मेटघर
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : ३०८४ फुट
श्रेणी : मध्यम
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. सातवाहन काळात महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा व्यापारी मार्ग त्रिंबक डोंगररांगेतून जात असल्याने त्याच्या संरक्षणासाठी या ज्योतिर्लिंगांमागे असलेल्या डोंगरावर ब्रम्हगिरी किल्ला बांधला गेला. ज्योतिर्लिंगांमागे असलेला हा गिरीदुर्ग येथे ब्रम्हगिरी, श्रीगड,त्रिंबकगड अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. बहुतांशी भाविक या गडाला ब्रह्मगिरी तर दुर्गप्रेमी त्रिंबकगड म्हणुन ओळखतात. पण या गडाच्या घेऱ्यामध्ये रहात असलेले स्थानिक मात्र या गडाला एका वेगळ्याच नावाने ओळखतात ते म्हणजे मेटघर किल्ला. हे नाव स्थानिकांमध्ये इतके रुजले आहे कि आपल्याला काही काळ हा एखादा वेगळाच किल्ला असावा असे वाटते. पण मेटघर हि त्रिंबकगडची दुसरी बाजू आहे. आपण मेटघरच्या वाटेने किल्ल्यावर जाणार असल्याने व स्थानिक याच नावाने किल्ल्याला ओळखत असल्याने आपण देखील याच नावाचा वापर करूया. आपली त्रिंबकगडची भटकंती आधीच पुर्ण झाली असल्याने त्या संबधातील माझा लेख या संकेतस्थळवर फार पुर्वीच लिहिलेला आहे. त्यामुळे त्या लेखाची मोडतोड न करता हा लेख केवळ मेटघर गावातुन किल्ल्यावर जाताना दिसणारे अवशेष या अनुषंगाने लिहिलेला
...
आहे. मी २००० ते २०१४ या काळात त्रिंबकच्या बाजूने अनेकदा किल्ल्यावर गेलो तेव्हा मला हत्तीमेट येथुन किल्ल्यावर येणारी वाट असुन ती आता बुजली आहे इतपत माहीती मिळाली होती. पण त्या वाटेवर अर्धवट गाडलेले दोन दरवाजे असुन तो किल्ल्यावर येण्याचा राजमार्ग होता तसेच या वाटेवर मोठ्या प्रमाणात गडाचे अवशेष आहेत या बाबत काहीही माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे या वाटेकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता उलट हि वाट वापरात नाही असेच सांगण्यात आले होते. २०२० साली पहिल्यांदा या वाटेची छायाचित्रे पाहण्यात आली व आपला किल्ल्याचा महत्वाचा भाग पहायचा राहुन गेला हे लक्षात आले. करोनामुळे किल्ल्याला भेट देण्याचा कार्यक्रम लांबला गेला व २०२३ मध्ये या वाटेने किल्ल्यावर जाण्याचा योग आला. आजवर त्रिंबक येथील बाजूने गडावर जाणारी वाट मुख्य वाट असल्याचे वाटत होते पण मेटघरच्या वाटेने गडावर गेल्यावर येथील दरवाजाची भव्यता पहाता हा गडावर जाण्याचा प्राचीन राजमार्ग असल्याचे लक्षात येते. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी वहातुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असुन यापैकी हत्तीमेट हा पुर्वीचा राजमार्ग आता फार कमी वापरला जातो तर त्र्यंबकेश्वर गावातुन पायरी मार्गाने वर येणारी वाट हीच आता मुख्य वाट आहे. हत्तीमेट वाटेने गडावर जाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या काजोळे गावात यावे लागते. नाशिक बस स्थानकापासुन काजोळे गाव ३२ कि.मी. अंतरावर तर घोटी येथुन ३५ कि.मी.अंतरावर आहे. काजोळे गावातुन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मेटघर (हत्तीमेट) वाडीत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. सध्या हा रस्ता नादुरुस्त असल्याने Tractor व byke वगळता इतर कोणतेही वाहन वर वाडीत जात नाही. या रस्त्याने अर्ध्या तासात आपण मेटघर वाडीत पोहोचतो. कधीकाळी किल्ल्याच्या वाटेवर असलेल्या या मेटाचे म्हणजे चौकीचे आता २५-३० लहान घरांच्या वाडीत रुपांतर झाले आहे. किल्ल्याच्या या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात सपाटी असल्याने येथे शेती केली जाते व त्या मुळेच हे मेट आजवर येथे टिकून राहिले आहे. येथुन किल्ल्याचा आकार काहीसा हत्ती सारखा दिसत असल्याने हे ठिकाण हत्तीमेट म्हणुन ओळखले जाते. वाडीत सातवी पर्यंत शाळा असुन या शाळेच्या आवारात आपल्याला दोन तोफा व एक चुन्याच्या घाण्याचे चाक पहायला मिळते. येथुन १० मिनिटात आपण गडाच्या घळीच्या पायथ्याशी असलेल्या रेणुका मंदीरात पोहोचतो. या मंदीराच्या आवारात आपल्याला पाच सहा विरगळ पहायला मिळतात. येथुन सुरु होणारा गडाचा मार्ग पाण्याने निर्माण झालेल्या घळीत बांधलेला आहे. मंदिरापासून १० मिनिटात आपण या घळीत पोहोचतो. घळीच्या सुरवातीस कातळात कोरलेल्या ४-५ पायऱ्या दिसतात पण पुढील पायऱ्या मात्र दगड माती कोसळल्याने गाडल्या गेल्या आहेत. येथुन पाच मिनिटात आपण घळीच्या तोंडावर बांधलेल्या ४० फुट उंच तटबंदी जवळ पोहोचतो. हि तटबंदी इंग्रजांनी किल्ला ताब्यात आल्यावर येथुन वर जाण्याचा मार्ग बंद करण्यासाठी बांधली असावी पण आता या तटबंदीला लोखंडी शिडी लावल्याने आपल्याला येथुन वर जाता येते. पायथ्यापासुन इथवर येण्यास साधारण दीड तास लागतो. येथुन वर आल्यावर आतील बाजुस घळीतील डोंगराचा तळ घडीव दगडांनी बांधलेला दिसतो. भिंत बांधल्यावर हा मार्ग अजुन कठीण करण्यासाठी भिंतीचा वापर करून येथे पाणी अडविले जात असावे. तटबंदीच्या डावीकडील कड्यात कातळात कोरलेली गुहा असुन या गुहेशेजारी कड्यावर तटबंदी बांधुन त्यात एक लहान शिवमंदीर बांधलेले आहे. हे किल्ल्याचे मूळ बांधकाम असुन या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी त्याची योजना करण्यात आली असावी. उजवीकडील कड्यावर २० फुट उंच लांबलचक तटबंदी उभारलेली असुन त्यात जागोजागी बुरुज बांधलेले आहेत. येथुन वरील कड्यावरून घळीत घसरून आलेले मोठमोठे दगड पार करून आपण या दगडांनी बंदीस्त झालेल्या म्हणजे बुजलेल्या हत्ती दरवाजासमोर पोहोचतो. या दरवाजाचे एकुण बांधकाम पहाता हा दरवाजा प्राचीन असल्याचे दिसुन येते. हा दरवाजा त्याच्या कमानीसह पुर्णपणे कातळात कोरलेला असुन त्याच्या वरील भागात चर्या व त्यात असुरमुख कोरलेले आहे. त्याची खालील भागात कमानीवर दोन्ही बाजुस शरभ कोरलेले असुन मध्यावर नक्षी कोरलेली आहे. मुख्य कमानीच्या मध्यावर साखळीतील घंटा कोरलेली असुन दोन्ही बाजुस कमळाची फुले व त्याखाली गणेशशिल्प कोरलेले आहे. दरवाजा बाहेर उजवीकडील बुरुजावर पायाखाली पनवती असलेले हनुमानाचे शिल्प असुन त्याच्या अलीकडे अजून काही शिल्पे त्यावरील कमानीसह कोरलेली आहेत. या बुरुजाचा खालील भाग ताशीव असुन वरील भागाचे बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. दरवाजा शेजारील शिळा चढुन दरवाजाच्या वरील भागात गेल्यावर आतील बाजुस गाडला गेलेला अजून एक दरवाजा पहायला मिळतो. या दरवाजावर देखील कमळाची व बुट्टीची नक्षी कोरलेली आहे. हे दोन्ही दरवाजे पश्चिमाभिमुख असुन पुर्वी हे दोन दरवाजे पार केल्यावरच गडात प्रवेश होत असे. दुसऱ्या दरवाजाच्या पुढील बाजुस एका उध्वस्त इमारतीचे अवशेष पहायला मिळतात. येथुन पुढे न जाता दरवाजाला वळसा मारून घळीच्या काठाने तटबंदीच्या शेजारून १० मिनिटे डोंगर सोंडेच्या दिशेने चालत गेले असता कातळात कोरलेले पाण्याचे मोठे टाके पहायला मिळते. यातील पाणी शेवाळलेले असल्याने पिण्यायोग्य नाही. हे टाके पाहुन झाल्यावर पुन्हा दरवाजाकडे यावे व आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करावी. वाटेने पुढे जाताना डावीकडे दरीच्या काठावर बुरुजाचे व त्यावरील चौकीचे अवशेष पहायला मिळतात. त्यापुढे उजवीकडे कातळात कोरलेले पाण्याचे टाके असुन या टाक्यात मार्चपर्यंत पिण्याचे पाणी असते. टाक्यापुढे काही अंतरावर दोन समाधी असुन येथील अवशेष पहाता या भागात गडाची काही वस्ती असावी. येथुन पुढे जाताना जागोजागी चौकीचे अवशेष तर दरीच्या काठावर गडाची तटबंदी पहायला मिळते. येथुन १० मिनिटांत आपण गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रम्हगिरी मंदिराजवळ पोहोचतो. कड्यालगत असलेले हे मंदीर म्हणजे चारही बाजुंनी भिंती व मध्यभागी पाण्याचे चौकोनी टाके व टाक्याच्या तीन बाजुस ओवऱ्या व त्यात देवांची स्थापना अशी याची रचना आहे. मंदिराच्या वरील बाजुस खडकात खोदलेली पाण्याची दोन टाकी असुन यातील एक टाके दगडांनी बांधुन बंदिस्त केले आहे. या टाक्यातील पाणी गंगातीर्थ म्हणुन वापरले जाते. टाक्याच्या वरील बाजुस एक समाधीचा दगड असुन खालील बाजुस उध्वस्त तटबंदी व इतर अवशेष दिसुन येतात. कुशावर्त तलावाकडून गडावर येणारी वाट या ठिकाणी हत्तीमेट दरवाजाच्या वाटेला मिळते. पायथ्यापासुन येथवर येण्यास दोन तास लागतात. पुढील वर्णन त्रिंबकगड किल्ल्याच्या लेखात केलेले असल्याने येथे देत नाही. येथे आपली हत्ती दरवाजाची फेरी पुर्ण होते. गडमाथ्यावरून अंजनेरी,कावनई,वाघेरा, हरिहर, बसगड, त्रिंगलवाडी असा दूरवरचा परिसर दिसतो. देवदर्शन व साहस असा दुहेरी अनुभव घेण्यासाठी ब्रह्मागिरी- दुर्गभांडार भटकंती एकदा तरी करायला हवी. ब्रह्मगिरी किल्ल्याचा सर्वप्रथम उल्लेख पुराणात येतो. गोहत्येचे पातक दूर करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रम्हगिरीवर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले व त्यांच्या जटेतील गंगेची भुतलावर मागणी केली. पण गंगा राजी नसल्याने महादेवाने त्याच्या जटा ब्रम्हगिरीवर आपटल्या व गंगा भुतलावर आणली. किल्याच्या ब्रम्हगिरी या नावामागे सुद्धा एक आख्यायिका आहे. विष्णू व ब्रम्हदेवाने शिवाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी ब्रम्हाने शिवाच्या मस्तकाचा शोध लावायचा आणि विष्णूने त्याच्या चरणांचा शोध करायचा ठरवले. पण त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत तेव्हा ब्रह्मदेवाने आपल्या सामर्थ्याने गाय आणि केतकीपुष्प निर्माण केले आणि त्यांची खोटी साक्ष उभी केली. ब्रम्हाने सांगितले की मी शिवाच्या मस्तकाचा शोध लावला आणि केतकीच्या फुलाने व दुधाने त्याचा अभिषेक केला. ब्रह्मदेवाचे कारस्थान शिवाला कळल्यावर शिवाने कृद्ध होऊन ब्रम्हदेवाला आजपासून भूतलावर तुझी पूजा करणार नाही असा शाप दिला. त्यावर ब्रम्हदेवाने शिवाला भूतलावर पर्वत होऊन राहण्याचा प्रतिशाप दिला. शिवाने भूतलावर पर्वताचे रूप घेतले तोच हा ब्रम्हगिरी पर्वत.ब्रम्हगिरी किल्ल्याची बांधकाम शैली पहाता हा किल्ला सातवाहन काळात बांधला गेला असावा पण गडाचा इतिहास ज्ञात होतो तो यादव काळापासून. इ.स.१२७१ -१३०८ या काळात या परिसरावर राजा रामदेवराय यादव याची सत्ता होती. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आपल्या मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले असता निवृत्तिनाथांना ब्रह्मगिरी पर्वतावरच्या एका गुहेत तपश्चर्या करत असलेल्या गहिनीनाथांचे दर्शन घडले अशी कथा आहे. पुढील काळात किल्ला बहमनी राजवटीच्या अमलाखाली आला. इ.स. १८५३मध्ये बुऱ्हाण पहिला याच्या ताब्यात असलेल्या ५८ किल्ल्यांच्या यादीत त्रिंबकगडाचे नाव येते पण नंतर तो मोंगलाकडे गेला. इ.स.१६२९मध्ये शहाजीराजांनी हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. १७ जुन १६३६ रोजी मुघल व आदिलशाहीने एकत्र येऊन निजामशाही जिंकली व निजामशहाला कैदेत टाकले त्यावेळी शहाजीराजांनी निजामाचा एक वंशज मुर्तुजा याला निजामशहा म्हणून घोषित करून स्वतः वजीर बनले. इ.स.१६३६ मध्ये उत्तरेच्या प्रचंड फौजांपुढे शहाजीराजांचा माहुली येथे पराभव झाला व त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला गेला. इ.स.१६६३ साली सुरतेहून परत जाताना शिवाजी महाराज त्र्यंबकेश्वरी दर्शनास आले होते. इ.स.१६७२ मध्ये मराठयांनी मोरोपंत पिंगळे .केसो त्रीमल यांच्या नेतृत्वाखाली त्रिंबकगड जिंकला. इ.स १६८१ मध्ये औरंगजेब पुत्र अकबर त्र्यंबकेश्वरी आला व तेथुन पुढे संभाजी राजांनी त्यास कोकणातील पाली येथे आश्रय दिला. इ.स. १६८२ च्या सुमारास खानजमानचा मुलगा मुझ्झफरखान याच्या मोगली फौजेने गडाच्या पायथ्याच्या तीन वाड्या जाळल्या. याच वेळी त्रिंबकचा किल्लेदार केसो त्रिमल याने रामसेज किल्ल्यास मदत म्हणुन गडावरून एक तोफ पाठवली. १६८३च्या फेब्रुवारी महिन्यात राधो खोपडा फितुर होऊन मुघल सरदार अनामतखान याला जाऊन मिळाला. त्रिंबकगडच्या किल्लेदाराला फितुर करण्याचा त्याचा प्रयत्न फसला व मोगलांनी त्यालाच कैद केले. इ.स.१६८४ च्या नोव्हेंबर महिन्यात अक्रमखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या वाडया जाळुन तेथील जनावरे पळवली. १६८२ ते १६८४ या काळात मोगलांचे गड जिंकण्याचे सर्व प्रयत्न फसले. इ.स. १६८८च्या ऑगस्ट महिन्यात मोगल सरदार मातबरखानाने किल्ल्याला वेढा घातला. औरंगजेबला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो त्रिंबकच्या किल्ल्याभोवती मी चौक्या बसविल्या असुन सहा महिन्यांपासून किल्ल्यामध्ये रसद व लोकांचे येणेजाणे बंद आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक हवालदील होतील आणि शरण येतील. यावर औरंगजेब त्याला लिहिलेल्या प्रोत्साहनपर पत्रात म्हणतो त्र्यंबकचा किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न करावा तुमच्या कामाचे चीज होईल. यावर मातबरखान औरंगजेबाला पत्रातून किल्ला कसा घेतला ते कळवितो. गुलशनाबाद म्हणजेच नाशिकच्या ठाण्यात आपले सैन्य कमी असल्याने मी त्रिंबकच्या किल्लेदाराला बादशाही कृपेची आश्वासने दिली. ८ जानेवारी १६८९ ला गडाचे अधिकारी तेलंगराव व श्यामराज हे किल्ल्यावरून खाली उतरले व किल्ला ताब्यात आला. तेलंगराव व श्यामराज यांना द्यावयाच्या मनसबी यादीत दिल्या आहेत. त्यांची अर्जी आणि किल्ल्याच्या चाव्या पाठविल्या आहेत. याशिवाय मातबरखान कळवितो या मोहिमेत औंढाचा किल्लेदार श्यामसिंग याचा मुलगा हरिसिंग याने मोठी कामगिरी केल्याने त्याला तीनशे स्वार व हजार पायदळ देऊन त्रिंबकगड सांभाळण्यास ठेवले आहे. साल्हेरचा किल्ला ताब्यात घेतांना जशी बक्षिसी आणि मनसब देण्यात आली तशीच बक्षिसी आणि मनसब त्र्यंबकचा किल्लेदार तेलंगराव व श्यामराज यांना दयावी. यावर पाठविलेल्या फर्मानात औरंगजेब लिहितो कि तुमची अर्जी पोहोचली. आपण त्रिंबकगड जिंकून त्रिंगलवाडी किल्ल्याला वेढा घातल्याचे कळले. आपण पाठविलेल्या त्रिंबकच्या चाव्या मिळाल्या असुन तुमची कामगिरी पसंत आहे. तुमच्या मनसबीत पाचशेची वाढ करण्यात आली असुन तुम्हाला खिलतीचा पोशाख झेंडयाचा मान आणि तीस हजार रूपये देण्यात येत आहे. त्रिंबकची किल्लेदारी कदीम कुलीखान यास देण्यात येत आहे. पुढे १६९१च्या सुमारास येथील अधिकारी मुकर्रबखान बादशहास लिहीतो त्र्यंबकचा किल्लेदार कदीम कुलीखान याचा मृत्यु झाला असुन त्याचा मुलगा लहान व कर्जबाजारी आहे. त्याच्यावर सावकाराचा तगादा चालू असुन त्याला त्रिंबकगड सांभाळणे शक्य नाही. कोणीतरी उमदा आणि अनुभवी मनुष्य किल्लेदार म्हणून पाठवावा अन्यथा किल्ल्यावर संकट कोसळेल. २३ सप्टेंबर १६९४ रोजो मुघल सरदार गाजीउद्दिन बहादुर याने त्रिंबक किल्ला जिंकल्याचे उल्लेख येतात याचा अर्थ मध्यंतरीच्या काळात तो पुन्हा मराठ्यांनी जिकला असावा. ९ डिसेंबर १७०४ रोजी त्रिंबकचा किल्लेदार मोहम्मद हुसेन याने अननसाच्या दोन करंड्या औरंगजेबाकडे बहादुरगडी मुक्कामी असताना पाठवल्याचा उल्लेख येतो. इ.स.१७१६ मध्ये शाहू महाराजांनी या किल्ल्याची मागणी मोगलांकडे केली पण ती फेटाळली गेली. इ.स.१७२० मध्ये खानदेश प्रांत हैद्राबादच्या निजामाच्या ताब्यात गेल्याने त्रिंबकगड देखील त्याच्या ताब्यात गेला. इ.स.१७५१ साली नानासाहेब पेशवे यांनी त्र्यंबक सूर्याजी प्रभू व नारो दामोदर जोगळेकर यांच्या मदतीने त्रिंबकगड स्वराज्यात आणला तो पुढे १८१७ पर्यंत पेशव्यांच्या ताब्यात होता. २२ ते २४ एप्रिल दरम्यान इंग्रजांनी हत्तीमेट दरवाजावर मोठ्या प्रमाणात तोफा डागल्याने या भागाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. यावेळी गडावर ५५० सैनिक व २५ तोफा होत्या. तीन दिवस चाललेल्या या लढाईत १३ गोरे सैनिक व ९ स्थानिक शिपाई ठार झाले. यात दोन इंग्रज अधिकारी होते. इंग्रजांनी गड ताब्यात घेतला व गडावरील ५२८ सैनिकांना गडाबाहेर उतरू दिले. यानंतर दोनच महिन्यांनी त्रिंबकजी डेंगळे यांनी गड पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. इ.स.१८५७च्या उठावात इथला खजीना भिल्ल व ठाकर यांनी लुटला. त्यांना चिथावणी दिल्याच्या आरोपावरून वासुदेव भगवंत जोगळेकर यांना मृत्युदंड देण्यात आला.
© Suresh Nimbalkar