माझगाव

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : मुंबई

उंची : २५ फुट

श्रेणी : सोपी

मुंबईमध्ये किल्ले म्हटले कि आपल्याला थोडे आश्चर्य वाटते पण कधीकाळी ब्रिटीशकाळात मुंबईसारख्या शहरातसुद्धा अकरा किल्ले होते. पोर्तुगीज व ब्रिटीश यांच्या वेगवेगळ्या कालखंडात यांची बांधणी झाली. मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर वरळी, माहीम,बांद्रा,मढ हे किल्ले तर दक्षिणेकडील किनारपट्टीवर काळा किल्ला. रीवा किल्ला, सायन किल्ला या किल्ल्यांची साखळी निर्माण करण्यात आली. पुर्वेला शिवडी,माझगाव, डोंगरी, बॉम्बे फोर्ट आणि सेंट जॉर्ज फोर्ट मुंबईचे रक्षण करत होते. यातील माझगाव व डोंगरी हे किल्ले पूर्णपणे नष्ट झालेले असुन बॉम्बे फोर्ट व सेंट जॉर्ज फोर्ट यांचे केवळ एक-दोन अवशेष शिल्लक आहेत. मुंबईतील डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या टेकडीवर मुंबई बेटावरील बॉम्बे फोर्ट पाठोपाठ आकाराने सर्वात मोठा माझगाव किल्ला होता. जेव्हा मुंबई बेटांच्या स्वरूपात होती त्यावेळी हा किल्ला अत्यंत मोक्याच्या जागी होता. या किल्ल्यावर जिवंत झरे असलेल्या विहिरी होत्या. ... स्थानिक राज्यकर्त्यांनी बांधलेला हा किल्ला मुंबई बेटांबरोबर पोर्तुगीजांकडून इंग्रजांना मिळाला. माझगावचा किल्ला नष्ट झाला तो सिद्दीच्या हल्ल्यामुळे. इंग्रजांना मुंबईतून कायमचे हुसकावून लावण्यासाठी इ.स. १६७२ मध्ये जंजिऱ्याच्या सिद्दी याकुतखानाने मुंबईवर केलेल्या हल्ल्यात शिवडी, माझगाव, माहीम हे किल्ले जिंकले. बॉम्बे फोर्ट वर हल्ला करण्यासाठी माजगावच्या किल्ल्यावर तोफा चढवल्या पण या तोफांचा मारा कमी असल्याने त्याची योजना यशस्वी झाली नाही पण इंग्रजांची मात्र चागलीच कोंडी झाली. औरंगजेबाचा वेढा उठविण्याचा हुकुम आल्यावर चिडलेल्या सिद्दीने माजगाव किल्ला उध्वस्त करून त्याला जाळून नष्ट केले. या युद्धात इंग्रजांना ४० लाख रुपये आला तरीही पराभव पत्करावा लागला. औरंगजेबाच्या मध्यस्थीनंतर हे किल्ले पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात देण्यात आले पण हा किल्ला आकाराने मोठा असल्याने इंग्रजांनी त्याकडे लक्ष न देता १६८० मध्ये केवळ शिवडी किल्ल्याची डागडुजी केली व माझगावच्या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाले. पुन्हा हल्ला झाला व हा किल्ला शत्रूच्या हाती पडला तर काय करायचे अशी भीती वाटल्याने ब्रिटिशांनी या किल्ल्याची उभारणी टाळली व हा किल्ला कायमचा जमीनदोस्त झाला. १८१८ साली पेशवाईच्या अस्तानंतर संपुर्ण भारत इंगजांच्या ताब्यात आला व त्यांना माझगावच्या किल्ल्याची काहीच आवश्यकता उरली नाही. १८८०-८४ या काळात ब्रिटिशांनी येथे पाण्याची टाकी बांधुन त्या टाकीस जॉन ग्रॅण्ट यांचे नाव देण्यात आले. हार्बर रेल्वे रुळाच्या विस्ताराच्या काळात या किल्ल्याच्या टेकडीचा बराचसा भाग उध्वस्त करण्यात आला. १९व्या शतकात या टेकडीवर बगिचा बनवण्यात आला. आज हा किल्ला वा त्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नसुन किल्ल्याच्या जागी मुंबई महानगरपालिकेची बाग आहे. या बागेचा आकार पहाता मुंबई किल्ल्यानंतर आकारमानाने हाच किल्ला मोठा असल्याची खात्री पटते. किल्ल्यातून दक्षिणेस कुलाबा बेटापर्यंत, पश्चिमेस वरळीपर्यंत व उत्तरेस अगदी शिवडीपर्यंत मुलुख दिसतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!