महादेवगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सिंधुदुर्ग

उंची : २०९० फुट

श्रेणी : मध्यम

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेले आंबोली पूर्वीपासुनच सावंतवाडी संस्थानाचे थंड हवेचे ठिकाण होते. सह्याद्रीतील निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी येथे काही ठरावीक ठिकाणे असुन त्यापैकी एक ठिकाण म्हणजे महादेवगड पॉंईंट. पण येथे आलेल्या पर्यटकांना हा महादेवगड म्हणजे कधीकाळी एखादा किल्ला असावा याची पुसटशी जाणीव देखील नसते. आंबोली हे ठिकाण मुंबईपासून कोल्हापुरमार्गे ५०६ कि.मी.वर तर सावंतवाडी पासुन ३२ कि.मी अंतरावर आहे. अंबोली गावातुन सावंतवाडीच्या दिशेने थोडे पुढे आल्यावर महादेवगड पॉइंटकडे अशी पाटी दिसते. येथुन उजवीकडे २ कि.मी. अंतरावर असलेल्या महादेवगड पॉंईंट या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. या महादेवगड पॉंईंटच्या खालील बाजुस असलेली डोंगरसोंड म्हणजेच महादेवगड किल्ला होय. या खालच्या सोंडेला जोडून महादेवगडचा डोंगर आहे. महादेवगड पॉंईंटला असणाऱ्या ५०-६० पायऱ्या उतरून या पॉईंटवरुन लांबवर पसरलेली किल्ल्याची डोंगरसोंड पाहता येते. ... मात्र किल्ल्यावर जायचे असल्यास महादेवगड पॉंईंटच्या वाहनतळाशेजारी असलेल्या बांदेश्वर देवस्थानच्या लोखंडी कमानीतून खाली उतरावे लागते. येथुन महादेवगड पॉइंटचा डोंगर डावीकडे ठेवत खाली वळसा मारून महादेव गड आणि अलीकडच्या डोंगर यांना जोडणाऱ्या सोंडेवर जाता येते. हि वाट अतिशय चिंचोळी असुन सुरवातीला जांभ्या दगडातील काही पायऱ्या व नंतर अर्ध्या तासाची घसाऱ्याची वाट पार करत आपण महादेवगडाच्या सोंडेवर पोहोचतो. येथुन थोडे खाली उतरल्यास एका लहान गुहेत असलेले महादेवाचे मंदिर पहायला मिळते. या गुहेत बारमाही जिवंत झरा असलेले पाण्याचे खडकात खोदलेले एक लहान टाके आहे. या टाक्यात पिण्यायोग्य पाणी वर्षभर असते. हि गुहा व टाके महादेवगडाच्या डोंगरातच खोदलेले आहे. डोंगरसोंडेच्या पुढील भागात असलेली बुजलेली दोन टाकी व एका वास्तुचे अवशेष वगळता किल्लेपणाची खुण दर्शविणारा एकही अवशेष दिसुन येत नाही. पुढे गडाच्या टोकापर्यंत चालत जाता येते. गडाच्या डोंगरसोंडेवरूनच महादेवगडाचा पसारा नजरेस पडतो. पुर्वपश्चिम पसरलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटी पासुन उंची २०८० फुट असुन दरवाजा व तटबंदी पुर्णपणे नष्ट झाल्याने नेमका परीसर सांगता येत नाही. गडावरून दुरवर पश्चिमेला असलेली मनोहर-मनसंतोष ही दुर्गजोडी व खाली लांबवर पसरलेला कोकण परीसर तसेच पारपोली घाटाची वाट आपले लक्ष वेधून घेते. चिंतामणी गोगटे यांच्या इ.स.१९०७ साली प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकातील वर्णनानुसार इ.स.१८३० साली या किल्ल्याला पुर्वेच्या बाजुस दोन दरवाजे व त्यांच्या रक्षणासाठी तीन बुरुज होते. २० एकरात पसरलेल्या या किल्ल्याचा तट फारसा बळकट नव्हता. किल्ल्यावर जाण्याचा मार्ग अवघड व अरुंद होता. पण आज यापैकी अरुंद रस्ता वगळता इतर काहीही अस्तित्वात नाही. संपुर्ण किल्ला पहाण्यास २ तास पुरेसे होतात. आंबोलीतून एका दिवसात महादेवगड व नारायणगड हे २ किल्ले सहज पहाता येतात. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटमार्ग असले तरी त्यातील आंबाघाट, बावडाघाट, फोंडाघाट व पारपोली घाट हे चार महत्वाचे घाटमार्ग होते. यातील पारपोली घाटांचे वैशिष्ट म्हणजे याच्या माथ्यावर महादेवगड व नारायणगड हे किल्ले आहेत तर पायथ्याशी मनोहर-मनसंतोषगड हि दुर्गजोडी आहे. कोकणातील बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. यातील सावंतवाडी संस्थानाच्या हद्दीत असलेल्या पारपोली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी सावंतवाडी संस्थानाचे अनासाहेव फोंडसावंत यांनी १७०९ ते १७३८ दरम्यान महादेवगड हा किल्ला बांधला. इ.स. १७७२-७३ दरम्यान सावंतांचे कारभारी जिवाजी विश्राम यांनी महादेवगड व नारायणगड जिंकुन रांगणा देखील घेतला तेव्हा करवीर राणी जिजाबाई यांनी स्वतः स्वारी करत महादेवगड जिंकला पण काही काळातच सावंताना परत केला. इ.स. १८०५ मध्ये करवीरकर छत्रपतीनी महादेवगड जिंकला पण लवकरच सावंतांना परत केला. इ.स. १८१० मध्ये फोंडसावंत तांबुळकर यांची महादेवगडावर किल्लेदार म्हणुन नेमणुक होती पण नंतर त्यांना दुर करण्यात आले. इ.स. १८२८ मध्ये फोंडसावंत तांबुळकर यांनी सावंता विरुद्ध बंड करत गडाचा ताबा घेतला. ऑगस्ट १८२९ मध्ये इंग्रज अधिकारी कर्नल मॉर्गन यांनी महादेवगड जिंकला व बंडखोरांनी त्याचा पुन्हा आश्रय घेऊ नये म्हणुन मोठया प्रमाणात उध्वस्त केला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!