मनसर
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नागपुर
उंची : १२०० फुट
श्रेणी : सोपी
महाराष्ट्रात टेकडीवर अथवा डोंगरात मंदिर बांधण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आली आहे. मनसर येथे हिडींबा टेकडीवर झालेल्या उत्खननात असेच एक टेकडीवरील शिवमंदिर उजेडात आले आहे. नागपूरहून रामटेकला जाताना नागपूर-जबलपूर महामार्गावर ४५ कि.मी.अंतरावर मनसर येथुन रामटेकला जाणारा फाटा आहे. येथुन रामटेक ७ कि.मी. अंतरावर आहे. मनसर गावाच्या पुर्वेला साधारण १ कि.मी.वर हि हिडींबा टेकडी व नव्याने उजेडात आलेले भव्य शिवालय आहे. वाकाटक हा महाराष्ट्रातील एक प्राचीन व प्रसिद्ध राजवंश. सातवाहन काळात आताचे मनसर म्हणजे पुर्वीचे प्रवरपूर हे एक महत्त्वाचे शहर होते. इ.स. २५० मध्ये वाकाटक राजांनी त्यांचा पराभव करून विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला. या राजवंशाच्या काळातील अनेक मंदिरांचे अवशेष विदर्भातील वेगवेगळ्या भागांत उत्खननात सापडले आहेत. वाकाटकांच्या काळात दगडांबरोबर विटांनी देखील मंदिरे बांधली गेली.
...
१९९२ ते २००४ या दरम्यान मनसर येथील हिडिंबा टेकडीच्या उत्खननात चार विटांची मंदिरे उजेडात आली आहेत. मनसर येथील मंदिरांचे अर्धवट अवशेष उपलब्ध झाल्याने मंदिरांच्या इतर भागांबाबत अंदाज करता येत नाहीत पण मंदिर स्थापत्य आधारे या मंदिरांच्या रचनेची कल्पना करता येते. मनसर येथे सापडलेली मंदिरे मंदिरस्थापत्याच्या प्रगत अवस्थेतील आहेत. पुरातत्व अभ्यासकांच्या मते येथील भव्य शिवालय व मंदिर समुहातील एक शिवालय वाकाटक काळातील असून उर्वरित दोन मंदिरे वाकाटक पुर्व काळातील असावीत. या मंदिरांच्या गर्भगृहांचा तलविन्यास तारांकित असून इ.स. दुसऱ्या शतकातील ही सर्वांत प्राचीन मंदिरे आहेत. मनसर गावात पोहोचल्यावर बोधिसत्व नागार्जुन संस्थेच्या मागील बाजुने हिडींबा टेकडीवर जाण्यासाठी वाट आहे. टेकडीवर जाताना टेकडीच्या मागील बाजुस एक मोठा नैसर्गिक तलाव पहायला मिळतो. टेकडी लहान असल्याने १० मिनिटात आपण टेकडीच्या माथ्यावर पोहोचतो. टेकडीवर असलेले अवशेष हे चौकोनी आकाराच्या बौद्ध स्तुपांचे असून त्यात विटांनी चैत्यगृह बांधलेले आहे. टेकडीवर एक लहान भुयार असून हे बहुदा ध्यानमंदिर असावे. येथे पत्र्याच्या निवाऱ्यात काही मुर्ती ठेवलेल्या आहे.
शिवालय : या मंदिराचे अवशेष हिडिंबा टेकडीच्या पश्चिम बाजुस आहेत. हि वास्तु विटांनी गर्भगृह व मंडप अशी दोन भागात बांधलेली असुन वास्तुचा पाया मात्र दगडात बांधलेला आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरास पूर्वेकडे अर्धमंडपास प्रवेशाकरिता पायऱ्या असून अर्धमंडपाच्या पश्चिमेला मंडप व त्यालगत गर्भगृहाचे अवशेष आहेत. गर्भगृह व मंडपाभोवती रुंद प्रदक्षिणामार्ग आहे. मंदिराचा वरचा भाग विटांनी बांधलेला तसेच अलंकारित केलेला असावा. १९७० साली या भागात सापडलेल्या मुर्ती याच मंदिराच्या गर्भगृहातील असावी. हे मंदिर वाकाटक नृपती प्रवरसेन (पहिला) याने बांधले असावे तर त्याचा नातु प्रवरसेन (दुसरा) याने आपल्या आजोबांच्या स्मरणार्थ त्याची पुनर्रचना केलेले प्रवरेश्वर देवकुलस्थान असावे असे पुरातत्व अभ्यासकांना वाटते.
शिवमंदिर समूह : वाकाटक काळातील दुसरे विटांचे भव्य मंदिर फक्त चौथऱ्याच्या स्वरूपात हिडिंबा टेकडीच्या उत्तर-पश्चिम उतारावर आढळले. या मंदिराची रचना दोन टप्प्यात केलेली आहे. टेकडीची उंची कायम ठेवण्यासाठी जाड भिंतीच्या मदतीने टेकडीच्या माथ्यावर सपाट चौथरा करून त्यावर हे मंदिर उभारले आहे. या मंदिराच्या पहिल्या भागात मुख्य मंदिराभोवती चौथऱ्यावर लहान प्रतिमागृहे असून त्यात कोनाडे आहेत. उत्तरेकडील प्रतिमागृहांतून काही मुर्तींचे भग्नावशेष मिळाले तर पश्चिम व दक्षिणेकडील सहा प्रतिमागृहात वेगवेगळी शिवलिंगे आहेत. पुरातत्त्वज्ञ अरविंद जामखेडकर यांच्या मते वाकाटक काळातील ही मंदिरे पाशुपत संप्रदायाशी संबंधित असावी. टेकडीच्या पायथ्याशी वाकाटक राजा प्रवरसेनचा विटांनी बांधकाम केलेला प्रचंड मोठा राजवाडा आहे. या राजवाडयाला लहानमोठी अशी अनेक दालने आहेत. हा संपुर्ण राजवाडा विटांच्या तटबंदीने चहूबाजूंनी वेढलेला असुन त्याबाहेर खंदक खोदलेला होता. हिडींबा टेकडीच्या मागे असलेल्या तलावातील पाणी या खंदकात आणुन सोडलेले होते. या राजवाडयाच्या उत्खननात राजा प्रवरसेन व राणी प्रभावती गुप्त यांच्या राजमुद्रा या महत्वाच्या गोष्टी सापडल्या. हिडींबा टेकडी व मंदिरे हे सर्व अवशेष बारकाईने पाहण्यास ३ तास पुरेसे होतात.
© Suresh Nimbalkar