मुरगोड

प्रकार : भुईकोट

जिल्हा : बेळगाव

उंची : 0

श्रेणी : सोपी

इतिहासाच्या कागदपत्रात डोकावणारे काही किल्ले काळाच्या ओघात आज पुर्णपणे नष्ट झाले असुन त्यांच्या ठिकाणाची ओळख दर्शविणारा एक दगड देखील शिल्लक नाही असा अनुभव आम्हाला बेळगावची दुर्गभ्रमंती करताना आला. स्वराज्यात असणारा हा मराठी प्रांत भाषावार प्रांतरचना करताना मात्र कर्नाटक राज्याला जोडला गेला. आज बेळगाव .जिल्ह्यात असणारे हे किल्ले एकेकाळी स्वराज्यात असल्याने या किल्ल्यांना मी आजही महाराष्ट्रातील किल्ले समजतो. बेळगाव जिल्ह्याची भटकंती करताना आम्ही ऐतिहासिक कागदपत्रातील नोंदीनुसार बेळगाव मधील जवळपास ४० किल्ल्यांची यादी तयार केली. या यादीतील एक किल्ला म्हणजे मुरगोड. संपुर्ण मुरगोड गाव भटकंती करून व २०-२२ स्थानिकांना विचारून देखील कोणाला काहीही सांगता आले नाही पण सर्वांनी आवर्जून येथे असलेल्या महास्वामी चिदंबर दीक्षित यांच्या मठाला भेट देण्यास सांगीतले. मुरगोड किल्ला सापडला नाही पण येथे असलेल्या श्री महास्वामी चिदंबर दीक्षित यांच्या मठाला भेट देण्याचा योग आला. ... बेळगाव जिल्ह्य़ातील सौंदत्ती तालुक्यात असलेले मुरगोड गाव बेळगाव शहरापासुन ५० कि.मी.अंतरावर असुन गावाबाहेर महास्वामी चिदंबर दीक्षित यांचा मठ आहे. मठाचे संपुर्ण आवार प्राकाराच्या भिंतीने बंदीस्त असुन मुख्य दरवाजाने आत शिरल्यावर समोर सभामंडप दिसतो व त्याला लागून एक कट्टा आहे. या ठिकाणी चिदंबर महास्वामींचे पिता मार्तंड दीक्षित यांनी तपश्चर्या केली होती. या शेजारी औदुंबर वृक्ष असुन या वृक्षातुन चिदंबर महास्वामींनी सुवर्ण नाण्यांची वृष्टी केल्याची कथा सांगितली जाते. औदुंबर वृक्षाच्या दक्षिणेस लक्ष्मी मंदिर असुन उत्तरेस चिदंबर स्वामींचे मंदिर आहे. मंदिराची गर्भगृह,सभामंडप व मुखमंडप अशी तीन भागात रचना असुन सभामंडपात सुंदर नदी आहे. या मंदिराच्या उत्तर भागात श्रीराम मंदिर आणि चिदंबरस्वामींनी स्थापन केलेले मार्तंडेश्वर मंदिर असुन याच मंदिरात स्वामींनी स्थापन केलेला मारुती आहे. मंदिरासमोर असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली चिदंबरस्वामींचे पिता श्री मार्तंड दीक्षित यांनी शके १६८५ साली स्थापन केलेल्या दत्त पादुका आहेत. सध्या दिवाकरस्वामी दीक्षित हे येथील मठाधिपती आहेत. अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थाच्या बखरीत त्यांनी मुरगोड येथील यज्ञ समारंभात तूप वाढण्याची सेवा केल्याचे उल्लेख येतात. मंदीराच्या धर्मशाळेत रहाण्याची तसेच प्रसादाची सोय होते. मुरगोड किल्ल्याविषयी इतिहासात येणारे उल्लेख असे- सावनुरच्या नवाबाच्या ताब्यात असलेल्या मुरगोड ठाण्यास ५ नोव्हेंबर १७६४ रोजी माधवराव पेशव्यांच्या सैन्याने वेढा दिला व ते ठाणे जिंकले असा वृतांत माधवराव पेशव्यांनी रघुनाथराव यांना कळवला आहे. पेशवे दफ्तरात असलेल्या या पत्रात येथील लढाईचा घटनाक्रम व वर्णन देखील आले आहे. या नंतरच्या काळात काही काळ येथे मराठयांची टांकसाळ असल्याचे उल्लेख येतात. मुरगोड गाव आज बऱ्यापैकी विस्तारले असुन येथील किल्ला मात्र हरवला आहे. कोणाला कोटाचे स्थान माहित असल्यास वा सापडल्यास नक्की कळवावे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!