माणिकगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : चंद्रपुर
उंची : १६५० फुट
श्रेणी : सोपी
चंद्रपूर जिल्ह्यातील दक्षिण चंद्रपूरचा भाग घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. या भागात असलेले गडचांदुर शहर हे येथे असलेल्या माणिकगड सिमेंट कारखान्यामुळे सर्वत्र प्रसिध्द आहे. पण ज्या किल्ल्यामुळे या कारखान्याला माणिकगड नाव पडले तो किल्ला मात्र प्रसिद्धीपासुन वंचितच आहे. महाराष्ट्रात माणिकगड नावाचे दोन किल्ले असुन रायगड जिल्ह्यातील माणिकगड दुर्गप्रेमीना परीचीत आहे पण महाराष्ट्राच्या टोकाला असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यातील माणिकगड किल्ल्याची माहीती सहजपणे मिळुन येत नाही. कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराजवळ असलेला हा किल्ला गडचांदूर-जिवती मार्गावर गडचांदूर शहरापासून ११ कि.मी. अंतरावर गर्द झाडीमध्ये विसावलेला आहे. गडचांदूर येथुन खाजगी वाहनाने आपण थेट किल्ल्याजवळ असलेल्या वाहनतळावर पोहोचतो. किल्ला वनखात्याच्या अखत्यारीत असल्याने किल्ल्यावर जाण्यासाठी वनखात्याकडून प्रतीव्यक्ती १० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. वनखात्याची चौकी जेथे आहे तेथुन डाव्या बाजुला दरीत ५ मिनिटाच्या चालीवर प्राचीन विष्णुमंदिर आहे. हे मंदिर एका दगडी चौथऱ्यावर उभारलेले असुन मंदिराचे दगडी छत २१ नक्षीदार खांबावर तोललेले आहे.
...
या खांबाच्या तळाशी देवीदेवतांची शिल्प कोरलेली असुन काही ठिकाणी कामशिल्प कोरलेली आहेत. मंदिराच्या सर्व भागात मोठ्या प्रमाणात नक्षीकाम केलेले आहे. मंदीरात दोन गर्भगृह असुन एकात शेषशायी विष्णु तर दुसऱ्यात महादेवाची पिंड आहे. विष्णूच्या मागील प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. मंदिराशेजारी पुष्करणी असुन त्यातील कुंडात वर्षभर पिण्याचे पाणी असते. मंदिराच्या आवारात काही देवतांच्या मुर्ती तसेच कोरीव शिल्प पहायला मिळतात. हे मंदिर पाहुन पुन्हा वनखात्याच्या चौकीकडे यावे. चौकीसमोरून जाणारा कच्चा रस्ता पाच मिनीटात आपल्याला दरीकाठावर असलेल्या किल्याच्या उत्तराभिमुख दरवाजात घेऊन येतो. किल्ल्याचा दरवाजा आजही सुस्थितीत असुन त्याचे काही प्रमाणात नुतनीकरण करण्यात आले आहे. दरवाजाच्या दर्शनी भागात दोन्ही बाजूला हत्तीवर आरूढ झालेला सिंह हे गोंड सत्तेचे राजचिन्ह तसेच व्याल, नागशिल्प व इतर काही शिल्प पहायला मिळतात. या दरवाजाने आत शिरल्यावर आपण चारही बाजुने तटबंदीने बंदिस्त केलेल्या आवारात पोहोचतो. येथे समोरच तटबंदीला लागुन पाण्याचे बांधीव टाके असुन त्या शेजारी किल्ल्याबाहेर जाणाऱ्या भुयारी मार्गाचा दरवाजा आहे. या दरवाजावर व आत मोठ्या प्रमाणात माती जमा झाली असुन चौकटीवर गणेशाची मुर्ती कोरलेली आहे. मुख्य दरवाजाच्या आतील भागात काटकोनात गडाचा दुसरा पश्चिमाभिमुख दरवाजा आहे. हा संपुर्ण भाग आतील तटबंदीवरून मारा करण्याच्या टप्प्यात आहे. गडाचा दुसरा दरवाजा कलात्मकतेने बांधलेला असुन आतील भागात दोन्ही बाजुस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. या देवड्यांवर काही प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. डोंगराचा हा संपुर्ण भाग घळीप्रमाणे कोरून काढलेला असुन घळीच्या सुरवातीस हा दरवाजा बांधलेला आहे. घळीच्या या वाटेने थोडे पुढे आल्यावर या वाटेला दोन वाटा फुटलेल्या असुन येथे किल्ल्याचे अवशेष दर्शविणारा फलक लावलेला आहे. आपण उजवीकडील तटबंदी शेजारील वाटेने आपली गडफेरी सुरु करायची. वाटेच्या सुरवातीला एक बुरुज असुन त्यावर पहारेकऱ्यासाठी दगडी बांधकामातील चौकी उभारली आहे. हि चौकी आपल्याला पोर्तुगीज बांधकामातील कॅप्सुल बुरुजाची आठवण करून देते. येथुन थोडे पुढे आल्यावर तटबंदी शेजारी ८ फुट लांबीची बांगडी तोफ पहायला मिळते. तोफ पाहुन पुढे आल्यावर आपण तटबंदीत असलेल्या टहाळकी बुरुजावर पोहोचतो. येथे गडाची समुद्रसपाटीपासून उंची १६५० फुट आहे. या बुरुजावर वनखात्याने संवर्धन केलेली वास्तु असुन हि वास्तु म्हणजे राजपरीवारासाठी बांधलेले दालन असावे. या दालनात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे असुन दगडी कमानीवर तोललेले छत आहे. छतावर जाण्यासठी वास्तुच्या आतील बाजूने जिना आहे. या बुरुजासमोर एक फुटकी तोफ असुन आतील जंगलात काही वास्तुंचे चौथरे आहेत. बुरुज पाहुन पुढे आल्यावर डावीकडे चुना भिजवण्याचे टाके पहायला मिळते. येथुन पुढे आल्यावर वाटेला पुन्हा दोन फाटे फुटतात. या ठिकाणी वनखात्याने निवारा बांधलेला आहे. आपण सरळ न जाता प्रथम डावीकडे वळायचे. हि वाट आपल्याला चौकोनी आकाराच्या एका प्रचंड मोठ्या विहिरीजवळ घेऊन जाते. ८० x ८० फुट आकाराची व तितकीच खोल असणारी हि विहीर गडाच्या बांधकामासाठी दगड काढल्याने निर्माण झाली आहे. या विहिरीत उतरण्यासाठी बांधीव तसेच खोदीव पायऱ्या असुन या पायऱ्यांची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. विहिरीत उतरताना डाव्या बाजुच्या भिंतीत एक लहान देवळी कोरलेली आहे. या विहिरीच्या आतील भागात १५ x १५ फुट आकाराची दुसरी खोल विहीर असुन या विहिरीत मात्र पाणी आहे. वनखात्याने कठडे बांधुन हा संपुर्ण भाग संरक्षित केला आहे. विहीर पाहुन झाल्यावर मागे फिरून पुन्हा मुख्य वाटेवर यावे व आपली पुढील गडफेरी सुरु करावी. थोडे पुढे आल्यावर आपल्याला तटबंदी पासुन काही अंतरावर असलेला आठ फुट उंचीचा दरवाजा पहायला मिळतो. हि जागा नकाशावर घोड्याची पागा म्हणुन दर्शविली आहे पण या ठिकाणी कोरडी पडलेली आयताकृती आकाराची विहीर असुन आता या विहिरीत मोठ्या प्रमाणात माती जमा झालेली आहे. विहिरीच्या एका बाजुस पाणी काढण्याची मोट असुन दुसऱ्या बाजुस आत प्रवेश करण्यासाठी दरवाजा आहे. येथुन थोडे पुढे आल्यावर आपण किल्ल्याच्या दुसऱ्या टोकावर पोहोचतो. या ठिकाणी मोठा बुरुज बांधण्यात आला असुन तेथुन गडचांदूरपर्यंतचा प्रदेश नजरेस पडतो. येथुन पुढे जाताना आपल्याला तटबंदी बाहेर उतरणारी लहानशी वाट म्हणजे गडाची चोरवाट पहायला मिळते. तटबंदीच्या काठाने तसेच पुढे आल्यावर आपण निजामगोंदी दरवाजा जवळ पोहोचतो. याची रचना देखील आपण प्रवेश केलेल्या घळीच्या दरवाजा प्रमाणे असावी. हा भाग उतारावर असल्याने या घळीतुन वाहत येणाऱ्या पाण्याने हा दरवाजा आता पुर्णपणे नष्ट झालेला आहे. वनखात्याने या ठिकाणी तटबंदी सारखे बांधकाम करून पाणी वाहुन जाण्यासाठी वाट ठेवलेली आहे.येथुन मळलेल्या वाटेने सरळ पुढे आल्यावर आपण गणपती चौकात पोहोचतो. गडावर फिरणाऱ्या अनेक वाटा या ठिकाणी एकत्र येत असल्याने वनखात्याने या ठिकाणी गडावर इतरत्र सापडलेली गणपतीची मुर्ती ठेऊन याला गणेश चौक नाव दिलेले आहे. येथुन डावीकडे जाणारी वाट प्रवेशद्वाराकडे तर उजवीकडील वाट राणीमहाल व तलावाकडे घेऊन जाते. आपण उजवीकडील वाटेने आपली उर्वरीत गडफेरी सुरु ठेवावी. या वाटेने डावीकडील तटबंदीवर आजही शिल्लक असलेल्या चर्या पहायला मिळतात. वाटेने खाली उतरताना या भागात मोठ्या प्रमाणात अवशेष असल्याचे दिसुन येते. थोडे खाली आल्यावर आपण गडावरील सर्वात सुंदर वास्तु असलेल्या राणी महालाजवळ पोहोचतो. या ठिकाणी तटाबाहेर मोठा तलाव असुन रुंद असलेल्या या तटबंदीत दालने बांधुन त्यात तलावाच्या दिशेने दालने ठेवलेली आहे. तटबंदी बाहेर तलावाच्या दिशेने आयताकृती आकाराचा बुरुज बांधुन त्या बुरुजात तलाव बांधलेला आहे. तटबंदीच्या एका बाजुला दुमजली दालने असुन वरील दालनात राहण्याची सोय तर खालील दालनात बुरुजातील तलावात तसेच तटबंदी बाहेर जाण्यासाठी दरवाजे आहेत. तटबंदीच्या आतील भागात उतार असल्याने मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असुन या झाडीत एक मोठा तलाव पहायला मिळतो.तटबंदीच्या पुढील भागात मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने तेथे जाता येत नाही. येथुन मागे फिरून गणपती चौकात आल्यावर डावीकडील वाट आपल्याला प्रवेशद्वारावर घेऊन जाते. संपुर्ण किल्ल्याचा परीसर साधारण ९५ एकर असुन किल्ला फिरण्यास तीन तास पुरेसे होतात. प्राचीन काळापासुन विदर्भावर वेगवेगळ्या राजसत्ता नांदल्या व त्यांनी काळानुरूप किल्ल्यांची बांधणी केली. सातवाहन काळानंतर ९ व्या शतकात विदर्भावर माना जातीच्या नागवंशीय राजांनी सत्ता स्थापन केली. यांचे राज्य ९ व्या शतकापासुन १२ व्या शतकापर्यंत टिकले. त्यांनी विदर्भात वैरागड, माणीकगड, सुरजागड या सारख्या किल्ल्यांची बांधणी केली. नागवंशीय राजा महिन्दु/गहलू ? यांनी माणिकगड किल्ला नवव्या शतकात बांधल्याचे उल्लेख येतात. या मानावंशीय नाग राजाची देवता माणिक्यदेवीच्या नावावरूनच या किल्ल्याला माणिकगड नाव दिले असावे. या किल्ल्यांच्या दरवाजावर असलेली नागशिल्पे पहाता या गोष्टीस पृष्टी मिळते. १३व्या शतकात विदर्भात गोंड राजवट उदयास आली व त्यांनी या भागावर आपली सत्ता स्थापन केली. वैरागड, माणीकगड व सुरजागड हे किल्ले गोंडानी आपल्या ताब्यात घेऊन त्याचे नुतनीकरण केल्याचे उल्लेख येतात. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ ४०० वर्षे राज्य केले त्यामुळे त्यांच्या संस्कृतीची छाप या किल्ल्यावर दिसुन येते. प्रवेशद्वारावर असलेले हत्तीवर आरूढ झालेल्या सिंहाचे शिल्प हे त्यांचे राजचिन्ह म्हणून ओळखले जाते. गोंड राजांचा सुरुवातीचा काळ वगळता नंतरच्या काळात मुस्लीम राजवटीचे मांडलिकत्व पत्करल्यामुळे त्यांच्यावर युद्धाचे फारसे प्रसंग ओढवलेच नाहीत. नगरधन, भद्रावती, रामटेक, नागपूर, पवनी, माहुरगड, अंबागड, भिवगड हे गोंडकालीन किल्ले आज विदर्भात पहायला मिळतात. १८ व्या शतकाच्या सुरवातीस गोंड वारसाहक्काच्या अंतर्गत कलहात विदर्भावर नागपूरकर भोसल्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले व या प्रदेशावर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित झाली. इ.स.१७९० साली नानासाहेब भोसले यांनी किल्ल्याची काही प्रमाणात दुरुस्ती केली. इ.स.१८१८मध्ये अप्पासाहेब भोसले यांच्या काळात इंग्रज-मराठा युद्धात हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पुढे नागपूरचे राजे रघुजी भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांना वारस नसल्याचे कारण दाखवत त्यांचे राज्य खालसा करून हा प्रदेश ब्रिटिश साम्राज्यास जोडला गेला.
© Suresh Nimbalkar