माहीम
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : मुंबई
उंची : 0
श्रेणी : सोपी
मुंबईत असलेल्या किल्ल्यामध्ये सर्वात प्राचीन किल्ला म्हणुन माहीम किल्ल्याचा उल्लेख केला जातो. मुंबईच्या बेटांना मुख्य भूमीपासून विभक्त करणाऱ्या महकावती उर्फ माहीमच्या खाडीच्या मुखावर इ.स ११४० मध्ये प्रतापबिंब राजाने माहीमचा किल्ला बांधला. गुजरातच्या सुलतानाने प्रतापबिंबचा पराभव करून केळवे माहिम प्रांत ताब्यात घेतल्यावर त्याने साष्टीच्या दक्षिण टोकावर असलेल्या बेटावर दुसरे माहिम निर्माण करून तेथे हा किल्ला बांधला आणि आपली राजधानीही येथे वसवली. त्याच्या त्याच्या काळातच माहीम व आसपासच्या बेटांवर मुंबई शहराची बीजे रोवली गेली. त्यानंतर १३४६ ते १५३४ या कालखंडात हा किल्ला पुन्हा गुजरातच्या सुलतानांच्या ताब्यात गेलेला दिसतो. होता. सध्या अस्तीत्वात असलेले किल्ल्याचे बांधकाम हे बहुधा याच कालखंडात झालेलं आहे. नंतरच्या काळात पोर्तुगीजांनी व ब्रिटिशांनी आपल्या गरजेनुसार या बांधकामात बदल केले आहेत
...
पण किल्ल्याच्या मूळ वास्तूत काही बदल झालेला नाही. इ.स. १५१६ मध्ये पोर्तुगीज अधिकारी दॉम होआव दे मोनो याने माहीमच्या खाडीत प्रवेश केला आणि माहीम किल्ला जिंकून घेतला. या किल्ल्याच्या ताब्यासाठी गुजरात सुलतान अलीशाह व पोर्तुगीज यांच्या मोठ्या प्रमाणात चकमकी झाल्या व शेवटी इ.स. १५३४ मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून घेतला. इ.स. १६६१ मध्ये पोर्तुगीजानी राजकन्येच्या लग्नात हुंडा म्हणून इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सला मुंबई बेट आंदण दिले व बेटासोबत किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात आला. किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आल्यावर इंग्रज स्थापत्यकार जेरॉल्ड ऑगियर ह्याने सध्या अस्तित्वात असलेले फेरबदल केलेले आहेत. इ.स १६७२ मध्ये पोर्तुगिजांनी माहीमच्या किल्ल्यावर हल्ला केला पण किल्ला त्यांना जिंकता आला नाही. त्यावेळी किल्ल्यात १०० सैनिक व ३० तोफां होत्या. त्यानंतर १४ फेब्रुवारी १६८९ रोजी जंजिऱ्याचा सिद्दी याकुतखान याने सैन्यानिशी मुंबईवर हल्ला केला व माहीमचा किल्ला ताब्यात घेतला. त्यांनतर जवळपास वर्षभर किल्ला त्याच्या ताब्यात होता पण लवकरच किल्ला इंग्रजांनी परत जिंकून घेतला. पोर्तुगीज शैलीत बांधलेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा आजही चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्यात असलेल्या झोपडपट्टीमुळे आत जाता येत नाही पण ओहोटीच्या वेळेस किल्ल्याची बाहेरील तटबंदी पहाता येते. समुद्राच्या लाटा सतत आपटल्याने किल्ल्याच्या तटबंदीची मोठ्या प्रमाणात झीज झाली असुन काही ठिकाणी तटबंदी उध्वस्त झाली आहे.
© Suresh Nimbalkar