मुरबे कोट

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : पालघर

उंची : 0

श्रेणी : सोपी

मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. वसई ते दमण हा पट्टा उत्तर कोकण म्हणुन तर अलीबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणुन ओळखला जातो. उत्तर कोकणवर बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने त्यांनी या भागाच्या रक्षणासाठी व कारभारासाठी किनाऱ्यालगत अनेक लहान-लहान कोट बांधले. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फार थोडे अवशेषरुपात शिल्लक आहेत. बाणगंगा खाडीमुखावर पोर्तुगीजांची निर्मिती असलेला व आता काही काळाचा सोबती असलेला मुरबे कोट त्यापैकीच एक. मला या कोटाची माहीती मिळाली ते सह्यस्पंदनचे आमचे दुर्गमित्र जगदीश धानमेहेर यांच्याकडून. मुरबे कोटास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेचे बोईसर रेल्वे स्थानक हे जवळचे ठिकाण असुन रेल्वे स्थानक ते बोईसर हे अंतर ११ कि.मी.आहे. मुरबे गावात जाण्यासाठी शेअर तसेच खाजगी रिक्षाची सोय आहे. काही वयोवृद्ध स्थानिक वगळता इतरांना हा कोट पुर्णपणे अपरीचीत असल्याने पुरेशी माहीती घेऊनच या कोटाची भटकंती करावी. ... मुरबे गावाजवळ आल्यावर गावात प्रवेश करण्यापुर्वी डावीकडे बंद झालेला पेट्रोल पंप असुन त्यापुढे महालक्ष्मी मंदीराची कमान आहे. या कमानी शेजारून एक डांबरी रस्ता खाडीच्या दिशेने जातो. या रस्त्याने कोठेही न वळता सरळ गेल्यावर वस्तीतून आपण खाडीकिनारी पोहोचतो. रस्त्याच्या डाव्या बाजुस वस्तीतील जे शेवटचे घर आहे त्या घरामागेच या कोटाचा एकमेव अवशेष असलेली १० फुट उंच भिंत शिल्लक आहे. ओळखण्याची खुण म्हणजे या कोटासमोरच नादुरुस्त झालेली ५ शौचालये आहेत. कोटाच्या भिंतीच्या बांधकामात ओबडधोबड दगड व चुना याचा वापर केलेला आहे. उर्वरीत कोटाचा मलबा ढिगारा स्वरूपात तेथेच पडलेला आहे. कोटाच्या या भिंतीची एक बाजु घरातील शौचालयाची टाकी बांधण्यासाठी वापरलेली आहे. घरामागील हा संपुर्ण भाग दलदलीचा व झुडुपांनी व्यापलेला असल्याने भिंतीजवळ जाण्यास वाव नाही त्यामुळे आपले दुर्गदर्शन लांबूनच आटोपते घ्यावे लागते. साधारणतः १६व्या शतकात या भागातील इतर गढीकोटाबरोबर हा कोटही पोर्तुगिजांनी बांधला. पोर्तुगीजानी उभारलेल्या या कोटांचा मुख्य उपयोग टेहळणी करणे व जलमार्गाचे रक्षण करणे हा होता. याचा वापर खाडीच्या वाहतुक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि आगंतुक आलेल्या नौकांना लांब पल्ल्याच्या तोफांच्या सहाय्याने अटकाव करण्यासाठी होत असावा. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३९च्या वसई मोहिमेत हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून बस्तान उठले ते कायमचेच.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!