माहीम बुरुज
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : पालघर
उंची : 0
श्रेणी : सोपी
पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. केळवे अथवा पालघर स्थानकात उतरुन १० कि.मी.अंतरावर असलेल्या माहीम गावात रिक्षाने अथवा एस.टी.ने जाता येते. मुख्य रस्त्याने आत शिरल्यावर माहीम किल्ल्याकडे जाताना थोडेसे आधी एक रस्ता समुद्रकिनारी जाताना दिसतो या रस्त्यावरच डाव्या बाजुला एका कुंपणात माहीम फुटका बुरूज पहावयास मिळतो. हा बुरूज म्हणजे गोलाकार आकाराचा टेहळणीचा एकांडा शिलेदार. या बुरुजाचे इतिहासातील नाव माहित नसल्याने व उध्वस्त अवस्थेत असल्याने हा माहीम गावच्या नावाने माहीम फुटका बुरूज म्हणूनच ओळखला जातो. या गावातच महिकावती देवीचे मंदिर असुन या देवीच्या नावावरूनच या गावाला माहीम हे नाव पडले आहे. माहिम फुटका बुरूजाच्या पश्चिमेस समुद्र व दक्षिणेस माहिमची खाडी आहे. प्राचीनकाळी समुद्राचे किनारी असणारा हा बुरूज साचत जाणाऱ्या गाळामुळे केळवेच्या किल्ल्याप्रमाणे समुद्रापासून दुरावला असुन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
...
सद्यस्थितीत १० ते १२ फुट उंच दिसणाऱ्या या बुरुजाची मूळ उंची २० ते २५ फुट असावी. गोलाकार आकाराच्या या बुरुजाच्या बांधणीसाठी ओबडधोबड दगड, चिखलमाती, शंखशिंपले यांचा वापर करण्यात आला आहे. वर चढण्यासाठी पायऱ्या नसुन शिडीच्या सहाय्याने वर चढावे लागते. बुरुजाच्या वरील भागातील बांधकामात एका इमारतीचा पाया असुन त्यासाठी घडीव दगडांचा वापर केला आहे. याचा वापर समुद्रातील वाहतुक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि आगंतुक आलेल्या नौकांना लांब पल्ल्याच्या तोफांच्या सहाय्याने अटकाव करण्यासाठी होत असावा. साधारणतः १६व्या शतकात ह्या भागातील इतर गढीकोटाबरोबर हा बुरुजही पोर्तुगिजांनी बांधला. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. पोर्तुगीजानी उभारलेल्या या वखारी व टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग दातिवरे ते मनोर प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक तेव्हा सरंक्षण व रसद पुरविणे हा होता. छत्रपती संभाजी महाराजांनी इ.स १६८४ मध्ये माहिमवर हल्ला चढविला होता, पण वेढा देऊन बसण्या इतका वेळ मराठ्यांकडे नसल्यामुळे हा परिसर ताब्यात आला नाही. इ.स.१७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून उच्चाटन झाले. इंग्रजांनी जिंकून घेईपर्यंत हा किल्ला सन १८१८ पर्यंत मराठ्यांकडे होता. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावीमाहीम व केळवे परिसरातील व्यापारामुळे ह्या किल्ल्याला महत्व प्राप्त झाले होते. बुरूज छोटेखानी असून दहा मिनिटात पाहून होतो.
© Suresh Nimbalkar