मल्हारगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पुणे

उंची : ३१३० फुट

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्रातील बऱ्याच किल्ल्यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. काही किल्ले पुराणपुरुष म्हणुन प्रसिद्ध आहेत तर काही किल्ले त्याच्या बांधकामासाठी प्रसिध्द आहेत. काही किल्ले शिवस्पर्शाने पावन झाले म्हणुन प्रसिध्द आहेत तर काही किल्ले त्यावर घडलेल्या इतिहासाने प्रसिध्द आहेत. पण मल्हारगड मात्र वेगळ्याच कारणासाठी प्रसिध्द आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांत सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणून मल्हारगड प्रसिद्ध आहे. सातवाहन काळापासून गुंफलेल्या किल्ल्यांच्या माळेत स्वराज्यातील मल्हारगड हे शेवटचे पुष्प गुंफले व गिरिदुर्ग बांधणीची परंपरा खंडित झाली. मी गिरीदुर्ग हा शब्द मुद्दामच वापरला आहे कारण महाराष्ट्रातील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला यास म्हणता येणार नाही. कारण या किल्ल्याची बांधणी इ.स.१७५७ ते १७६० या काळात झाली असुन याच्या नंतरच्या काळात इ.स.१७६९ मध्ये इंग्रजांनी मुंबई किल्ल्याला लागुनच सेंट जॉर्ज किल्ला बांधला. महाराष्ट्रात बांधलेला मात्र हा शेवटचा गिरीदुर्ग म्हणता येईल. ... पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला सासवडहुन पुण्यात उतरणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगड किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे तोफखाना प्रमुख कृष्णराव महादेव पानसे व भिवराव यशवंत पानसे यांनी केली. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे जरी हा गड सोनोरी म्हणुन ओळखला जात असला तरी पेशवेदफ्तरात याचा उल्लेख मल्हारगड म्हणूनच येतो. पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात असलेले सोनोरी हे गड पायथ्याचे गाव पुण्याहुन ३० कि.मी.वर तर सासवडहुन हे अंतर ६ कि.मी.असुन या मार्गाने गाडी थेट गडाच्या पायथ्याशी जाते. सोनोरी गावात शिरल्यावर दुरूनच या गडाची बुरुज तटबंदी व आतील मंदिराचे कळस दिसायला सुरवात होते. गावातुन गडाकडे जाताना उजवीकडे सरदार पानसे यांच्या गढीचे भव्य प्रवेशद्वार दिसुन येते. यापुढील वाटेवर डावीकडे झाडीत एक भलीमोठी बारव असुन पुढे गडपायथ्याला वाटेच्या डाव्या बाजुला अजुन एक बारव दिसते. समुद्रसपाटीपासून गडमाथा जरी ३१४० फुट उंचावर असला तरी पायथ्यापासुन हि उंची साधारण ४९२ फुट असल्याने अर्ध्यापाउण तासात गडावर पोहोचता येते. त्रिकोणी आकाराच्या या गडाचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग असुन संपुर्ण गडाचा परीसर ५ एकर तर चौकोनी आकाराच्या बालेकिल्ल्याचा परिसर २ एकर आहे. गडाच्या तीन सोंडा सोनोरी काळेवाडी व झेंडेवाडी या गावाच्या दिशेने उतरलेल्या असुन या प्रत्येक सोंडेवर एक दरवाजा आहे. यातील पुर्व दिशेला सोनोरी गावाच्या दिशेने उतरलेल्या सोंडेवर गडाचा उत्तराभिमुख महादरवाजा आहे. गडाच्या बाहेरील तटबंदीत एकुण ९ बुरुज असुन आतील बालेकिल्ल्याच्या तटबंदीत ५ बुरुज आहेत. किल्ल्याची तटबंदी काही ठिकाणी ढासळली असली तरी मोठया प्रमाणात शिल्लक आहे. सोनोरी गावातुन किल्ल्यात प्रवेश करण्यापुर्वी बुरुजाच्या अलीकडे असलेल्या खडकात एक लहानसे नेढे दिसुन येते. गडाचा महादरवाजा पुर्व टोकाला असलेल्या बुरुजात बांधलेला असुन या दरवाजाशेजारी दुसऱ्या बुरुजाची रचना आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर समोरच पहारेकऱ्यांच्या देवड्या व दोन तटबंदीमधुन गडात शिरणाऱ्या पायऱ्या दिसुन येतात. या पायऱ्या चढुन वर आल्यावर समोरच एक मध्यम आकाराचा चौथरा व त्यासमोर बालेकिल्ल्याची तटबंदी दिसुन येते. या तटबंदीच्या उजव्या बाजूस बालेकिल्ल्याचा दरवाजा असुन तिथे न जाता सर्वप्रथम डाव्या बाजुने किल्ल्याची माची फिरण्यास सुरवात करावी. चौथऱ्याच्या पुढे काही अंतरावर एक कोरडी पडलेली विहीर आहे. विहिरीकडून तटाच्या बाजूने पुढे आल्यावर समोरच पायऱ्या असलेले बांधीव तळे लागते. बालेकिल्ल्याच्या दक्षिण तटाला लागून असलेल्या या तलावाकडे येण्यास बालेकिल्ल्याच्या तटात एक लहान मार्ग ठेवलेला आहे. तलावातील पाणी शेवाळलेले असुन पिण्यायोग्य नाही. तलावाच्या पुढील भागात बुरुजाकडे जाणाऱ्या वाटेवर दुसरी विहीर आहे. या विहिरीत काही प्रमाणात पाणी असुन ते पिण्यायोग्य वाटते पण ते काढण्यासाठी दोरीची गरज भासते. विहिरीच्या पुढील बाजूस किल्ल्याचा काळेवाडीच्या दिशेने असलेल्या सोंडेवरील बुरुज असुन या बुरुजातुन खाली उतरण्यास लहान दरवाजा आहे. काळेवाडी अथवा झेंडेवाडी गावातून आल्यास आपण या चोर दरवाजाने गडावर प्रवेश करतो. येथुन बालेकिल्ल्याची तटबंदी उजव्या हाताला ठेवत पुढे जाताना वाटेत आपल्याला काही वास्तुंचे अवशेष दिसुन येतात. अवशेष पाहुन आपण गडाच्या उत्तर दिशेला झेंडेवाडीच्या दिशेने असलेल्या सोंडेवरील बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाच्या खालील बाजूस तटात गडाचा तिसरा दरवाजा आहे. झेंडेवाडीतुन येणारी एक वाट या दरवाजातून गडावर येते. येथुन बालेकिल्ल्याच्या तटबंदीखालुन मुख्य दरवाजाच्या दिशेने जाताना उजवीकडे बालेकिल्ल्याचा दरवाजा दिसतो. या दरवाजातून आत आल्यावर संपुर्ण बालेकिल्ल्याचा परीसर दिसतो. बालेकिल्ल्यात एक लहान व एक मोठे अशी दोन मंदिरे असुन मोठे मंदिर महादेवाचे तर लहान मंदीर ज्यावरून गडाला मल्हारगड असे नाव पडले त्या मल्हारीचे म्हणजे खंडोबाचे आहे. शिवमंदिराला दगडी प्राकार असुन या प्राकारात एक समाधी चौथरा दिसुन येतो. खंडोबाच्या मंदिरात मल्हारीची म्हाळसासोबत अश्वारूढ मुर्ती असुन या मुर्ती शेजारी काही लहान मुर्ती ठेवलेल्या आहेत. याशिवाय बालेकिल्ल्यात मोठया प्रमाणात घराचे व वाड्यांच्या जोत्याचे अवशेष दिसुन येतात. बालेकिल्ल्यातुन बाहेर पडण्यासाठी उत्तर दिशेच्या तटबंदीत एक लहान दरवाजा असुन एके ठिकाणी खोदीव टाके दिसुन येते. मल्हारगडावरून दिवेघाट, पुरंदर, सासवड, जेजुरीपर्यंतचा प्रदेश नजरेस पडतो. गड छोटासा असला तरी संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो. मल्हारगडाचे बांधकाम कृष्णराव महादेव पानसे व भिवराव यशवंत पानसे यांनी सन १७५७ ते १७६० या कालावधीत पूर्ण केले. इ.स.१७७१-७२ दरम्यान थोरले माधवराव पेशवे या किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख पेशवे दफ्तरात आढळतात. तसेच किल्ल्याच्या खर्चासाठी पेशव्यांनी पानसेंना ३००० रुपयाचे वर्षासन मंजूर केल्याचे कागदोपत्री दिसुन येते. इंग्रजां विरुध्दच्या उठावात उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!