मानुर

प्रकार : गढी

जिल्हा : बीड

उंची : 0

वाढत्या लोकवस्तीमुळे शहराच्या अंतर्गत भागात आलेले नगरकोट, भुईकोट, गढी यावर होणारे स्थानिक आक्रमण दुर्गप्रेमीना तसे नवीन नाही, पण आजकाल गाव परिघाबाहेर असलेले गढीकोट यावर देखील धार्मीक आक्रमण झालेले पहायला मिळते. मराठवाडा भागातील गढी फिरताना हि गोष्ट प्रामुख्याने जाणवल्याशिवाय रहात नाही. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यात असलेल्या मानुर या गावात आपल्याला अशीच एक गढी पहायला मिळते. मानुर गाव अहमदनगर- पाथर्डी- बीड महामार्गावर वसलेले असुन शिरूर कासार या तालुक्याच्या ठिकाणाहुन १४ कि.मी. अंतरावर आहे. मनीकर्ण नदीच्या काठावर असलेले हे गाव या नदीच्या नावाने आधी मणिपुर व नंतर मानुर अशी या गावाच्या नावाची उत्पत्ती असल्याचे स्थानिक सांगतात. स्थानिकांना गढी कोट याबद्दल फारशी जाणीव नसल्याने गावात आल्यावर आपण नागनाथ मंदिराची चौकशी करावी. नागनाथ मंदिराजवळ आल्यावर समोरच आपल्याला या गढीचे शिल्लक असलेले बुरुज व काही प्रमाणात तटबंदी नजरेस पडते. सद्यस्थितीत गढीची खूप मोठय प्रमाणात पडझड झालेली असुन फारच थोडे अवशेष शिल्लक आहेत. ... चौकोनी आकाराची हि गढी साधारण पाऊण एकरवर पसरलेली असुन गढीच्या तटबंदीमध्ये आता केवळ तीन बुरुज पहायला मिळतात पण कधीकाळी या बुरुजांची संख्या चार असावी. या तीन बुरुजातील दोन बुरुज मातीचे असुन एक बुरुज अलीकडील काळात बाहेरील बाजूने सिमेंटने बांधण्यात आला आहे. या बुरुजावर कुण्या चांद शाह वली बाबाच्या नावाने चौकोनी थडगे बांधलेले आहे. गढीचा मुख्य दरवाजा पूर्णपणे नष्ट झाला असुन त्याची तटबंदीतील जागा पाहुन हा दरवाजा पुर्वाभिमुख असावा. गढीच्या शिल्लक असलेल्या तटबंदीचा खालील भाग हा लांब घडीव दगडांनी बांधलेला असून त्यावरील बांधकाम हे पांढऱ्या मातीत केलेले आहे. गढीची हि तटबंदी ८ फुट रुंद व ३० फुट उंच असल्याचे दिसून येते. गढीच्या मध्यवर्ती भागात झाडांनी व्यापलेली चौकोनी आकाराची मोठी विहीर आहे पण झाडी वाढलेली असल्याने त्या विहिरीच्या खोलीचा अंदाज घेता येत नाही. गढीत असलेल्या इतर वास्तु आता केवळ चौथरा स्वरूपात शिल्लक असुन त्यावर वाढलेल्या खुरट्या झाडीमुळे या बांधकामाचा अंदाज घेता येत नाही. गढीचे शिल्लक असलेले अवशेष पहाता हि गढी शिवपूर्वकाळापासून अस्तित्त्वात असावी असे वाटते. गावात असलेली ४-५ जुनी मंदीरे याची साक्ष देतात. आपण सुरवातीस आलो ते नागनाथ मंदीर देखील वीरशैव समाजाचे असुन साधारण १२ व्या शतकातील आहे. या गढीत एक बळद असुन या बळदाच्या तोंडावर राजा कृष्णदेवराय याच्या काळातील शके ११७० कोरलेला एक शिलालेख असल्याचे वाचनात येते पण पण सध्या हे बळद व त्यावरील तो शिलालेख देखील पहायला मिळत नाही. या शिलालेखाचे वाचन झाले असुन ब्रम्हानंद देशपांडे यांच्या पुस्तकात १९ फेब्रुवारी १९७६ रोजी ते प्रकाशित झालेले आहे. सध्या या गढीचे नेमके मालक कोण हे माहित नसले तरी वेगवेगळ्या काळात हि गढी वेगवेगळ्या सरदार व देशमुखांच्याच ताब्यात राहिली असावी. पेशवे काळात या भागावर निजामाची सत्ता असल्याने हि गढी एका मुस्लीम सरदाराच्या ताब्यात होती. त्याने या गढीमध्ये बांगडी काच कारखाना सुरु केल्याचे वाचायला मिळते. संपुर्ण गढी पाहण्यासाठी १५ मिनिटे पुरेशी होतात. गढीचा मालक सध्या अस्तित्वात नसल्याने गढीवर अतिक्रमण सुरु झाले आहे. गढीची फार पुर्वीच पडझड झाल्याने व गढी निजामाच्या राज्यात असल्याने गढीचा कोणताच इतिहास दिसून येत नाही. गावाचा फेरफटका मारला असता गावात काही जुने वाडे पहायला मिळतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!