मदनगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नगर
उंची : ४०७० फुट
श्रेणी : अत्यंत कठीण
AMK म्हणजे अलंग-मदन-कुलंग हि सह्याद्रीतील अवघड भटकंतीपैकी एक भटकंती मानली जाते. या अवघड भटकंतीतील सर्वात लहान किल्ला म्हणजे मदनगड. किल्ला बराच प्राचीन असुन किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या इंग्रजांनी तोडल्याने दुर्गम झाला आहे. यामुळे गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोणाचे साहित्य व तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. पावसाळा व त्यानंतरचे काही महीने या किल्ल्याची भटकंती टाळावी. सध्या या भटकंतीचे बाजारीकरण झाल्याने हि भटकंती लोकांचे जीव धोक्यात घालुन १२ महीने सुरु असते. मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची कळसुबाई डोंगररांग आहे. या डोंगररांगेत इगतपुरीच्या दक्षिणेला साधारण १०-१२ कि.मी.वर मदनगड उभा आहे. मदनगडच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गाव आहे. येथुन तसेच आंबेवाडी गावातुनही मदनगडाचा पायथा गाठता येतो. हे दोन्ही मार्ग चांगलेच थकवणारे असुन अलंग आणि मदनच्या खिंडीखाली एकत्र येतात.
...
कुरंगवाडीतून येताना जंगलातील पायवाटेने प्रथम खालच्या व त्यानंतर वरच्या पठारावर पोहोचावे लागते. वरील पठारावर पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून तीन तासांची पायपीट करावी लागते. पठारावर आल्यावर समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. दमछाक करणाऱ्या या वाटेने चढाई केल्यावर आपण मदनगडला वळसा घालून अलंग व मदन यांच्या मधल्या खिंडीत येतो. खिंडीत पोहोचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवीकडचा मदन किल्ला होय. या दोन्ही वाटांनी खिंड गाठण्यास ४ तास लागतात. उजवीकडे वळल्यावर कड्याखालुन अरुंद मार्गाने पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. इ.स. १८१८ साली इंग्रजांनी वाट तोडण्यासाठी काही ठिकाणच्या पायऱ्या नष्ट केल्याने ही वाट दोन ठिकाणी धोकादायक बनली आहे. त्यामुळे हा टप्पा काळजीपुर्वक पार करावा. या चढणीतील १०-१२ फुटाचा कडा पार केल्यावर आपण ५० फुट उंचीच्या कड्याखाली येतो. येथे असलेला दरवाजा इंग्रजांनी सुरुंग लावून तोडल्याने हा कडा निर्माण झाला आहे. येथे प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. ५० फुट उंचीचा हा कातळकडा दोर लावून पार केल्यावर पुढे कड्याखालील एका अरुंद पायवाटेने पुढे गेल्यावर पुन्हा कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. हा पायरीमार्ग आपल्याला थेट गडाच्या माथ्यावर घेऊन जातो. या वाटेवर आपल्याला किल्ल्याचा कोसळलेला दुसरा दरवाजा व एक लहान गुहा लागते. वाटेच्या वरील भागात कातळात कोरलेली पाण्याची दोन टाकी असुन यातील एका टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. किल्ल्यावर असणारी हि पाण्याची एकमेव सोय असून उघडयावर असलेली हि टाकी पहाता उन्हाळ्यात या टाक्यात पाणी शिल्लक रहात नसावे. खिंडीपासून गडमाथा गाठण्यासाठी दीड तास पुरेसा होतो. गडमाथा लहानसा असुन वर फारशी सपाटी नाही. गडमाथ्याच्या उंचवट्याखाली १५-२० जण सहज राहु शकतील एवढी गुहा आहे. गडमाथ्यावरील कातळात नैसर्गिकपणे तयार झालेलं भगदाड म्हणजे नेढं आहे. माथ्याच्या सपाटीवर काही चौथरे व घरांची जोती वगळता इतर कोणतेही अवशेष दिसत नाहीत. गडाच्या सर्वोच्च भागातुन कळसूबाई रांग,अलंगगड-कुलंगगड यांचे वेगळेच रूप पहायला मिळते. येथुन पाबरगड, रतनगड, भैरवगड, हरिश्चंद्रगड, सिद्धगड सहजपणे ओळखता येतात. वातावरण स्वच्छ असेल तर बळवंतगड, त्रिंगलवाडी,कावनई, आड, पट्टा यांचेही दर्शन होते. मदनगडाचे भौगोलिक स्थान अतिशय मोक्यावर असल्यामुळे चेंढ्या- मेंढ्या घाट तसेच कसारा घाटाचा वरील परिसर यावर टेहळणी करणे सोयीचे होते. गडाचा इतिहास आज उपलब्ध नसला तरी तो अलंग-कुलंग गडाशी निगडीत असावा. इ.स.१७६० मध्ये हा प्रांत मराठ्यांच्या ताब्यात असल्याचे पहाता हा किल्लादेखील त्यांच्याच अधीन असावा. त्यानंतर इ.स.१८१८ साली इंग्रज अधिकारी कर्नल मॅकडोव्हेलच्या सैन्याने हा किल्ला जिंकला. प्राचीन काळात घाटरस्त्यांनी होणारे दळणवळण कोकणातील बंदरांतुन घाटावरील जुन्नर, पैठण,नाशिक या महत्वाच्या बाजारपेठेत होत असे. सातवाहन काळापासूनच हे राजमार्ग प्रचलित होते. नेवासे ते रतनगड या मार्गावर अकोले, संगमनेर,सिन्नर हे महत्वाचे थांबे होते. या मार्गावर असलेली शिवमंदिरे व बाजारपेठा आजही त्याची साक्ष देतात. रतनगड, अलंग, मदन आणी कुलंग गड यादवांच्या काळातच निर्माण झाले. दुर्गभटक्यांना नेहमीच आकर्षित करणारा मदनगड पहाण्यासाठी एका पुर्ण दिवसाचे नियोजन आवश्यक आहे. अलंग-कुलंगच्या कड्याखालुन जाणारा हा मार्ग जंगलातुन व कारवीच्या रानातुन जात असल्याने रस्ता चुकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या भटकंतीसाठी वाटाड्या घेणे गरजेचे आहे.
© Suresh Nimbalkar