मुखई
प्रकार : नगरकोट
जिल्हा : पुणे
उंची : 0
श्रेणी : सोपी
मध्ययुगीन काळात व्यापारी मार्गावरील गावे तसेच एखादे बडे प्रस्थ रहात असलेले गाव हे बहुधा कोटाच्या अथवा नगरदुर्गाच्या आत वसलेले असे. महाराष्ट्रातील गडकोटांची भटकंती करताना आपल्याला असे असंख्य नगरदुर्ग पहायला मिळतात. शिक्रापुर -पाबळ मार्गावर असलेल्या मुखई नगरदुर्ग त्यापैकी एक. मुखई गावात असलेले काळभैरवनाथ मंदिर आसपासच्या पंचक्रोशीत चांगलेच प्रसिद्ध असुन ते या नगरदुर्गातच वसलेले आहे. मुखई गाव शिक्रापुर-पाबळ मार्गावर वसलेले पुणे –शिक्रापुर- मुखाई हे अंतर ४३ कि.मी. आहे. मुखई गावात जाण्यासाठी यस.टी. तसेच महानगर पालिकेची बससेवा उपलब्ध आहे. मुखाई गाव वेळू नदीच्या काठावर साधारण १.५ एकर परिसरावर वसलेले असुन कधीकाळी या संपुर्ण गावाला तटबंदी असल्याचे दिसुन येते. गावाचा विस्तार झाल्यामुळे उत्तर बाजुस असलेली तटबंदी पुर्णपणे नष्ट झालेली असुन उर्वरीत तीन बाजुस असलेली तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक आहे. वेळू नदीचे पात्र व खाजगी मालमत्ता यामुळेच हि तटबंदी आजही तग धरून आहे. मुखई गावात प्रवेश करण्यासाठी गावाच्या पश्चिम बाजुस मुख्य दरवाजा असुन हा दरवाजा त्याची कमान व लाकडी दारे यासकट आजही ताठ मानेने उभा आहे.
...
दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन आत तटाला लागुन तटावर तसेच दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हत्तीच्या धडकेने दरवाजा तोडता येऊ नये यासाठी दरवाजाच्या वरील भागात अणकुचीदार खिळे ठोकलेले असुन मुख्य दरवाजा बंद असताना आत प्रवेश करण्यासाठी दिंडी दरवाजा आहे. दरवाजाच्या वरील भागात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. मुख्य दरवाजाने आत शिरून सरळ गेल्यावर आपण हनुमान मंदीराजवळ पोहोचतो. दगडी बांधणीतील हे मंदिर उत्तर पेशवाईत बांधलेले असुन त्यावर असलेला शिलालेख त्याचा काळ दर्शवितो. य मंदीराला लागुनच काळभैरवनाथाचे मंदिर असुन या संपुर्ण मंदिराभोवती प्राकाराची दगडी भिंत आहे. या प्राकारात प्रवेश करण्यासाठी उत्तरेला एक व पूर्वेला एक असे दोन दरवाजे असुन उत्तरेकडील दरवाजावर नगारखाना आहे. मंदीराचे पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वार काळाच्या ओघात नष्ट झाले असुन त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. या दरवाजाबाहेर दोन दिपमाळ तसेच बगाड करण्याची जागा पहायला मिळते. मंदिराच्या आवारात दगडी चौथऱ्यावर बांधलेले प्रशस्त तुळशी वृंदावन असुन मंदीरासमोर नंदिमंडप आहे. मंदीरात प्रवेश केल्यावर डावीकडील दालनात लहानसे शिवमंदिर असुन त्याच्या बाहेर गणेशमुर्ती तसेच काही मुखवटे मांडलेले आहेत. मंदिराचे सभागृह अठरा दगडी खांबावर तोललेले असुन त्यात हातात नरमुंड घेतलेली लागुनच भैरवनाथाची मुर्ती आहे. सभागृहात शके १६३४ म्हणजे इ.स. १७१० हे वर्ष दर्शविणारा एक शिलालेख कोरलेला असुन हा शिलालेख मंदीर बांधल्यानंतरच्या काळात कोरलेला असावा असे वाटते. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी लहानसा दरवाजा असुन त्यातुन वाकुनच आत प्रवेश करावा लागतो. गर्भगृहात जमिनीखाली एक लहानसे कोठार (पाण्याचे टाके?) असुन त्यात उतरण्याचा मार्ग आता दगड लावुन बंद करण्यात आला आहे. मंदीराला फेरी मारताना मंदिराच्या बांधकामात दगड म्हणुन वापरलेला अजुन एक शिलालेख पहायला मिळतो. त्यातील अक्षरांची मोठ्या प्रमाणात झीज झालेली असुन या शिलालेखात हाताचा पंजा कोरलेला आहे. पालंडे, धुमाळ व गरुड हि तीन घराणी भैरवनाथाची मानकरी असुन या तीनही घराण्याचे गढीवजा उध्वस्त वाडे गावात पहायला मिळतात. गावातुन फेरी मारताना पडझड झालेल्या घरातुन मध्ययुगीन काळात नित्य वापरातील अनेक दगडी वस्तु मातीतुन बाहेर डोकावतात. गावातील गढीची भटकंती करताना गरुड यांचा वाडा वगळता उर्वरीत दोन वाडे आजही काही अवशेष आपल्या अंगाखांद्यावर बाळगुन आहेत. यातील पालंडे यांच्या वाड्याचा मुख्य दरवाजा,तटबंदी व त्यात असलेले दोन दुमजली बुरुज आजही शिल्लक आहेत. या वाड्याचे तळातील बांधकाम घडीव दगडात तर वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. वाड्याच्या दरवाजाबाहेर गावाचे कामकाज चालवणारी सदरेची जागा (चावडी) आहे. गढीच्या आत वाड्याचा चौथरा, त्यातील दालने, कोठार,शौचकुप, गढीबाहेर जाण्याची चोरवाट अशा अनेक वास्तु पडझड झालेल्या स्वरूपात पहायला मिळतात. बुरुजावर उभे राहिले असता संपुर्ण मुखाई गाव, वेळू नदीचे पात्र व दूरवरचा परीसर नजरेस पडतो. दुसऱ्या गढीची तटबंदी व दरवाजा काही प्रमाणात शिल्लक असुन आतील वास्तु मात्र भुईसपाट झालेली आहे. तिसऱ्या वाड्याच्या दरवाजाची कमान आजही शिल्लक असुन हा दरवाजा दगड लावुन बंद केल्याने आत जाता येत नाही. गढीच्या मागील बाजुस नदीच्या दिशेने नगरदुर्गाचा दुसरा दरवाजा असुन या दरवाजाची कमान मात्र ढासळलेली आहे. या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. हा दरवाजा पाहुन झाल्यावर आपली मुखई नगरदुर्गाची भटकंती पुर्ण होते. संपुर्ण नगरदुर्ग फिरण्यास साधारण एक तास लागतो. साधारण १८ व्या शतकात सरदार पालंडे यांना मुखई गाव व आसपासची काही गावे वतन मिळाल्यावर त्यांनी मुखई गावात प्रशस्त वाडा बांधला. या व्यतिरिक्त या नगरदुर्गाचा इतिहास सध्या उपलब्ध झालेला नसल्याने येथे मांडलेला नाही.
© Suresh Nimbalkar