मार्कड्या

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ४१३० फुट

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्रातील काही किल्ल्यांना केवळ ऐतिहासिकच नव्हे तर अध्यात्मिक वारसा देखील लाभला आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेला मार्कंड्या किल्ला सातमाळ डोंगररांगेत आपल्या भोवती अनेक किल्ल्यांचा गोतावळा घेऊन ठाण मांडुन बसला आहे. सप्तशृंगी व रवळ्याजवळ्या या गडांच्या मध्यभागी असलेल्या या डोंगरावर प्राचीनकाळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य असल्याचे मानले जाते व त्यामुळे हा डोंगर व किल्ला मार्कंड्या ऋषींच्या नावाने ओळखला जातो. पिंपरी मार्कंड हे जरी किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असले तरी बाबापुर हे गाव किल्ल्याच्या जास्त जवळ आहे. बाबापुरहुन कळवणकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाबापुर खिंड येथुन किल्ल्यांवर जाणारी वाट आहे. याशिवाय सप्तशृंगी गडावरून एक खिंड व त्यातील घसारा-चढण पार करत बालेकिल्ल्याखालील खिंडीत पोहचता येते. नाशीकहुन वणीमार्गे बाबापुर खिंड हे अंतर ५३ कि.मी.असुन वणीपासुन हे अंतर ९ कि.मी.आहे. वणीहुन बाबापूर मार्गे या खिंडीत आल्यास डावीकडील वाट मार्कंडेय किल्ल्यावर जाते तर उजवीकडील वाट रवळ्या जवळ्या खालील पठारावर जाते. ... खिंडीत वनखात्याने पर्यटन निवारा उभारला असुन वाहनतळाची सोय केली आहे. वनखात्याने मार्कंड्या किल्ल्याला पर्यटनस्थळ घोषित केले असुन पर्यटनस्थळ विकासासाठी मोठया प्रमाणात कामे केली आहेत. गडावर जाणारी वाट संपुर्णपणे पायऱ्या व दगडांनी बांधण्यात आली असुन कड्यावरील वाटेला लोखंडी कठडे लावलेले आहेत तसेच वाटेच्या अवघड टप्प्यावर लोखंडी शिडी बसवलेली आहे. त्यामुळे गडावर जाणे जरी सोपे झाले असले तरी चालण्याची व चढ चढण्याची तयारी असायला हवी. खिंडीतून गड चढायला सुरवात केल्यावर पाउण तासात उभी चढण व वाटेच्या शेवटच्या टप्प्यात असलेली लोखंडी शिडी पार करून आपण किल्ल्याखालील पठारावर म्हणजेच गडाच्या माचीवर येतो. शिडी चढताना या भागात शिल्लक असलेली गडाची तटबंदी दिसुन येते. गडाची माची साधारण २६५ एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरलेली आहे. पठाराला कातळकड्याचे नैसर्गीक सरंक्षण असल्याने काही ठिकाणी तुरळक तटबंदी दिसुन येते. सध्या या माचीवर काही साधु रहात असुन त्यांच्या आश्रमात रहाण्याची सोय होते पण जेवणाची सोय मात्र आपल्यालाच करावी लागते. पिण्याचे पाणी माचीवर असलेल्या रामकुंडात वर्षभर उपलब्ध असते. हे टाके व तुरळक तटबंदी वगळता माचीवर इतर कोणतेही अवशेष दिसत नाहीत. पठारावरून समोर पहिले असता बालेकिल्ल्याच्या उजव्या सोंडेखाली नव्याने बांधलेले एक मंदिर दिसते.बालेकिल्ल्यावर जाणारी वाट या मंदिराकडूनच वर जाते. माचीवरील आश्रमाच्या मागील बाजुने किल्ल्याकडे जाताना वाटेत दगडात बांधलेल्या काही पायर्याक लागतात. या वाटेने दहा मिनिटांची चढण चढुन आपण माचीवरून पाहिलेल्या मंदीराकडे पोहोचतो. नव्याने बांधलेल्या या महाकाली मंदिराच्या डाव्या बाजुच्या खिंडीतून बालेकिल्ल्यावर जाणारी मूळ वाट आहे पण हि वाट उभ्या चढाची असुन काही ठिकाणी कोसळल्याने मंदिराच्या उजव्या बाजुने गडावर जाण्यासाठी नवीन वाट बनवली आहे. या वाटेने पुढे आल्यावर कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. पुढे या वाटेवर डावीकडे एका कातळ कड्याखाली जमीनीच्या पातळीत दोन लहान गुहा कोरलेल्या आहेत. अगदी जवळ गेल्याशिवाय या गुहा दिसत नाही. या गुहेत एकावेळी एकच माणुस रांगत जाऊ शकतो. यातील उजवी कडील गुहा सरळ जाऊन डावीकडे वळते तर डावीकडील गुहा सरळ जाऊन डावीकडे व उजवीकडे दोन्ही बाजुला वळते. या गुहा आतील बाजुने एकमेकांशी जोडल्या असाव्यात पण सध्या आत दगडगोटे पडले असल्याने अनुमान करणे कठीण आहे. या गुहा ध्यान गुंफा म्हणुन ओळखल्या जातात. वाटेच्या पुढील भागात मंदिराकडून येणारी जुनी वाट या वाटेला येऊन मिळते. येथे समोर उजव्या बाजुच्या डोंगरावर कोसळलेला बुरुजाचा पाया दिसतो. येथुन पुढे उभा चढ चढुन आपण बालेकिल्ला व त्या शेजारी असलेल्या टेकडीच्या खिंडीत पोहोचतो. येथुन समोर सप्तशृंगीगड केवळ हाकेच्या अंतरावर आहे. कधीकाळी तटाबुरुजांनी बंदिस्त असलेली हि खिंड आज केवळ त्यांच्या अवशेषरुपात शिल्लक आहे. खिंडीतून उजवीकडे जाणारी वाट टेकडीवर डावीकडील वाट बालेकिल्ल्यावर तर सरळ उतरत जाणारी वाट सप्तशृंगी गडावर जाते. बाजुच्या टेकडीवर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. येथुन डाव्या बाजूने कातळात खोदलेल्या वाटेने माथ्यावर जाताना तीन टप्पे आहेत. वाटेच्या सुरवातीला दुसऱ्या टोकावर बाबापुरच्या दिशेने असलेल्या बुरुजाच्या अलीकडे एका वास्तुचा चौथरा दिसुन येतो. येथुन वर आल्यावर बालेकिल्ल्याचा उध्वस्त पश्चिमाभिमुख दरवाजा व त्या शेजारी असलेला बुरुज व तटबंदी पहायला मिळते. बालेकिल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर एका घुमटीखाली कमंडलू तीर्थ नावाचे कोरीव टाके आहे. सध्या हे टाके गाळाने भरले असुन यात केवळ पावसाळ्यातच पिण्याचे पाणी उपलब्ध असते. या घुमटीच्या उजव्या बाजूस काही अंतरावर खडकात खोदलेले पाण्याचे एक टाके असुन डाव्या बाजुस एक कोरीव दगड व नव्याने बांधलेला आश्रम आहे. वाटेच्या दुसऱ्या टप्प्यावर शेवाळलेल्या पाण्याने भरलेली खडकात कोरलेली तीन टाकी पहायला मिळतात. त्यांच्या बाजूलाच एक सुकलेल टाक आहे. या टाक्यासमोरील झाडाखाली एक नागशिल्प पहायला मिळते. वाटेच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे गडाच्या सर्वोच्च टोकावर मार्कंडेश्वराच मंदिर आहे. मंदिरात मार्कंडेय ऋषींची मूर्ती व शिवलींग असुन बाहेरील बाजूस नंदी आहे. या ठिकाणी किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची ४१३० फुट असुन बालेकिल्ल्याचा माथा ५ एकर परिसरावर पसरलेला आहे. माथ्यावरून पश्चिमेला सप्तशृंगीगड,अचला,अहीवंत तर पुर्वेला रवळ्या जवळ्या, कण्हेरगड, मोहनदर, धोडप, कंचना, कोळधेर, राजधेर, इंद्राई अशी संपुर्ण सातमाळ डोंगररांगच नजरेस पडते. बालेकिल्ल्यातुन पठारावर आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. पठारावरून बालेकिल्ला फिरण्यास एक तास पुरेसा होतो. इ.स.आठव्या शतकातील ताम्रपटानुसार तिसरा राष्ट्रकुट राजा गोविंद याच्या ताब्यात असलेला हा किल्ला मयुरखंडी नावाने प्रसिद्ध होता. त्यानंतर इ.स.१६३५-३६ मध्ये शहाजहान याने निजामशाही सांभाळणाऱ्या शहाजी राजांचा पाडाव करण्यासाठी खानदौरान, खानजमान व दिलेरखान असे तीन सरदार पाठवले. दिलेरखानवर नाशिक-त्रिंबक भागातील किल्ले घेण्याची जबाबदारी होती. अलावर्दीखान या दिलेरखानाच्या हाताखालील सरदाराने इ.स.१६३६ मध्ये या परिसरातील सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख आपल्याला इंद्राई किल्ल्यावर पाहाता येतो. वणी– दिंडोरीच्या लढाई नंतर या परिसरातील किल्ले शिवाजीमहाराजांनी स्वराज्यात सामील केले त्यात मार्कड्या किल्ल्याचा समावेश होता. सभासद बखरीमधील वर्णनानुसार इ.स.१६७१ मध्ये दिलेरखान याने या किल्ल्यांना घातलेला वेढा मोरोपंत यांनी पाठवलेल्या सैन्याने उधळून लावला. त्यानंतर आलेल्या महाबतखानाने मात्र हा किल्ला जिंकून घेतला. पेशवे काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील झाला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!