मांजरे

प्रकार : गढी

जिल्हा : नंदुरबार

उंची : 0

श्रेणी : सोपी

अदीवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी एक दोन नव्हे तर तब्बल १७ किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी या स्वरुपात अस्तित्वात होते. आजच्या संगणकाच्या युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व किल्ल्यांचा अभ्यासपुर्ण दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. यातील हटमोईदा व अष्टे या दोन गढी पुर्णपणे नष्ट झालेल्या असुन उरलेले १५ गढीकिल्ले त्यांचे उर्वरित अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आजही उभे आहेत. या १५ किल्ल्यात १ गिरिदुर्ग असुन ३ भुईकोट २ नगरकोट तर उरलेल्या ९ गढी आहेत. स्थानिकांची उदासीनता या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. रनाळा गढी हे त्याचेच एक उदाहरण आहे. खानदेश प्रांत साडेबारा रावळाचे वतन म्हणुन देखील ओळखला जातो. रावळ हि येथील कुळांना मिळालेली पदवी असुन या रावळात सिसोदिया, सोळंकी, परमार, प्रतिहार अशी वेगवेगळी कुळे आहेत. ... हि साडेबारा वतन म्हणजे १.दोंडाईचा २.मालपुर ३.सिंदखेडा ४.आष्टे ५.सारंगखेडा ६.रंजाणे ७.लांबोळा ८.लामकानी ९.चौगाव १०. हटमोईदा ११.रनाळा १२.मांजरे १३.करवंद हे अर्धे वतन खानदेशात व अर्धे खानदेश बाहेर असल्याने अर्धे वतन म्हणुन ओळखले जाई. यातील आष्टे, लांबोळा, चौगाव, हटमोईदा या ४ गढी पुर्णपणे नष्ट झालेल्या असुन ४ गढी आजही त्यांच्या मूळ रुपात शिल्लक आहेत तर उरलेल्या ५ गढी त्यांचे अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आहेत. यातील बहुतांशी गढीकोटात गावे वसलेली असल्याने गावातील वाढत्या वस्तीने या कोटांच्या अवशेषांचा घास घेतला आहे तसेच स्थानिकांची उदासीनता देखील या कोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. यात मांजरे गढीचा समावेश होतो. मांजरे गढी नंदुरबार शहरापासुन २७ कि.मी. अंतरावर असुन रनाळा मार्गे तेथे जाता येते. मांजरे गावाच्या कमानीतून आत शिरल्यावर एक रस्ता लगेचच डावीकडे वळतो. या रस्त्याच्या टोकाला महाराणा प्रताप यांचे स्मारक आहे. या स्मारकाच्या उजव्या बाजुला मांजरे गढीचे अवशेष अखेरचा श्वास घेत आहेत. गावकऱ्यांनी दाखवलेल्या या अवशेषात एक विहीर व शेजारी चुन्यात बांधलेला हौद असुन कोसळलेल्या बुरुजाचा मातीचा ढिगारा आहे. गढीत असलेल्या वस्तीने गढीची तटबंदी व इतर अवशेष नष्ट केल्याने गढीचा आकार व इतर अवशेष याबाबत अंदाज करता येत नाही गढीचे अवशेष पहाण्यास दहा मिनिटे पुरेशी होतात. मांजरे गढीचे हे तुरळक अवशेष वगळता कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत त्यामुळे हि गोष्ट ध्यानात ठेवुनच या ठिकाणाला भेट दयावी. इतिहासाची पाने चाळली असता खालील नोंदी आढळतात. इ.स.१३३२ मध्ये चावंडिया राजपूत अमरसिंह यांनी तोरणमाळ परिसरावर कब्जा मिळवला. याच वंशातील फतेसिंह रावळ यांनी मांजरा गाव वसवून त्याशेजारी १३ गावे वसवल्याची नोंद आढळते. वेळोवेळी सत्ताबदल झाले तरी या रावळाचे अधिकारात त्या त्या काळातील सत्ताधीशांनी कोणतेही बदल केले नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!