मलंगगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : ठाणे

उंची : २५५३ फुट

श्रेणी : अत्यंत कठीण

मुंबई शहराच्या अगदी जवळ असुनही दुर्गप्रेमींकडून दुर्लक्षित झालेला प्राचीन दुर्ग म्हणजे कल्याणचा श्री मलंगगड. या किल्ल्याच्या उल्लेखाशिवाय ठाणे जिल्ह्याचा इतिहास पुर्णच होऊ शकत नाही. दुर्गप्रेमींकडून हा किल्ला दुर्लक्षिला जाण्याचे मुख्य कारण म्हणजे हे ठिकाण गडायेवजी धार्मिक स्थळ म्हणुन जास्त प्रसिध्द आहे. शिवाय या स्थळासाठी होणारी भाविकांची गर्दी व त्यामुळे येथे असणारा कमालीचा गलिच्छपणा. या किल्ल्याला प्राचीन इतिहास असुन आजही आपल्या अंगाखांद्यावर तो ते अवशेष बाळगुन असल्याने या दुर्गाला भेट देणे दुर्गप्रेमींसाठी अगत्याचे ठरते. शिवाय गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या चढाईच्या साहसामुळे हि भटकंती थरारक होते. या चढाईसाठी आम्हाला सहाय्य लाभले ते सुदेश नांगरे व सिद्धेश गोताड यांच्या वाईल्ड ट्रूप या गिर्यारोहण संस्थेचे. त्यांच्या या सहकार्याबद्दल मी त्यांचा व्यक्तिश: आभारी आहे. मलंगगडचा विस्तार पीरमाची, सोनेमाची व बालेकिल्ला अशा तीन भागात विभागलेला असुन गडाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी गिर्यारोहण साधनांची गरज भासते. ... आज मलंगगडावर अनेक हिंदु- मुस्लिम भाविकांचा वावर असला तरी त्यापैकी फार थोडेजण किल्ल्याच्या दुसऱ्या सोनमाचीपर्यंत जातात. तर गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या साहसामुळे (प्रस्तरारोहणामुळे) केवळ गिर्यारोहकच गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जातात. चला तर मग मलंगगडचा थरार अनुभवण्यासाठी. मलंगगड कल्याण शहराच्या दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावर असुन गडावर जाण्यासाठी एकुण तीन वाटा आहेत. यातील एक वाट ठाणे जिल्ह्यातील गडाच्या पायथ्याशी असलेल्या मलंगवाडीतून तर उर्वरित दोन वाटा रायगड जिल्ह्यातील वावंजे व शिरवली (कोंडपवाडी) गावातून गडाच्या पिरमाचीवर येतात. यातील पहिल्या दोन वाटा प्रामुख्याने वापरात असुन त्यावर पायऱ्या बांधलेल्या आहेत तर तिसऱ्या पायवाटेचा फारसा वापर केला जात नाही. कल्याण येथुन गडपायथ्याच्या मलंगवाडला जाण्यासाठी खाजगी रिक्षा तसेच दर तासाला बस असुन तासाभरात आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. पनवेलहुन वावंजे गावांसाठी बस असुन वावंजे गावापासुन २ की.मी. अंतरावर गडाचा पायथा आहे. वावंजे गावातुन गडपायथ्याशी येण्यासाठी खाजगी रिक्षा मिळतात. गडावर येणारी गर्दी टाळायची असल्यास वावंजे गावातुन गडावर जाणे हा उत्तम पर्याय आहे. या दोन्ही वाटा साधारण तासाभरात आपल्याला पिरमाचीच्या सुरवातीस असलेल्या दुर्गादेवी मंदीराजवळ घेऊन येतात. आपल्या गडफेरीस येथुनच सुरवात होते. दुर्गादेवी मंदिर हे गडावरील मुळ मंदीर आहे. मंदिराच्या वाटेवर एक समाधी असुन आवारात कातळात कोरलेले एक शिवलिंग,नंदी,नागशिल्प तसेच पादुका पहायला मिळतात. या मंदीरात दुर्गादेवी तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मुर्ती आहेत. देवीचे दर्शन करून पुढे आल्यावर वाटेच्या डाव्या बाजुस पुरातन वाघेश्वरी मंदिर असा फलक लावलेला आहे. येथे साधारण १०० फुटावर वाघेश्वरी देवीचे छप्पर उडालेले मंदिर असुन त्यात गणपती व वाघेश्वरी देवीची मुर्ती स्थापन केलेली आहे. हे मंदीर पाहुन पुढे आल्यावर वाटेच्या उजवीकडे गणेशमंदिर व मारुती मंदीराकडे असा फलक लावलेला आहे. वाटेवर दुकानांची व घरांची इतकी गर्दी झाली आहे कि फलकाशिवाय माचीवरील एकही मंदीर सापडणे कठीण आहे. दोन दुकानामधील या बोळीतून थोडे पुढे आल्यावर आपण मंदिराजवळ पोहोचतो. मंदिराच्या आत मुर्तीऐवजी तांदळा स्थापन केलेला असुन त्यावर गणपती व मारुतीचे चांदीचे मुखवटे मांडलेले आहे. मंदिर पाहुन मागे फिरल्यावर मुख्य वाटेने आपण गडावरील श्रीमलंग (मच्छिंद्रनाथ) यांच्या घडीव दगडात बांधलेल्या समाधी मंदीराजवळ पोहोचतो. या समाधी मंदिराच्या थोडे अलिकडे वाटेच्या उजव्या बाजूच्या दोन दुकानांमधील बोळीतून एक पायवाट डोंगराच्या दिशेने जाते. पण तेथे न जाता माचीवरील अवशेष सर्वप्रथम पाहुन घ्यावेत. समाधी मंदीराच्या दरवाजाबाहेर दोन बाजुस गाडलेल्या दोन तोफा असुन त्यांची केवळ तोंडे बाहेर राहिलेली आहेत. समाधी मंदिराच्या आत एक लहान व एक मोठी अशा दोन समाधी असुन मंदिराच्या बाहेरील भिंतीवर मोर व मासे यांची शिल्प कोरलेली आहेत. समाधी मंदिराच्या डावीकडे खाली उतरत जाणारी पायवाट असुन हि वाट आपल्याला घोडेटाप या ठिकाणाकडे नेते. हे भोळ्या भक्तांसाठी निर्माण केलेले ठिकाण असुन याच्या थोडे अलीकडे डोंगर उतरावर कातळात कोरलेले २० x २० फुट आकाराचे मोठे टाके आहे. या टाक्यातील पाणी माचीवर वापरले जात असल्याने त्यात कचरा पडु नये यासाठी त्यावर लोखंडी जाळी अंथरली आहे. येथे दरीच्या काठाने थोडे पुढे आल्यावर अजुन एक कातळात कोरलेली गोलाकार विहीर पहायला मिळते. विहीर पाहुन झाल्यावर सरळ पुढे गेल्यावर नव्याने बांधलेला सिमेंटचा बंधारा नजरेस पडतो. हा बंधारा पार करून माचीच्या टोकाकडे निघाल्यावर वाटेवर अलीकडील काळात विटांनी बंदिस्त केलेले मोठे आवार दिसुन येते. बंदिस्त केलेले हे आवार म्हणजे कातळात कोरलेला ६०x ६० फुट आकाराचा प्रचंड मोठा हौद आहे. गडावर हा हौद बडा कुवा म्हणुन ओळखला जात असल्याने याच नावाने चौकशी करावी. आपण आधी पाहिलेली दोन टाकी छोटा कुवा म्हणुन ओळखली जातात. माचीच्या पुढील भागात कोणतेच अवशेष नसल्याने येथुन मागे फिरून पुन्हा समाधी मंदीराजवळ यावे. गडावरील माचीचा पसारा मोठा असल्याने गडाची बहुतांशी वस्ती व अवशेष या माचीवरच असावेत. पण गडावर वाढलेली अवाढव्य वस्ती व अनाधिकृत बांधकाम यांनी हे सर्व अवशेष गिळंकृत केले आहेत. पिरमाचीचे दुसरे टोक म्हणजे देवणी सुळक्याचा पलीकडील भाग. या भागात असलेले अवशेष म्हणजे आयताकृती आकाराची पाण्याची तीन टाकी,एक दत्तमंदिर व एक शिवलिंग. गड उतरताना दुर्गा मंदीराच्या उलट दिशेला म्हणजे देवणी सुळक्याच्या दिशेने गेल्यास माचीवरील हे उर्वरीत अवशेष पाहुन तासाभरात दुर्गामंदीरा जवळ परतता येते. समाधी मंदिराजवळ आल्यावर आपण येताना पाहीलेल्या दुकानाच्या बोळीतुन डोंगराकडे जाणाऱ्या पायवाटेने आपल्या पुढील थरारक दुर्गदर्शनास सुरवात करावी. या वाटेने अर्ध्या तासाचा उभा चढ चढुन आपण वरील डोंगरमाथ्याच्या तळात पोहोचतो. येथुन वाट उजवीकडे वळते. या वाटेने थोडे पुढे आल्यावर वाटेला दोन फाटे फुटतात. यातील एक वाट लहानशा घळीतून वर जाताना दिसते तर दुसरी वाट कड्याला बिलगुन पुढे सरकते. घळीतुन वर जाणारी वाट हि गडावर जाणारी वाट असली तरी सरळ जाणाऱ्या वाटेने आपण आधी तेथील अवशेष पाहुन घ्यावेत. सरळ जाणाऱ्या वाटेने साधारण पाच मिनिटे चालल्यावर आपण कड्यात कोरलेल्या एका मोठ्या गुहेपाशी येऊन पोहोचतो. या गुहेत पाण्याची दोन टाकी असुन त्यातील एका टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. सध्या या गुहेत कुण्या बाबाची कबर प्रस्थापित झालेली असुन एक फकीर तेथे मुक्कामास असतो. गुहा पाहुन मागे फिरावे व घळीतुन वर जाणाऱ्या वाटेने आपल्या पुढील गडचढाईस सुरवात करावी. या घळीच्या वरील टोकास दरवाजा शेजारील दोन बुरुज व त्याखाली कातळात कोरलेल्या पायऱ्या नजरेस पडतात. या बुरुजामध्ये असलेली दरवाजाची कमान मात्र पुर्णपणे नष्ट झालेली आहे. या पायऱ्यांची उंची कमीजास्त असुन काही ठिकाणी केवळ आडवे पाउल ठेवता येईल इतपतच त्या रुंद आहेत. या पायऱ्यांनी दहा मिनिटात आपला गडाच्या दुसऱ्या टप्प्यावर म्हणजे सोनमाचीवर प्रवेश होतो. माचीवर प्रवेश केल्यावर समोरच एक भुमिगत बांधकाम दिसुन येते. हे बांधकाम म्हणजे गडाच्या तटबंदीत बांधलेला चोरदरवाजा असुन यात वीस फुट खाली उतरल्यावर बाहेर पडण्याचा दरवाजा दिसुन येतो. या दरवाजाच्या वरील भाग कातळात कोरलेला असुन खालील भागात बांधीव पायऱ्या आहेत. या दरवाजातुन उतरणारी वाट पायथ्याच्या वावंजे गावात जाते पण वापरात नसल्याने सध्या हि वाट पुर्णपणे मोडलेली आहे. दरवाजा पाहुन वर आल्यावर आपल्याला उजवीकडे बालेकिल्ल्याचे कातळसुळके दिसतात तर डावीकडे गडाची माची माची नजरेस पडते. हि माची साधारण ६०० फुट लांब व २०० फुट रुंद आहे. माचीचा विस्तार फारसा फारसा नसल्याने सर्वप्रथम हि माची पाहुन घ्यावी. माचीच्या दिशेने सुरवात केल्यावर सर्वप्रथम एक भुमिगत कोठार दिसुन येते. या कोठारात मोठ्या प्रमाणात माती जमा झालेली असुन आता ते जवळपास बुजण्याच्याच मार्गावर आहे. माचीच्या पुढील भागात घडीव दगडात बांधलेला एक चौथरा असुन त्यापुढील भागात कातळात कोरलेली दोन टाकी आहेत. यातील एका टाक्यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. माचीला बऱ्यापैकी तटबंदी असुन त्यामध्ये बुरुज आहेत. या तटबंदीची काही प्रमाणात पडझड झालेली असली तरी त्यात एका ठिकाणी फांजीवर ये-जा करण्यासाठी असलेल्या पायऱ्या दिसुन येतात. याशिवाय उजवीकडील तटबंदीत एक शौचकुप पहायला मिळते. माचीच्या टोकाशी असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ असुन तेथे ध्वज रोवण्यासाठी कातळात मोठा खळगा कोरलेला आहे. माचीचा हा भाग पाहून झाल्यावर आपली पुढील गडफेरी बालेकिल्ल्याकडे म्हणजे कातळ सुळक्याच्या दिशेने सुरु करावी. कातळ सुळक्याच्या उजव्या बाजुस सुरवातीला एक फुटके टाके असुन त्यापुढे काही अंतरावर दुसरे मोठे टाके आहे. यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. हे टाके पाहुन मागे फिरल्यावर सुळक्याच्या डाव्या बाजुने आपली वाटचाल सुरु करावी. वाटेच्या सुरवातीस काहीशा उंचीवर या सुळक्याच्या पोटात तीन टाकी कोरलेली आहेत. यातील दोन टाकी चौकोनी व मध्यम आकाराची असुन तिसरे टाके गोलाकार व लहान आहे. टाकी पाहुन पुढे आल्यावर उजवीकडील कातळ भिंतीत बालेकिल्ल्यात जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात पण तेथे न जाता सरळ पुढे निघावे. येथे पुढे आलेल्या कातळटप्प्याला वळसा मारल्यावर उभ्या कातळात कोरलेली पाण्याची अजुन तीन टाकी नजरेस पडतात. यातील दोन टाक्यात पिण्यायोग्य पाणी असुन तिसऱ्या टाक्याकडे जाणारी वाट धोकादायक आहे. यातील सुरवातीच्या मोठ्या टाक्याला कुराण टाके नाव दिले गेले आहे. तसे ते रंगाने या टाक्यात लिहिलेले आहे. या टाक्यात मे- जून पर्यंत पाणी असते. येथुन पिण्याचे पाणी घेऊन मागे फिरावे व बालेकिल्ल्याच्या दिशेने असलेल्या पायऱ्या चढण्यास सुरवात करावी. साधारण ४०-५० पायऱ्या चढून गेल्यावर नंतरच्या वीस फुट अंतरातील पायऱ्या कडा कोसळल्याने पुर्णपणे नष्ट झालेल्या आहेत. या पायऱ्यापर्यंत येण्यासाठी गिर्यारोहण साहित्याची गरज लागत नाही. पण यापुढील टप्पा सर करण्यासाठी मात्र गिर्यारोहणाचे साहित्य बरोबर असणे व तंत्र माहित असणे आवश्यक आहे. वीस फुटाचा हा भाग पार करण्यासाठी दोन लोखंडी पाईप जोडून आडवे टाकलेले आहेत. या ठिकाणी पाईप व कातळकडा यात अंतर जास्त असल्यामुळे हाताच्या आधारासाठी दोर लावावा लागतो. हा अवघड टप्पा पार करण्यासाठी मनाची तयारी तसेच गिर्यारोहणातील अनुभव व साहित्य असणे महत्वाचे आहे. या ठिकाणी एक माणूस बसलेला असतो व तो हा टप्पा पार करून देण्यासाठी दोर लाऊन माणशी पैसे आकारतो असे वाचनात आले होते पण आम्ही गेलो तेव्हा हा माणुस आम्हाला तेथे दिसला नाही. हा अवघड टप्पा पार केल्यावर कातळात कोरलेली एक छोटी गुहा लागते. हि बहुदा पहारेकरयाची देवडी असावी. या गुहेत कातळावर कोरलेली दोन शिल्पे असुन यातील एक शिल्प वाघावर स्वार झालेल्या देवीचे आहे तर दुसरे शिल्प मोठ्या प्रमाणात झीज झाल्याने मारुतीचे कि गणपतीचे हे ओळखता येत नाही. येथून कमी अधिक उंचीच्या झीज झालेल्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण दोन सुळक्यांमधील खिंडीत येतो. या खिंडीतून समोरच्या सुळक्यावर चढण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या असुन त्यात काही ठिकाणी आधारासाठी खोबणी कोरलेल्या आहेत. काही ठिकाणी पायऱ्यांच्या दोन्ही बाजुस कोणत्याही प्रकारचा आधार नसल्याने आधारासाठी गज रोवलेले आहेत तर दोन तीन ठिकाणी लोखंडी साखळी बसवलेली आहे. सध्या या लोखंडाची गंजून झीज झालेली असल्याने त्यावर अवलंबुन न रहाता शक्यतो दोर लावुनच त्याच्या आधाराने गडमाथा गाठावा. दोर लाऊन दहा ते पंधरा मिनिटांत आपण गड माथ्यावर पोहोचतो. बालेकिल्ला दोन सुळक्यांच्या माथ्याचा बनलेला असुन यातील पहिल्या सुळक्यावर कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत. दुसऱ्या सुळक्याच्या सुरवातीला एका चौथऱ्यावर उभारलेला मोठा दुमजली वाडा दिसतो. वाड्याच्या पुर्वादिशेच्या भिंतीत वाड्याचा दरवाजा असुन वरील मजल्याला दोन बाजुस दोन मोठ्या खिडक्या आहेत. वाड्याच्या मागील बाजुस एकामागे एक अशी कातळात कोरलेली पाण्याची एकुण सात मोठी टाकी असुन या सर्व टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यांमध्ये मे- जून पर्यंत पाणी असते. पहिल्या टाक्याशेजारी पाणी ठेवण्यासाठी कातळात कोरलेली ढोणी असुन त्या शेजारी ध्वजस्तंभाचा चौथरा आहे. माथ्याला काही ठिकाणी तटबंदी असुन पाण्याच्या टाक्यांना फेरी मारत आपण माथ्याचा दुसऱ्या टोकाला पोहोचतो. बालेकिल्ल्याच्या या टोकासमोर देवणीचा सुळका आहे. येथुन खाली पाहिले असता सुळक्याखालील पठारावर कातळात कोरलेली पाण्याची तीन टाकी दिसुन येतात. माथ्यावर इतरत्र मोठ्या प्रमाणात झुडुपे वाढलेली असल्याने इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत. गडाचे हे सर्वात उंच ठिकाण असुन या ठिकाणी गडाची समुद्रसपाटीपासुन उंची २५५३ फुट आहे. येथुन गोरखगड, चंदेरी, पेब, ईरशाळ, प्रबळगड हे किल्ले ताहूली, म्हैसमाळ, माथेरान हे डोंगर तसेच पनवेल-बेलापूर पर्यंतचा परिसर नजरेस पडतो. मलंगगडचे कातळकोरीव रूप पहाता हा किल्ला शिलाहार काळात बांधला गेला असावा असे वाटते. सहाव्या शतकात नलदेव मौर्य नावाचा राजा या ठिकाणी राज्य करत होता. शिवकाळात इ.स. १६५७ साली शिवरायांनी कल्याण भिवंडी प्रांत काबीज केला त्याच दरम्यान मलंगगड स्वराज्यात सामील झाला असावा. २७ मार्च १६८९ या दिवशी मुघल सरदार मातब्बर खान याने कल्याण जिंकल्यानंतर मलंगगड ताब्यात घेतला. इ.स.१७३० साली बाजीराव पेशवे यांनी भिवंडीचा कांबे कोट जिंकल्यावर साष्टीची मोहीम ठरवण्यात आली. यावेळी रायाजी राउत व नानाजी देशमुख यांनी मलंगगडच्या पायथ्याशी सैन्याची जमवाजमव केल्याचे उल्लेख येतात. वसई मोहीमे दरम्यान २६ मार्च १७३८ रोजी रामचंद्र हरी पटवर्धन,रामजी महादेव बिवलकर व खंडोजी मानकर सैन्यासह गडावर होते. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात या किल्ल्यावर मराठे व इंग्रज यांच्यात चांगलीच लढाई जुंपली होती. पावसाळ्यात गडावर मराठ्यांचे सैन्य कमी असते हे लक्षात घेऊन कॅप्टन ॲबिंग्डन याने इ.स. १७८० मध्ये भर पावसात मलंगगडाला वेढा घातला. सर्वप्रथम त्याने गडावर जाणाऱ्या सर्व वाटा बंद करून टाकल्या. यावेळी पीरमाचीवर पांडुरंग केतकर यांना ३०० माणसांनिशी नेमलेले हाते. पीरमाचीवर अचानक झालेल्या हल्ल्याने शे-सव्वाशे लोक सोनेमाचीकडे धावले तर उर्वरीत कल्याणच्या दिशेने गेले. ॲबिंग्डनने पीर माचीवर तीन तोफा चढवून त्यांचा सोने माचीवर मारा चालू केला पण तोफगोळे तेथवर पोहचत नव्हते. किल्लेदाराने आनंदराव धुळप व काशीपंत यांच्याकडे मदत मागितली पण त्यांनी पाठवलेले ७०० शिपाई गडापर्यंत पोहचू शकले नाहीत. कॅप्टन ॲबिंग्डनने शिड्या लावून २५० माणसे सोने माचीवर चढवली पण मराठ्यांनी गडावरून दगडधोंड्यांचा वर्षाव करून त्यांना परत पाठवले. नाना फडणीसांनी बाळाजी विश्वनाथ पाठक व राधो विश्वनाथ गोडबोले यांना तीन हजार सैन्य देऊन वेढा उठवण्यास पाठवले. त्यांच्या फौजा शिरवळ या मलंगगडच्या उत्तरेला असलेल्या गावी पोहचल्या पण त्यांचे इंग्रजांना हुसकावण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. १६ सप्टेंबरला मराठ्यांची एक पलटण पीर माचीवर चाल करून गेली. त्यांनी तोफांवर हल्ले केल्यामुळे ब्रिटिशांनी घाईघाईने तोफा काढून घेतल्या. मेजर वेस्टफॉलने ॲबिंग्डनच्या मदतीसाठी जादा कुमक धाडली. या सेनेने रसद घेऊन येणाऱ्या मराठ्यांची तुकडीला उद्ध्वस्त केले. त्यामुळे मलंगगडावर अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. मराठ्यांनी इंग्रजांचे दळणवळण तोडल्याने कर्नल हार्टलेने बेलापूर, पनवेल, तळोजे मार्ग सुरक्षित केला तसेच शिरवळच्या मराठ्यांच्या तळावर हल्ला करून तळ उध्वस्त केला. आता ब्रिटिशांनी कॅप्टन कारपेंटरच्या हुकमतीत मलंगगडावर दुसरा हल्ला चढवला. तोफांचा भडिमार सुरू केला पण केतकरांनी किल्ला शौर्याने लढवला. इंग्रजांचे बरेच सैनिक ठार झाल्याने इंग्रजांनी हल्ले थांबवले पण वेढा मात्र उठवला नाही. मराठ्यांची नाकेबंदी करून त्यांची उपासमार करून त्यांना शरण यायला लावावे असे इंग्रजांनी ठरवले. ऑक्टोबरनंतर किल्ल्यावर उपासमार होऊ लागली. नाना फडणविसाने काही सरदारांना हाताशी घेऊन मोठी फौज जमा केली आणि मलंगगड व वसईवर धाडली. स्वतः नाना व हरिपंत फडके दहा हजार फौजेसह खंडाळ्याला आले व त्यांनी राजमाची घाट उतरून कल्याणकडे जायचे ठरवले. त्यामुळे हार्टलेला प्रतिशह दिला जाणार होता. हार्टलेने मलंगगडावरून सैन्य काढून घेतले व लगेचच मराठ्यानी मलंगगडाकडे जादा कुमक व रसद धाडली. अशाप्रकारे मराठ्यांनी मलंगगड अखेरपर्यंत शर्थीने लढवला पण लवकरच कल्याण व मलंगगड इंग्रजांच्या ताब्यात गेले. मराठ्यांचे वारंवार होत असलेले हल्ले पाहुन अखेरीस इ.स.१७८२ च्या मराठे-इंग्रज तहात इंग्रजांनी तो पुन्हा मराठ्यांच्या स्वाधीन केला. यावेळी हा गड गडावरील सत्पुरूषाच्या आशीर्वादानेच आपल्याला मिळाला या श्रद्धेतून पेशव्यांनी कल्याणच्या काशिनाथपंत केतकर या ब्राम्हणाची गडावरील समाधीच्या पुजेसाठी नेमणुक केली. आज त्यांचे वंशजच या समाधीचे पुजारी आहेत. सध्या मलंगगड हे स्थान हिंदूचे कि मुसलमानांचे यावर ठाणे स्थानिक न्यायालय, उच्च न्यायालयात आणि ठाणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दावे प्रलंबित आहेत. मलंगगडावरील समाधी हि नाथपंथीय श्री मछिद्रनाथ यांची असल्याचे मानले जाते. या समाधीची यात्रा माघ पौर्णिमेला असते. या यात्रेत नाथांची पालखी निघते. दर पौर्णिमेला या समाधीची आरती होते व समाधीवर भगवे वस्त्र अर्पण केले जाते. टीप- पावसाळ्याचे ४ महिने गडावर जाऊ नये शिवाय पाईपजवळ असलेले बोल्ट जुने झाले असल्याने खाली सोनेमाचीवर उतरण्यासाठी रॅपलिंग करणे टाळावे. माचीवरील अवशेष निवांतपणे पहायचे असल्यास गर्दीचा दिवस टाळूनच गडावर जावे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!