मालेगाव
प्रकार : भुईकोट
जिल्हा : नाशिक
उंची : 0
श्रेणी : सोपी
गडकिल्ल्यांचे प्रामुख्याने गिरीदुर्ग, भुईकोट, जलदुर्ग असे तीन प्रकार पडतात. यातले गिरीदुर्ग हे सह्याद्रीच्या कड्याकपारीवर उभारले गेले तर जलदुर्ग भर समुद्रात असल्याने तेथे सहजपणे जाणे अवघड पण यामुळे त्यांचे निदान काही अवशेष तरी पाहायला मिळतात. परंतु भुईकोट मात्र याबाबत तसे दुर्दैवी आहेत. सहजपणे पोहचता येत असल्याने सर्व भुईकोटावर मोठया प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. यापैकी एक भुईकोट म्हणजे नाशिकचा मालेगाव भुईकोट. मालेगाव हे तालुक्याचे गाव नाशिक जिल्ह्यात नाशिक शहरापासुन १०८ कि.मी. अंतरावर असुन मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र.३ हा मालेगावातून जातो. मध्ययुगीन इतिहासाशी नाते सांगणाऱ्या मालेगावात मोसम नदीच्या काठावर मालेगावचा बलदंड भुईकोट वसला आहे. खुद्द मालेगावातच हा किल्ला असल्याने तेथे जाण्यास काहीच अडचण येत नाही. मराठ्यांचा इतिहास लिहणारे ग्रांट डफ यांच्या नोंदीनुसार इ.स.१७४० मध्ये हा किल्ला नारोशंकर यांनी बांधला
...
तर दुसऱ्या एका १८२० मधील उल्लेखानुसार हा किल्ला साठ वर्षापूर्वी म्हणजेच १७६० मध्ये बांधला असा संदर्भ सापडतो. नारोशंकर यांच्यावर उत्तर भारतातील किल्ल्यांचा प्रभाव असल्याने हा किल्ला बांधण्यासाठी त्यांनी उत्तर भारतामधून काही कारागीर आणले. चौरस आकाराचा भक्कम दुहेरी तटबंदी असलेला हा किल्ला पाच एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत ९ बुरुज आणि नदीकिनारी सुटावलेला एक बुरुज अशी याची रचना आहे. किल्ल्याच्या बाहेरील तटाची उंची वीस फुट असुन आतील तटबंदी ३५ फुट उंच आहे. किल्ल्याच्या आतील तटापासून साधारण ५० फूट अंतरावर बाहेरची तटबंदी उभी करण्यात आली आहे. किल्ल्याच्या रक्षणासाठी तटबंदीच्या बाहेर रुंद आणि खोल असा खंदक असुन मोसम नदीवर भिंत बांधुन ते पाणी अडवून किल्ल्याच्या खंदकात येईल अशी व्यवस्था केली गेली होती. सध्या हा खंदक फक्त दरवाजाच्या बाजुने शिल्लक असुन माती आणि कचऱ्याने भरत आला आहे तर इतर बाजुने खंदक बुजवुन त्यावर झोपड्या बांधल्या आहेत. बाहेरील तटबंदीतील किल्ल्याचा उत्तराभिमुख दरवाजा मोडकळीस आला असुन तो खंदकावरील पुलाने किल्ल्याला जोडला आहे. दरवाजातून आत शिरल्यावर समोरच मुख्य किल्ल्याची ढासळलेली तटबंदी असुन तेथे लोखंडी फाटक लावले आहे. येथुन आपला किल्ल्यात प्रवेश होतो. मुख्य किल्ल्यात प्रवेश करण्यापुर्वी प्रथम उजवीकडून अथवा डावीकडुन आतील आणि बाहेरील तटबंदीमधुन फेरी मारून किल्ल्याची भव्यता पहावी. यात घोडयाच्या पागा असल्याचे सांगितले जाते. किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीवर चढण्यासाठी कोपऱ्यात व दरवाजावर पायऱ्याची वाट आहे. बाहेरील तटबंदीत ३ ठिकाणी खंदकात उतरण्यासाठी दरवाजे दिसुन येतात पण ते आता बंद करण्यात आले आहेत. लोखंडी फाटकातून आत आल्यावर समोरच्या भागात काकाणी विद्यालय आहे, त्यामुळे परवानगी घेऊनच किल्ल्यात प्रवेश मिळतो. विद्यालय परिसराची साफसफाई नियमितपणे होत असल्याने या भुईकोटाची देखील साफसफाई होते. त्यामुळे भुईकोटाच्या वास्तू ब-यापैकी आढळतात. शाळेच्या कार्यालयाबाहेरील भिंतीवर नारोशंकरांचे तैलचित्र लावलेले आहे. शाळेच्या आवारात १ लहान, २ मध्यम व २ मोठया अशा एकूण पाच तोफा ठेवलेल्या आहेत. सुरुवातीला शाळेबाहेरून किल्ल्याचा तट व इमारत यामधील प्रशस्त वाटेने फेरी मारून घ्यावी. शाळेच्या मागील बाजुस एक खोल विहीर आहे. विहिरीच्या बाजुस असणाऱ्या पायऱ्याने तटावर जाऊन तटबंदी, बुरुज, चर्या, भिंतीतील कोठारे, भिंतीच्या आत बांधलेले दगडी जिने हे सर्व पाहून पुन्हा प्रवेशद्वारात यावे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुने पुढे जाताना तटबंदीत एक मोठे कोठार आहे व त्यापुढे डाव्या हातास एक मोठी कमान दिसते. या कमानीतून आत आल्यावर समोरच रंगमहालाचा दिंडी दरवाजा असणारा पहिला लाकडी दरवाजा दिसतो. या रंगमहालात मोठया प्रमाणात नक्षीकाम केलेले पहाता येते. येथे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पण हा मार्ग बंद करण्यात आला आहे. रंगमहालाच्या दुसऱ्या दरवाजाची केवळ नक्षीदार लाकडी चौकट शिल्लक असुन या दरवाजावर मोठया प्रमाणात कोरीवकाम पहायला मिळते. या दरवाजाच्या दोन्ही बाजुला वरील भागात नक्षीदार सज्जा असुन सर्वात वरच्या बाजुला सुबक बांधणीचे दोन मनोरे आहेत. किल्ल्यावर उत्तर भारतीय बांधकामाची छाप दर्शिवणाऱ्या उत्तम नक्षीकामाच्या या मनोऱ्याचा दगड झिजत चालला आहे. किल्ल्यात प्रवेश करणारा हा मुख्य दरवाजा असुन याच्या समोर दगडाची भिंत घालुन हा मार्ग बंद करण्यात आला आहे. किल्ल्यामध्ये फिरताना रंगमहाल, भव्य लाकडी दरवाजे , तटबंदीवर जाणारे दगडी जिने, दगडी मनोरे, तटबंदी, बळकट बुरूज, तटातील खोल्या, कमानी, भुयारी दरवाजे, विविध आकाराच्या तोफा या सारख्या असंख्य वास्तू पहायला मिळतात. संपुर्ण किल्ला पहायला दोन तास लागतात पण एक परिपूर्ण किल्ला पाहिल्याचे समाधान मनाला मिळते. ऐतिहासीक व धार्मिक पार्श्वभूमी असलेले माहुलीग्राम म्हणजेच मालेगांव शहर आणि परिसरात इ.स. १००० मध्ये राष्ट्रकुट घराण्याची सत्ता होती. इ.स. १७३० मध्ये पुणे जिल्ह्यातील सासवडच्या दाणी घराण्यातील नारोशंकर हे सरदार म्हणुन बराच काळ उत्तर भारतात मल्हारराव होळकर यांच्या फौजेत होते. उदोजी पवार यांच्याकडे शिलेदार असणारे नारोशंकर पुढे इंदोरचे सुभेदार झाले. त्यांनी पेशव्यांच्या वतीने ओरछा व झांसी जिंकून घेतले. झाशीमध्ये १४ वर्षे त्यांचे वास्तव्य होते. त्यावेळचा मोगल बादशहा दुसरा आलमगीर शिकारीसाठी गेले असता त्यांच्यावर सिंहाने हल्ला केला. नारोशंकर यांनी आपल्या जीवाची बाजी लावत त्या सिंहास ठार करून बादशहास वाचवले. बादशहाने नारोशंकर यांची प्रशंसा करून त्यांना 'राव बहादूर' हा किताब देवून मालेगाव परिसरातील निंबायती आणि सात-आठ खेड्याचा परिसर जहागीर म्हणून दिला. पुढे पेशव्यांनी नारोशंकर यांना महाराष्ट्रात बोलावले. नारोशंकरांनी दिल्लीच्या बादशहाकडून १७५७ साली इनाम म्हणून मिळालेल्या आठ गावांपैकी मालेगावात वाडा बांधण्यासाठी पेशव्याकडून परवानगी मिळवली. मोसम नदीच्या काठावरची जागा यासाठी निवडली गेली पण नारोशंकर यांनी वाडा न बांधता भव्य भुईकोट किल्लाच बांधून काढला. हे पेशव्यांना आवडले नाही पण पेशव्याबरोबर झालेला हा बेबनाव मिटवण्यात नारोशंकर यांना यश आले. नारोशंकर यांचे वास्तव्य त्यांच्या मृत्यूपर्यंत या किल्ल्यातच होते. या किल्ल्याची बांधणी इतकी मजबूत आहे की १८१८ मध्ये इंग्रजांना देखील हा किल्ला जिंकण्यासाठी झुंज द्यावी लागली. १६ मे १८१८ मध्ये इंग्रजांच्या वतीने किल्ला घेण्यासाठी १३०० सैनिक व २५० बंदुकधारी घेऊन लेफ्टनंट मॅकडोवेल किल्ल्यावर चालून आला. तेव्हा किल्ल्यात मोजकीच अरब शिबंदी होती. इंग्रजांनी बरेच प्रयत्न करून काही उपयोग झाला नाही. या युद्धात इंग्रजांचे ३५ लोक ठार तर १७५ जण जखमी झाले. लढून घेता न आल्याने इंग्रजांनी फंदफीतुरीचा प्रयोग केलं. दारूगोळ्याच्या कोठाराला आग लागल्यामुळे नाइलाजाने आतील शिबंदीने १३ जून १८१८ रोजी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात दिला. मालेगावची एकेकाळची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख जपणारा हा भुईकोट आज मात्र अज्ञातवासात गेला आहे. किल्ल्याच्या खंदकावर असलेल्या दोन्ही भिंतींना पूर्णपणे अतिक्रमणाचा वेढा पडला असुन या पुरातन वास्तूचे जतन करणे एक आव्हान आहे.
© Suresh Nimbalkar