मानगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : ७७० फुट

श्रेणी : मध्यम

स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या प्रभावळीत मानगड, दौलतगड, पन्हाळघर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा यासारखे अनेक उपदुर्ग आहेत. या किल्ल्यांच्या साखळीमुळे शत्रुला राजधानीवर सहजपणे हल्ला करणे कठीण होते. यातील मानगड किल्ला हा राजधानी रायगडचा उपदुर्ग मानला हात असला तरी गडावरील कातळात असलेल्या खोदीव टाक्या पहाता हा किल्ला आधीपासुनच अस्तित्वात असावा. सह्याद्रीच्या अजस्र डोंगररांगांमध्ये आजही हा लहानसा किल्ला त्याचे स्थान टिकवून उभा आहे. या किल्ल्यामुळेच या तालुक्याला माणगाव हे नाव मिळाले आहे. मानगडाला भेट देण्यासाठी माणगावच्या रस्त्यावर असणारे निजामपूर गाव गाठावे. निजामपूर गावातून रायगड पायथ्याच्या पाचाड गावात रस्ता गेला आहे. त्या रस्त्याने पुढे गेल्यास वाटेत बोरवाडी व पुढे मशिदवाडी हे छोटे गाव लागते. मुंबईच्या दुर्गवीर या संस्थेतर्फे निजामपूर ते मशिदवाडी या रस्त्यावर मानगडाचा रस्ता दाखवणारे मार्गदर्शक फलक बसवण्यात आले आहेत. ... मशीदवाडी गावाच्या पाठीशी एका छोट्या टेकडीवर किल्ले मानगड वसला आहे. मशिदवाडीतून गावातून मानगडावर जाण्यासाठी प्रशस्त पायवाट असून त्या वाटेने सुमारे पंधरा-वीस मिनिटे सोपी चढण पार केली की आपण खिंडीपर्यंत येतो. गडाच्या पठारावर विंझाई देवीचे कौलारू मंदिर आहे. गडावर मुक्कामाच्या दृष्टीने हे मंदिर अतिशय योग्य ठिकाण. गर्द झाडीमध्ये बांधलेल्या या मंदिरात विंझाई देवीची शस्त्रसज्ज मूर्ती असुन मंदिराच्या जवळच दगडात कोरलेल्या दोन मूर्ती व शेजारी छोटी दगडी दीपमाळ आहे. मंदिरासमोर काही फुटक्या वीरगळ व एक दगडी रांजण आहे. विझाई मंदिरापासून गडाकडे नजर टाकली की दोन भक्कम बुरुजांच्यापाठी लपलेला गडाचा दरवाजा दिसतो. मंदिराच्या पाठिमागुन गडावर जाण्यासाठी कातळात खोदून काढलेल्या पन्नास एक पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यावर मानगडचा उत्तराभिमुख गोमुखी बांधणीचा मुख्य दरवाजा लागतो. दरवाज्याचे दोन्ही बुरुज सुस्थितीत असून कमान मात्र ढासळली आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डावीकडे पहिल्या प्रवेशद्वाराच्या काटकोनात दुसरे उध्वस्त प्रवेशद्वार लागते. याची कमान पुर्णपणे ढासळलेली असुन खाली पडलेल्या कमानीच्या एका तुकड्यावर नाग/कमळशिल्प कोरलेले आहे. समोरच एका कोनाड्यात मारुतीराया विराजमान झाले आहेत. मानगडाच्या मुख्य दरवाज्यापासून डावीकडे आणि उजवीकडे अशा दोन वाटा फुटल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून डावीकडे गेल्यास समोर राहण्यायोग्य एक प्रशस्त गुहा आहे. या गुहेचा उपयोग धान्यकोठार म्हणून होत असावा. या गुहेच्या बाहेर एक व समोर एक अशी पाण्याची दोन टाकी आहेत. समोरचे टाके बुरुजातच खोदलेले आहे. तेथून सरळ गेले की गडमाथ्याचा मार्ग दाखवणारी पाटी असून तेथून काही खोदीव पायऱ्यांच्या मार्गाने दोन ते तीन मिनिटांत आपण थेट गडमाथ्यावर दाखल होतो. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच वाड्याचे चौथरे आहेत. मुख्य दरवाज्यातून उजवीकडे जाणारी पायवाटही गडमाथ्यावरच घेऊन जाते पण उतरताना त्या बाजूने उतरल्यास चहुबाजूंनी किल्ला बघता येऊ शकतो. गडमाथ्यावर ध्वजस्तंभ असून त्याच्याजवळच पाण्याच्या दोन टाक्या आहेत. मानगडच्या माथ्यावरुन सह्याद्रीच्या पर्वतरांगेचे व पायथ्याच्या मशिदवाडी गावाचे मोहक दृश्य दिसते. ढालकाठीपासुन पुढे निघालो की वाटेच्या दोनही बाजुस अवशेषांच्या दगडांचा खच पडलेला दिसतो. वाटेवर डाव्या बाजूला खाली दरीत पाण्याचे टाके दिसते. ते पाहून पुढे गेल्यावर डावीकडे पिराचे स्थान असून त्याच्यासमोर पटांगण आहे. त्याच्या बाजूलाच उध्वस्त मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. तेथे जवळच काही भग्न जोती बघायला मिळतात. मानगडाचे मुख्य आकर्षण असलेला अलीकडेच सापडलेला चोर दरवाजा या वाटेने सरळ पुढे गेल्यास नजरेस पडतो. चोरदरवाज्याला व्यवस्थित पायऱ्या असून तेथून खाली उतरणारी वाट चाच या गावी जाऊन पोचते असे स्थानिक सांगतात परंतु येथून खाली उतरणारी कोणतीही वाट नजरेस पडत नाही. मानगडाचा माथा लहान असून अर्ध्या तासात गडमाथा पाहून होतो. गडावर चढलो त्याच्या विरुद्ध बाजूने उतरायला सुरुवात केल्यास पुन्हा मुख्य दरवाजाजवळ पोहोचतो. गडमाथा थोडासा उतरून पुढे जाऊ लागलो की उजवीकडे माचीवर जमिनीवरील खडकात खोदलेली ६ पाण्याची टाक आहेत. येथे आपली गडफेरी पुर्ण होते व परत आल्या वाटेने खाली उतरायचे. मशीदवाडी मधून बाहेर पडताना गावाबाहेरच काळभैरवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या आवारात वेगवेगळ्या काळातील अनेक विरगळ उघड्यावर ठेवलेल्या आहेत. या मंदिराशेजारीच एक पुरातन उध्वस्त शिवमंदिराचा चौथरा पाहायला मिळतो. मंदिराच्या सुमारे तीन फुट उंचीच्या या प्रचंड मोठ्या चौथऱ्यावर भव्य आकाराचा नंदी असून जवळच शिवलिंग आहे. आसपास विखुरलेले कोरीव कामाचे दगड, नंदीची घडण यावरून हे मंदिर हेमाडपंथी असल्याचे जाणवते. गडाच्या प्राचीन इतिहासात डोकावले असता शेवल्या घाटाचा रक्षक म्हणुन याचे स्थान आढळते. शिवकाळात मानगडच्या सरनौबतीचे अधिकार ढूले या मराठा घराण्याकडे, हवालदारी गोविंदजी मोरे यांचेकडे तर कारखानीस म्हणुन प्रभु घराणे अशी नोंद आढळते. मुंबईच्या ‘दुर्गवीर’ संस्थेने गडाच्या संवर्धनाचे काम हाती घेतले असून गडाच्या मूळ वैभवाला धक्का न लावता त्यांनी गडाला नवीन रूप प्राप्त करून दिले आहे. संस्थेने संपूर्ण गडावर अवशेष दाखवणारे फलक बसवले आहेत. दुर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या या संस्थेच्या मावळ्यांनी येथे केलेले काम वाखाणण्याजोगे आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!