मदनागड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : चंद्रपूर

उंची : ९०५ फुट

श्रेणी : कठीण

गडचिरोली नाव ऐकले की आपल्या डोळ्यासमोर नक्षलवादाने ग्रासलेला एक आदिवासी व अविकसित जिल्हा असे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते येते आणि त्यामुळेच या भागात पर्यटनासाठी असंख्य गोष्टी असुन देखील पर्यटक या भागाकडे वळत नाही. इतकेच नव्हे तर इतिहास अभ्यासकांची पाउले देखील या भागात अभावानेच पडत असल्याने या भागाचा इतिहास देखील अबोल राहीला आहे. पण अलीकडील काळात या भागातील विकास जोमाने सुरु झाल्याने हे चित्र पालटत आहे हि समाधानाची गोष्ट आहे. पर्यटकांची व अभ्यासकांची पाउले येथे पडु लागल्याने अनेक गोष्टी नव्याने प्रकाशात येत आहेत. आपला विषय गडकोट असल्याने नव्याने माहित झालेल्या एखाद्या किल्ल्याविषयी माहिती आपल्याकडे येणे साहजिकच आहे. गडचिरोलीपासुन जवळ असला तरी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यात असलेला व नव्याने माहित झालेला असाच एक गड म्हणजे मदनागड. चिमुर तालुक्यातील नवताला गावाजवळ पावसाळ्यात वाहणारा झरी धबधबा आसपासच्या भागात प्रसिद्ध असला तरी या धबधब्याजवळ असलेला मदनागड किल्ला तेथील गुराखी वगळता स्थानिक लोकांना देखील फारसा परीचीत नाही. ... नवताला हे गाव चंद्रपूर शहरापासून १२० कि.मी.अंतरावर तर गडचिरोली येथुन ९८ कि.मी. अंतरावर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वप्रथम गावाबाहेरील तलावाजवळ असलेल्या शिवमंदिराकडे यावे. या मदिराजवळ एक घर असुन या घरातील एखाद्या व्यक्तीलाच वाटाड्या म्हणुन सोबत घ्यावे. मदनागड किल्ला दाट जंगलात एका टेकडीवर असल्याने तो गिरीदुर्ग तसाच वनदुर्ग देखील आहे. किल्ल्याच्या परीसरात वाघाचा वावर असल्याने पुरेशी माहीती व स्थानिक वाटाड्या सोबत असल्याशिवाय या किल्ल्याच्या वाटेला जाऊ नये. शिवमंदिराच्या समोरील बाजूस बांध घालुन अडविलेला पाण्याचा तलाव असुन य तलावाच्या भिंतीवरून आपण तलावात पाणी येते त्या ओहोळाच्या पात्रात पोहोचतो. या ओहोळाच्या पात्रातुन सरळ चालत गेल्यास आपण जेथून धबधबा कोसळतो तेथे पोहोचतो. प्रवाहाचा हा संपुर्ण मार्ग आपण टेकडी चढतच जातो. धबधबा जेथून कोसळतो तो भाग चढुन गेल्यावर डावीकडे वळावे. येथुन पुन्हा टेकडी चढुन गेल्यावर किल्ल्याची तटबंदी व त्यातील बुरुज दिसून येतात. किल्ल्याची तटबंदी व बुरुज ओबडधोबड रचीव दगडांनी बांधलेली असुन साधारण ८-१० फुट उंच आहे. ही तटबंदी चुना विरहीत असुन आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. संपुर्ण किल्ल्याचा परीघ साधारण ३ -४ एकर असावा. किल्ल्याचा दरवाजा पूर्णपणे नष्ट झाला असला तरी त्याचे ठिकाण मात्र सहजपणे ओळखता येते. किल्ल्याच्या माथ्यावर मोठ्या प्रमाणात झाडे वाढलेली असुन तटावर उभे राहिले असता दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. शिवमंदिरापासून किल्ल्यावर येण्यासाठी पाउण तास तर किल्ला पाहण्यासाठी १५ मिनिटे पुरेशी होतात. किल्ला नव्यानेच माहित झाला असला तरी गावातील वयोवृद्ध स्थानिकांनी दिलेल्या माहितनुसार हा किल्ला माना जमातीचे राजे कुरुमप्रहोद यांनी बांधला. हा भाग पूर्वी दक्षिण कोसल म्हणजे छत्तीसगड मौर्य,सातवाहन, वाकाटक,कलचुरी, राष्ट्रकुट व नंतर काकतीय अश्या सत्तांच्या अधिपत्याखाली होता. नंतर हा संपुर्ण भाग नागवंशीय माना व नंतर चांद्याच्या गोंड राज्याच्या वैरागड प्रांतामध्ये होता. गडबोरी किल्ल्यावर इ.स.१७३४ पर्यंत माना वंशाचे कोलबा वाघ यांचे अधिपत्य होते. ते चंद्रपूर म्हणजे चांदागडचे गोंडराजे रामशहा (१६७२- १७३५) यांना समकालीन होते. महाराज कोलबा वाघ यांच्या ताब्यात प्रशासकीय तसेच संरक्षणाकरीता गडबोरी, नागभिड, चिमूर, नेरी, मदनागड, नवरगांव, भटाळा, भिसी, चंदनखेडा, वरोरा हा भुप्रदेश व या परगण्यातील २०९ गांवे असल्याचा उल्लेख येतो. या उल्लेखात मदनागड किल्ल्याचे नाव येते. ( टीप- किल्ल्याच्या परीसरात वाघाचा वावर असल्याने माहीती व स्थानिक वाटाड्या सोबत घेतल्याशिवाय किल्ल्याच्या वाटेला जाण्याचे धाडस करू नये. आम्ही गेलो त्यावेळेस किल्ल्याच्या आतील भागात वाघाने मारलेले सांबर पहायला मिळाले व आम्ही तेथुन अक्षरशः पळ काढला)
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!