माणिकपुंज

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : १९७५ फुट

श्रेणी : मध्यम

नाशिक जिल्हय़ात सहय़ाद्रीच्या मुख्य रांगेबरोबर सेलबारी- डोलबारी-अजंठा-सातमाळ अशा विविध उपरांगा धावताना दिसतात. या उपरांगापैकी नाशिक-जळगाव-औरंगाबाद अशा तीन जिल्हय़ांना स्पर्शून गेलेल्या अजंठा-सातमाळ डोंगररांगेवर मध्यम व छोटेखानी आकाराचे अनेक किल्ले विराजमान झाले आहेत. दोन-तीन दिवसाचा अवधी असल्यास या रांगेवर असलेल्या अनेक अपरिचित किल्ल्यांना भेट देता येते. माणिकपुंज हा या रांगेवर असलेला असाच एक लहानसा किल्ला. किल्ल्यावरील पुरातन लेणी व किल्ल्याचा आकार पहाता हा किल्ला टेहळणीसाठी प्राचीन काळापासुन वापरात असावा. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी माणिकपुंज हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव गाठावे लागते. नांदगाव या तालुक्याच्या ठिकाणाहुन माणिकपुंज गाव १४ कि.मी. अंतरावर असुन नांदगाव – येवला मार्गावरील बाणगाव येथुन माणिकपुंजला जाणारा फाटा आहे. या फाटय़ावरून माणिकपुंज गाव सात कि.मी. अंतरावर आहे. ... गावात प्रवेश करताना गावामागे असलेला मुख्य डोंगररांगेपासुन वेगळा झालेला किल्ल्याचा डोंगर नजरेस पडतो. गावातुन गडावर जाण्यासाठी ठळक पायवाट आहे. गडाच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या कोरीव लेण्यात भवानी मातेचे मंदीर असल्याने माणिकपुंज ग्रामस्थांनी तिथपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन या मंदिरापर्यंत विजेचे खांब आहेत. माणिकपुंज गावातुन या लेण्यापर्यंत जाण्यासाठी १५ मिनिटे पुरेशी होतात. लेण्यात जाण्याचा मार्ग कातळात कोरलेला असुन लेण्याचे खोदकाम दोन भागात केले आहे. यातील एका गुहेत पाण्याचे टाके असुन दुसऱ्या गुहेच्या आत तीन बाजुस तीन विहार आहेत. यातील दरवाजा समोरील विहारात ५ फुट उंचीची भवानी मातेची मुर्ती स्थापन केलेली आहे. लेण्यासमोर नव्याने बांधलेली दीपमाळ असुन आवारात भग्न झालेली गणेशमुर्ती आहे. लेण्यातील भवानी मातेला वंदन करून आपण पुढे गडमाथ्याकडे निघायचे. माथ्यावर जाण्यासाठी लेण्याच्या उजवीकडे असलेल्या कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत. या पायऱ्याच्या खालील बाजुस गडावर येणारा जुना मुळ मार्ग दिसतो. आपण लेण्यापर्यंत चढुन आलेल्या पायऱ्या या अलीकडील काळात बांधलेल्या आहेत. कातळात कोरलेल्या पायऱ्या चढुन वर आल्यावर उजवीकडे जाणारी वाट आपल्याला कडा डावीकडे व दरी उजवीकडे ठेवत गडमाथ्याकडे नेते. या वाटेने जाताना कडयाच्या काठावर असलेली गडाची ढासळलेली तटबंदी पहायला मिळते. गडाचा दरवाजा पुर्णपणे ढासळलेला असुन त्याचा केवळ तळपाया शिल्लक आहे. या उद्ध्वस्त दरवाजातुनच आपण गडावर प्रवेश करतो. गडांची उंची कमी असल्याने मणिकपुंज गावातुन अर्ध्या तासात आपण गडावर पोहोचतो. किल्ल्याचा माथा दक्षिणोत्तर ७ एकरवर पसरलेला असुन समुद्रसपाटीपासुन १९७० फुट उंचावर आहे. गडमाथ्यावर आल्यावर समोर दिसणाऱ्या टेकाडाच्या दिशेने गडफेरीला सुरुवात करायची. या टेकडावर आल्यावर डाव्या बाजुस खडकात खोदलेलं भलेमोठे पाण्याचे टाके नजरेस पडते तर उजव्या बाजुस खडकात खोदलेला वास्तुचा चौथरा दिसतो. चौथरा चढण्याच्या पायऱ्या देखील खडकात खोदलेल्या आहेत. चौथरा पाहुन पुढे आल्यावर ध्वजस्तंभाच्या उंचवट्यावर पिराचे थडगे असुन तेथुन पुढे खाली उतरल्यावर एका झाडाखाली शेंदुर फासलेले काही दगड पहायला मिळतात. या ठिकाणी उतारावर तटबंदीचे दगड रचलेले आहेत. टेकाड उतरुन डावीकडे वळल्यावर एका मोठय़ा झाडाजवळ अर्धवट बुजलेले खडकात खोदलेले पाण्याचं खांबटाके दिसते. या टाक्यापासुन पुढे आल्यावर तिसरे लहान पण खोल पाण्याचे टाके नजरेस पडते. या टाक्यात मोठया प्रमाणात माती साठलेली आहे. हे टाके पाहुन पुढे आल्यावर टेकाडाच्या उतारावर कातळात कोरलेले बांधीव टाके दिसते. हे टाके उतारावर असल्याने पुर्णपणे मातीने भरलेले आहे. या वाटेने सरळ पुढे आल्यावर आपण किल्ल्यावर प्रवेश केलेल्या ठिकाणी पोहोचतो. दरवाजाच्या या भागात काही प्रमाणात तटबंदी पहायला मिळते. येथुन खाली न जाता सरळ पुढे आल्यावर आपण किल्ल्याच्या उत्तर टोकावर पोहोचतो. या ठिकाणी डोंगराला मोठी खाच मारून किल्ल्याचे उत्तर टोक पुढील डोंगरसोंडेपासुन वेगळे केलेले आहे. येथुन दरवाजाकडे परत आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. गड फिरताना अनेक ठिकाणी दगड काढण्यासाठी तसेच बांधकामासाठी खडकात कोरलेले खळगे दिसतात. गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून अंकाई-टंकाई,गोरखगड तसेच कात्रा किल्ला नजरेस पडतो. गडाचा माथा लहान असल्याने गड पाहण्यास अर्धा तास पुरेसा होतो. सोळाव्या शतकाच्या सुरवातीस झालेल्या बहमणी व गुजरात सुलतान यांच्यातील लढाईत माणिकपुंज किल्ल्याचा ओझरता उल्लेख येतो. याशिवाय गावातील तळ्याच्या काठावर शंभु महादेवाचं प्राचीन मंदिर व या मंदिराभोवती अनेक सुंदर मुर्ती, नक्षीदार खांब व कोरीव दगड पडलेले पहायला मिळतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!