मेसणा
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : ३०६५ फुट
श्रेणी : मध्यम
नाशीक जिल्ह्याची दुर्गभटकंती करताना आपल्याला अनेक परिचित अपरीचीत किल्ले पहायला मिळतात. यात परिचित किल्ल्यापेक्षा अपरीचीत किल्ल्यांचीच संख्या जास्त आहे. सतत उपेक्षित राहिलेल्या या किल्ल्यांकडे दुर्गभटक्यांची पाऊले देखील अभावानेच वळतात. नाशिक जिल्हय़ात सहय़ाद्रीच्या मुख्य रांगेबरोबर सेलबारी- डोलबारी-अजंठा-सातमाळ अशा विविध उपरांगा धावताना दिसतात. या उपरांगापैकी अजंठा-सातमाळ या डोंगररांगेवर मेसणा किल्ला विराजमान झाला आहे. किल्ल्याचा आकार व त्यावरील अवशेष पहाता या किल्ल्याचा वापर केवळ टेहळणीसाठी होत असावा. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेले मेसणखेडे हे या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव नाशीकहुन ८१ कि.मी. अंतरावर तर चांदवड या तालुक्याच्या ठिकाणाहुन १८ कि.मी. अंतरावर आहे. चांदवड- मनमाड मार्गावर १६ कि.मी.अंतरावर मेसणखेडे गावात जाणारा फाटा असुन या फाटय़ावरून किल्ल्याचा पायथा चार कि.मी. अंतरावर आहे.
...
मेसणा किल्ला या भागात अपरीचीत असल्याने मेसणा किल्ला न विचारता प्रथम मेसणखेडे गावाची विचारणा करावी व गावात आल्यावर मेसणा डोंगर म्हणुन चौकशी करावी. मेसणा किल्ला गावापासुन दुर असुन किल्ल्यावर फारसा वावर नसल्याने वाटा फारशा मळलेल्या नाहीत व असलेल्या वाटा ढोरवाटा असुन फसव्या आहेत त्यामुळे किल्ल्यावर जाण्यापुर्वी वाटेची नीट माहिती करून घ्यावी. अन्यथा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकामगारांच्या वस्तीमधुन माहितगाराला वाटाड्या म्हणुन सोबत घ्यावे. या वस्तीमधुन एक वाट सुरवातीला डावीकडे जाते व नंतर किल्ल्याच्या मध्यातून वर चढत नंतर डावीकडे वळते. या वाटेने आपण डोंगराचा कडा डावीकडे व दरी उजवीकडे ठेवत डोंगर सोंडेच्या अलीकडे असलेल्या किल्ल्याखालील पठारावर पोहोचतो. इथुन किल्ल्याकडे पहिले असता एक लहानशी घळ व तिच्या वरील टोकास झाडाची आडवी वाढलेले फांदी दिसते. हि खुण लक्षात ठेवुन थेट वर घळीच्या दिशेने चालण्यास सुरवात करावी. ह्या भागात मोठया प्रमाणात झाडी वाढलेली आहे पण येथुन गडावर जाणारी वाट बऱ्यापैकी मळलेली असल्याने चुकण्याची शक्यता नाही. या वाटेवर कातळात कोरलेल्या ८-१० पायऱ्या असुन एका वळणावर खडकांना शेंदुर फासलेली लहानशी नैसर्गिक गुहा आहे. पुढे दरीच्या काठावरील लहानशी पाऊलवाट पार करत उभा कडा वर चढत आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. किल्ल्याचा माथा दक्षिणोत्तर साधारण १८ एकरवर पसरलेला असून समुद्रसपाटीपासुन ३०६० फुट उंचावर आहे. पठारावर आल्यावर समोरच दिसणाऱ्या लहान आकाराच्या टेकडीची वाटचाल करावी. या टेकडीवर ध्वजस्तंभाची जागा असुन तिथे सध्या पिराची स्थापना करण्यात आली आहे. गडावरील हे सर्वात उंच ठिकाण आहे. टेकडीवरून खाली उतरुन डाव्या बाजुने पुढे गेल्यावर खाली पठारावर उतरावे. या वाटेने डावीकडे वळल्यावर एका रांगेत काही अंतर ठेऊन खडकात खोदलेली चार पाण्याची टाकी दिसतात. यातील पहिले व शेवटचे टाके वेगळे असुन मधील टाके जोडटाके आहे. हि टाकी बुजलेल्या अवस्थेत असुन त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. टाकी खोदताना निघालेले अखंड दगडाचे चिरे टाक्याच्या पुढील बाजुस इतर बांधकामासाठी ओळीने मांडुन ठेवलेले आहेत. टाकी पाहुन पुढे आल्यावर डोंगर उतारावर असलेला साचपाण्याचा तलाव पहायला मिळतो. सध्या या तलावात मोठया प्रमाणात माती जमा झाली आहे. टाकी पाहुन पुढे आल्यावर आपण कडयाच्या काठावर गडावर प्रवेश केलेल्या ठिकाणी पोहोचतो व आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्यावर फारसे अवशेष नसल्याने संपुर्ण गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. किल्ल्यावर असलेल्या टेकाडावरून अंकाई-टंकाई,कात्रागड,गोरखगड हे किल्ले नजरेस पडतात.
© Suresh Nimbalkar