मांडवी

प्रकार : भुईकोट

जिल्हा : पालघर

उंची : 0

श्रेणी : सोपी

मांडवी कोटास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने विरार अथवा वसई स्थानकास उतरावे. मांडवी कोट वसई रेल्वे स्थानकापासून २० कि.मी. तर विरार स्थानकापासून १० कि.मी.वर मुंबई-अहमदाबाद मार्गालगत मांडवी गावात आहे. या कोटाविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना काहीच माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी पुर्ण माहिती घेऊनच जाण्याचे ठरवावे. वसई एस.टी स्टॅण्डवरुन दर पाऊण तासाने वज्रेश्वरीला जाणाऱ्या बसेस सुटतात. या बसेस मांडवीवरुन जातात. खाजगी वाहनाने जाताना मुंबई अहमदाबाद महामार्गावर शिरसाड नाका आहे. या नाक्यावर एका बाजूला विरार फाटा तर दुसऱ्या बाजूला वज्रेश्वरी फाटा आहे. वज्रेश्वरीच्या फाट्यावरुन सुमारे एक किलोमीटर अंतरावर मांडवी गावात तलावाच्या पूर्वेस चिमाजी आप्पांची शौर्यगाथा सांगणारा ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असलेला मांडवी कोट आहे. ... मांडवी याचा अर्थ जकातनाका असा होतो. मांडवीचा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला पण तो नेमक्या कोणत्या वर्षी बांधला याची माहिती नाही. परंतु उत्तर कोकणचा प्रदेश ताब्यात आल्यानंतर व शिवकालापूर्वी हा किल्ला बांधण्यात आला असावा. आकाराने आयताकृती दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्याच्या चार कोपऱ्यात चार अष्टकोनी बुरुज आणि दक्षिणेस एक व उत्तरेस एक अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. दोन्ही प्रवेशद्वारांच्या दुतर्फा रक्षकांच्या देवड्याचे अवशेष आजही शिल्लक आहेत. दोन्ही दरवाजे पोर्तुगीज शैलीतील असुन दक्षिणेकडील दरवाजा उत्तरेकडील दरवाज्यापेक्षा अधिक रुंद आहे. दरवाज्याच्या भिंतीत अडसर घालण्याकरता असलेल्या चौकोनी खाचा आजही दिसून येतात. किल्ल्याच्या चारही कोपऱ्यातील चारही बुरुज आज ढासळलेले असले तरीही त्यांचे पाया शिल्लक असल्यामुळे हे बुरुज अष्टकोनी असल्याचे लक्षात येते. आग्नेय, नैऋत्य, वायव्य या दिशांकडील बुरुजांचे पायाचे अवशेष ते अष्टकोनी असल्याची साक्ष देतात. मात्र ईशान्येकडील बुरुज ढासळून त्यावर मातीचा ढीग जमल्याने बुरुजाचा पायाचा आकार समजू शकत नाही. तथापि ज्याअर्थी बाकी तीन बुरुज अष्टकोनी आहेत त्याअर्थी हाही बुरुज अष्टकोनीच असावा. किल्ल्याच्या भिंती मजबूत बनाव्यात यासाठी तटाला काटकोनात आधारभिंती किल्ल्याच्या पूर्व व पश्चिम तटांना आहेत. किल्ल्याचे तट पूर्णपणे म्हणजे त्यांच्या मूळ उंचीत टिकून राहिलेले नाहीत. त्यामुळे तटाच्या वरच्या भागात काही गोळीबार गवाक्षे असतील तर ती आज पडून गेली आहेत. किल्ल्याच्या अंतर्भागात वाळलेल्या गवताचा इतका मोठा थर साठला आहे की अंतर्भागातील वास्तूंचे काही पाये शिल्लक असतील तर ते सफाई केल्याशिवाय उजेडात येणे अशक्य. किल्ल्याच्या तटाचा वरचा भाग व बुरुज पूर्णत: पडून गेलेले असून झाडीही बऱ्यापैकी वाढली आहे. तरीही किल्ल्याचे स्वरुप जाणता येईल इतपत अवशेष शिल्लक आहेत. सदर कोटाची बांधणी पोर्तुगीज स्थापत्य शास्त्राप्रमाणे असुन साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी या कोटाची निर्मिती केली. या किल्ल्यात नैऋत्य दिशेच्या बुरुजाच्या पायावरुन या किल्ल्याच्या बुरुजांच्या बांधणीची कल्पना येते. बुरुजाचा बाह्यभाग दगडांनी बांधलेला होता. तळपायात दगडी बांधकामाची बाह्यभाग अष्टकोनी असला तरी अंतर्भाग गोलाकार आहे. आतील भागात माती व मुरुम टाकुन भरीव बनवला होता. मांडवी कोटाच्या इतिहास साक्षी अवशेषांत चार बुरूज, अष्टकोनी बुरुजाजवळील नर्तिकेची मूर्ती, जैन बौद्ध मंदिराचे पाये, वीरगळ, कीचक शिळा, महावीर मूर्ती, शिवमंदिराचे अवशेष, भक्कम तटबंदी इत्यादींची नोंद होते. इतिहासाचे संदर्भ पाहताना ठाण्याच्या कलेक्टर ऑफिसच्या आवारात शिलाहारकालीन शिलालेखात मांडवी गावाचा उल्लेख आहे. पूर्वी सोपाऱ्याहून थळ घाटाकडे मोठा वाहतुकीचा रस्ता होता त्यावरच हे ठाणे असल्यामुळे या ठाण्याला खूप महत्त्व होते. ३० मार्च १७३१च्या पोर्तुगीज व्हाईसरॉयने आपल्या बादशहास लिहिलेल्या पत्रात मांडवीचा उल्लेख आहे. इ.स.१७३७ ते १७३९ च्या फिरंगाणावरील मोहिमेत मांडवी किल्ला जिंकण्याची कामगिरी बरबाजी ताकपीर या चिमाजी अप्पांच्या सरदारावर सोपविण्यात आली होती. ३ एप्रिल १७३७ रोजी बरबाजीने मांडवीस वेढा दिला व तोफांचा मारा केल्याने एक तोफगोळा लागुन किल्ल्याचा एक दरवाजा मोडून पडला. 6 एप्रिल रोजी आणखी दोन तोफा गोखीवरेवरून आणून त्या जोडून त्यांचाही मार सुरु केला. ११ एप्रिल रोजी केशव सजणाजी या भिवंडीच्या ठाणेदाराने एक नवीन गोलंदाज बरबाजीकडे पाठवून दिला. १५ एपिलपर्यंत मराठ्यांचा मारा चालूच होता. परंतु आदल्या दिवसापासून फिरंगी मारा न करता शांत होता तेव्हा मराठ्यांनी ताडाची झाडे तोडून त्या लाकडांचा दमदमा तयार केला व त्यावर तोफा चढवून किल्ल्यात मारा करण्यास सुरवात केली. या वेढ्यात तुकनाक महाराचा एक मोर्चा होता. त्याच्या मोर्चेकऱ्यांनी फार मेहेनत केली. मुख्यत: त्याच्याच मोर्च्यामुळे व बंदरावरुन आणलेल्या तोफेच्या मारामुळे मांडवीचा किल्ला मेटाकुटीस आला. १ मे १७३७च्या सुमारास मांडवीच्या पोर्तुगीज किल्लेदाराने मांडवी कोटात शरणागती पत्करली. या कोटांचा मुख्य उपयोग या प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद आणि संरक्षण पुरविणे हा होता. लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स. १७३९च्या वसई मोहिमेत वसई किल्ल्यावरील विजयानंतर हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. मांडवी किल्ल्यास विविध कागदपत्रांत मांडवी किल्ला, मांडवी कोट, मांडिवी माडवी असे संदर्भ मिळतात. तलावाच्या बाजूस असलेल्या किना-याच्या दाट झाडीत मार्ग काढत भ्रमंती केल्यास ब-याच प्राचीन मूर्त्यां पाहता येतात. कोट छोटेखानी असून अर्ध्या तासात पाहून होतो. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. वसई प्रांताचा प्रामाणिक इतिहास सांगणारा मांडवीचा किल्ला नामशेष झालेला नसून विस्मृतीत गेलेला आहे हे अभ्यासण्यासाठी दुर्गमित्रांनी या किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रत्यक्षपणे अभ्यास सफर करावी असे श्रीदत्त राऊत यांनी दुर्गप्रेमींना आवाहन केले आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!