महिमतगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : रत्नागिरी
उंची : २५३५ फुट
श्रेणी : मध्यम
उत्तुंग सह्याद्री पर्वतात उगम पावलेल्या नद्यांच्या मार्गावर अनेक धबधबे पहायला मिळतात. संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर धबधबा हा असाच निसर्गाचा सुंदर आविष्कार. मार्लेश्वर धबधबा व देवस्थान या ठिकाणाला अनेक पर्यटक भेट देतात पण येथुन समोरच्या डोंगरावर हाकेच्या अंतरावर असलेल्या महीमतगडाकडे मात्र कोणाचीही पावले वळत नाही. प्राचीनकाळी बंदरावर उतरलेला माल घाटमार्गाने देशावर जात असे. या घाटमार्गाच्या रक्षणासाठी सह्याद्रीच्या माथ्यावर गिरीदुर्ग तर किनारपट्टीवर सागरीदुर्ग प्राचीन काळापासून उभे आहेत. संगमेश्वर ते कोल्हापुर या बाजारपेठांना जोडणाऱ्या कुंडी या प्राचीन घाटमार्गाच्या रक्षणासाठी महिमतगडाची उभारणी करण्यात आली. गडावर खडकात खोदलेली पाण्याची खांबटाकी पहाता गडाची निर्मीती शिवपुर्वकाळात झाल्याचे दिसुन येते. गडावर जाण्यासाठी कुंडी व निगुडवाडी हि दोन पायथ्याची असुन या दोन्ही गावाना जोडणारा कच्चा रस्ता गडाच्या पायथ्याहून जातो.
...
सध्या (जानेवारी २०१९) हा रस्ता दोन्ही बाजुंनी मोठया प्रमाणात खचला असुन निगुडवाडीतुन गेल्यास खाजगी वाहनाने गडाच्या अर्ध्या उंचीपर्यंत जाता येते. येथुन किल्ल्यावर जाण्यास १.३० तास पुरेसा होतो. महिमतगडावर जाण्यासाठी सर्वप्रथम देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे ठिकाण गाठावे. देवरुख गावापासून १० कि.मी. अंतरावरील बेलारी गावातुन डावीकडील रस्ता ५ कि.मी.वरील कुंडी गावात तर उजवीकडील रस्ता २ कि.मी.वरील निगुडवाडीत जातो. खाजगी वाहन असल्यास निगुडवाडीतून ४ कि.मी.चा कच्चा रस्ता पार करत आपण किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर येतो अन्यथा चालत हे अंतर पार करण्यास १ तास लागतो. या वाटेने किल्ला उजव्या बाजूस ठेवत आपण खिंडीत पोहोचतो. येथुन समोर कुंडी गावाच्या दिशेने उतरत जाणारी पायवाट दिसते तर उजव्या बाजूस गडाच्या बुरुजाच्या दिशेने झाडीत शिरणारी पायवाट दिसते. या वाटेवर आपल्याला गडाखाली असलेल्या मेटाचे अवशेष पहायला मिळतात. या वाटेने १५ मिनिटात आपण बुरुजाकडे जाणाऱ्या सोंडेखालील मोकळ्या भागात येतो. येथुन गडावर जाणाऱ्या वाटेचे निगुडवाडीतील तरुण मंडळीनी अतिशय सुंदर रीतीने संवर्धन केलेले असुन काही बांधीव तर काही कोरीव पायऱ्या पार करत अर्ध्या तासात आपण गडाच्या दरवाजाखाली पोहोचतो. कुंडी गावाकडून येणारी वाट देखील याच ठिकाणी येते. दरवाजाखालील भागात मोठमोठया रचीव दगडांची तटबंदी बांधलेली असुन या तटबंदीच्या आतील झाडी तोडल्याने काही वास्तुंचे अवशेष दिसतात. येथुन तुटलेल्या पायऱ्यांनी दरवाजाकडे जाताना वाटेच्या उजव्या बाजुस देवाला वाहिलेल्या लाकडावर कोरलेल्या काही मानवाकृती पहायला मिळतात. या वाटेने आपण किल्ल्याच्या पुर्वाभिमुख दरवाजाने गडात प्रवेश करतो. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस देवड्यांचे केवळ चौथरे शिल्लक असुन आतील आवार पुर्णपणे तटबंदीने बंदीस्त केलेले आहे. दरवाजाच्या डाव्या बाजुस किल्ल्यावरील वास्तु दाखवणारा नकाशा लावलेला आहे. गडाची तटबंदी आजही शिल्लक असुन घडीव दगडांच्या या तटबंदीचे बांधकाम सांधण्यासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले नाही. तटबंदीच्या या आवारात खडकात खोदलेली एकुण सात टाकी असुन यातील तीन खांबटाकी आहेत. त्यातील एका टाक्याचे तोंड वरून ढासळलेल्या दगडांनी बंद झाले असुन काही टाकी अर्धवट कोरलेली आहे. यातील एका टाक्यातील पाणी शेवाळलेले असले तरी पिण्यायोग्य आहे. दरवाजासमोर तटबंदीला लागुन एक कोरडे पडलेले बांधीव टाके असुन टाक्यामागे असलेल्या तटबंदीत एक शौचकूप पहायला मिळते. येथुन वर किल्ल्याकडे पहिले असता दूरवर गेलेली किल्ल्याची तटबंदी व या तटबंदीतील बुरुज पहायला मिळतात. यातील एका बुरुजाला मोठो खिडकी दिसते पण वाढलेल्या झाडीमुळे तिथपर्यंत जाता येत नाही. दरवाजाच्या आतील भाग फिरून पायऱ्यांनी वर आल्यावर गडाचा दुसरा उध्वस्त दरवाजा समोर येतो. दरवाजाच्या उजवीकडील झाडीतुन तटबंदीच्या दिशेने गेल्यावर आपण एका मोठया गोलाकार बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या तसेच तोफेचा मारा करण्यासाठी कमानीदार खिडक्या दिसतात. रस्ता सोडुन किल्ला चढताना हा बुरुज व त्यावर फडकणारा भगवा सतत आपल्या नजरेसमोर असतो. बुरुज पाहुन दरवाजात आल्यावर सरळ वाटेने पुढे निघाल्यावर डाव्या हाताला कोरडा पडलेला तलाव दिसतो. तलावाकडून पुढे आल्यावर वाटेला दोन फाटे फुटतात. यातील उजवीकडील वाट बालेकिल्ल्याकडे तर डावीकडील वाट महिषासुरमर्दिनी मंदीराकडे जाते. या वळणावर उजव्या बाजुस झाडीत दोन सतीशिळा व दोन मुर्ती ठेवलेल्या आहेत. उजवीकडील वाटेच्या सुरवातीला एक लहान पडीक शिवमंदिर असुन मंदिरासमोर असलेला घडीव नंदी व कोरीव दिपमाळेचे विखुरलेले अवशेष पहाता या ठिकाणी मोठे शिवमंदिर असावे. मंदिराच्या मागील बाजुस चौसोपी वाड्याचा चौथरा असुन या ठिकाणी किल्ल्याची सदर किंवा किल्लेदाराचा वाडा असावा. शिवमंदिराच्या पुढील बाजुस एका घुमटीत नव्याने स्थापन केलेली मारुतीची मुर्ती आहे. येथुन दाट झाडीतून वर चढत गेल्यावर आपण बालेकिल्ल्या खाली असलेल्या लहानशा पठारावर येतो. येथून समोरच माचीच्या दुसऱ्या टोकाला असलेला तळातून बांधून काढलेला सुंदर बुरुज दिसतो. हा बुरुज आपल्याला तोरणा किल्ल्यावर असलेल्या झुंजारमाची वरील बुरुजाची आठवण करून देतो. माचीवर मोठया प्रमाणात वाढलेल्या काटेरी झाडीमुळे आपल्याला या किंवा इतर कोणत्याही बुरुजावर तसेच माचीवर जाता येत नाही. बालेकिल्ल्याच्या खालील भागात असलेली तटबंदी पुर्णपणे ढासळली असुन त्यात असलेला दरवाजा नष्ट झाल्याने उध्वस्त तटबंदीतुन आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. बालेकिल्ल्यावर ध्वजस्तंभ वगळता इतर कोणतेही अवशेष नाहीत पण येथुन संपुर्ण किल्ला एका नजरेत पहाता येतो. साधारण त्रिकोणी आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर ४० एकरवर पसरलेला असुन किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची २५३० फुट आहे. किल्ल्याला दोन माच्या असुन या दोन्ही माचीच्या टोकाला असलेले बुरुज आजही सुस्थितीत आहेत पण तिथवर जाता येत नाही. बालेकिल्ल्यावरुन दक्षिणेला विशाळगड व उत्तरेला प्रचितगड दिसतो. बालेकिल्ला उतरुन शिवमंदिराकडे आल्यावर डावीकडील वाट महिषासुरमर्दिनी मंदिराकडे जाते. मंदिराच्या भिंती ढासळलेल्या असुन त्यावर तात्पुरता निवारा उभारलेला आहे. मंदिरात महिषासुरमर्दिनीची कोरीव मुर्ती असुन मुर्तीसमोर दोन लहान तोफा मांडून ठेवलेल्या आहेत. मुर्तीच्या बाजुला काही सतीशीळा,विरगळ व झिजलेल्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. मंदिरासमोरील वाटेने पुढे आल्यावर डाव्या बाजुस झाडीत लपलेला एक वास्तुचा चौथरा असुन या चौथऱ्यासमोर मोठी तोफ ठेवलेली आहे. या बाजुस असलेली किल्ल्याची तटबंदी आजही शिल्लक असुन झाडीत शिरून अंग ओरबाडून घ्यायची तयारी असल्यास या तटबंदीत असलेले ३ बुरुज शोधाशोध केल्यावर पहायला मिळतात. येथील झाडी काढल्यास फांजीवरून फेरी मारत हि तटबंदी व बुरुज सहजपणे पहाता येथील. किल्ल्याला एकुण १० बुरुज असुन ४ बुरुज वगळता कोणत्याही बुरुजावर जाण्यास वाट नाही. त्यामुळे महिषासुरमर्दिनी मंदिराकडून मुख्य दरवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. सद्यस्थितीत माचीवरील बुरुजाकडे जाता येत नसल्याने गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो पण माचीवरील वाटा मोकळ्या झाल्यास संपुर्ण गडफेरी करण्यास दोन तास हाताशी हवेत. गडावर मेट,माची, बालेकिल्ला,तटबंदी,बुरुज,दरवाजे,पाण्याची टाकी व तलाव, मंदीरे, तोफा यासारखे अवशेष असुन केवळ वावर नाही यामुळे हे सर्व अवशेष झाडीत लुप्त होत चालले आहेत. निगुडवाडी समन्वय समिती आणि ग्रामस्थ यांनी महिमतगडाचे संवर्धन करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. या अंतर्गत त्यांनी गडावर जाणारी पाउलवाट पुर्णपणे मोकळी केली असुन व दरवाजासमोर असलेल्या अवशेषांवरील झाडी पुर्णपणे काढली आहे. आता गडावर वावरणाऱ्या वाटा झाडीतुन मोकळ्या करण्याचे ध्येय त्यांच्या समोर आहे. त्यांच्या या कार्याला मनपुर्वक शुभेच्छा!! इतिहासात महिमत गडाबद्दल फारशा नोंदी आढळत नसल्या तरी २९ एप्रिल १६६१ रोजी शिवरायांनी सुर्व्यांचे शृंगारपुर ताब्यात घेतले व त्यावेळी प्रचितगडबरोबर महिमतगड देखील स्वराज्यात सामील झाला.
© Suresh Nimbalkar