याने पिण्यायोग्य नाही त्यामुळे या वस्तीवर असलेल्या हातपंपावरून पाणी भरून घेणे. गडावर असलेल्या देवतामुळे स्थानिकांचा गडावर अधूनमधून वावर असल्याने वाट बऱ्यापैकी मळलेली आहे. किल्ल्यावर जाणारी वाट शेजारील टेकडीवरून किल्ल्याच्या टोकावरील बुरुजाखाली जाते व तेथुन किल्ल्याच्या मध्यभागी तटबंदीकडे जाते. किल्ल्याच्या वरील तटबंदी खालील भागात एक चौकोनी बुरुज व काही प्रमाणात तटबंदी शिल्लक आहे. या ठिकाणी किल्ल्याचा पहिला दरवाजा असावा पण आज केवळ शेजारील तटबंदी व दरवाजाचा तळभाग शिल्लक आहे. येथुन उध्वस्त पायरीमार्गाने आपण गडाच्या तटबंदीत असलेल्या दुसऱ्या पुर्वाभिमुख दरवाजाजवळ पोहोचतो. दरवाजाची कमान पुर्णपणे कोसळलेली असुन शेजारील बुरुज मात्र शिल्लक आहेत. या दोन्ही बुरुजावर खडकात खोदलेली पाण्याची लहान टाकी पहायला मिळतात. किल्ल्याचा माथा दक्षिणोत्तर ५ एकरवर पसरलेला असुन समुद्रसपाटी पासुन १७३४ फुट उंचीवर आहे. दरवाजाच्या उजवीकडील तटबंदीवरून म्हणजेच आपण खालून पाहिलेल्या मोठया बुरुजाच्या दिशेने गडफेरीस सुरवात करावी. या वाटेवर आपल्याला दगडावर काही कोरलेले दिसते. काही ठिकाणी हि दगडात कोरलेली या किल्ल्याची प्रतिकृती असल्याचे वाचनात येते पण किल्ल्याचा आकार व हि प्रतिकृती यात बरीच तफावत आहे. सध्या या दगडाची पुजा केली जात आहे काही दिवसांनी शेंदुर फासला जाईल. यापुढे गडाच्या उत्तर टोकावरील सुस्थितीतील बुरुज असुन या बुरुजावरील चर्या, पहारेकऱ्याच्या देवड्या, तोफांचे झरोके तसेच बंदुकीसाठी जंग्या या सर्व वास्तु पहायला मिळतात. मुळात हा एक बुरुज नसुन टोकावर एकमेकास जोडलेले तीन बुरुज आहेत. येथुन तटबंदी कडेने पुढे आल्यावर डाव्या बाजुच्या उंचवट्यावर खडकात खोदलेली ६-७ कोरडी टाकी पहायला मिळतात. येथील दगड काढुन बुरुजाच्या कामात वापरला गेला असावा. येथुन पुढे आल्यावर दोन कोरडी पडलेली खांबटाकी व त्यापुढे एक लेणीसारखे दिसणारे लांबलचक मोठे खांबटाके आहे. यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. येथुन पुढे तटबंदीच्या कडेने फेरी मारताना ठरावीक अंतरावर उतारावर खोदलेली ६-७ टाकी पहायला मिळतात. हि सर्व टाकी मातीने भरून गेली आहेत. या तटबंदीवरील फांजी मातीने भरून गेल्याने बाहेरील बाजुस असलेले बुरुज जाणवत नाही पण निरीक्षण केल्यास त्यांचे बांधकाम दिसुन येते. पुढे रायपुर गावाच्या दिशेने असलेल्या तटबंदीवर आले असता सहा खांबावर तोललेले एक लेणे पहायला मिळते पण या लेण्याचे खांब मात्र मोठया प्रमाणात झिजले आहेत. त्याशेजारी काही अंतरावर खडकात खोदलेले एक दोन खांबी कोठार असुन त्यापुढील भागात अर्धवट खोदलेली गुहा आहे. येथुन पुढे आपण प्रवेश केलेल्या दरवाजात येतो व आपली गडफेरी पुर्ण होते. पायथ्यापासुन गडावर येण्यास १ तास तर गड फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. उत्तरेकडील बऱ्हाणपूर येथुन विदर्भात येण्यासाठी पायनघाट हा मार्ग होता. या मार्गाच्या रक्षणासाठी महेलगड उर्फ मैलगड किल्ला बांधला गेला. इतिहासात या किल्ल्याचा उल्लेख जामोदचा किल्ला म्हणुन येतो. अठराव्या शतकात इ.स.१७२४ साली मुघलांशी फारकत घेत असफजहा याने हैदराबादच्या निजामशाहीची स्थापना केली. त्याने इस्माईलखान यास या प्रांताचा सुभेदार नेमले. याचे मुख्य ठाणे अचलपुर असल्याने तो अचलपुरचा नबाब म्हणुन ओळखला जातो. याने इ.स.१७५७ दरम्यान हा किल्ला बांधल्याचे मानले जाते. इ.स.१८०१ च्या सुमारास वऱ्हाडात गाजीखान याने सैन्य जमवून लुटालूट आरंभली तेव्हा रघुजी भोसले दुसरे यांनी पाच हजार सैन्य त्याच्यावर रवाना केले. यावेळी गाजीखान याने मैलगड किल्ल्याचा आश्रय घेतला पण किल्ल्यावर तोफांचा मारा होताच गाजीखानने पळ काढला. १८४१ च्या सुमारास काही काळ हा किल्ला नागपुरचे रघोजी भोसले यांच्या ताब्यात होता पण नंतर तो पुन्हा निजामाच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!