मदगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : ९७० फुट

श्रेणी : मध्यम

निसर्गाने सौंदर्याचे भरभरून दान कोकणाच्या पदरात टाकले आहे. माडांची बने,सोनेरी वाळु व निळाशार समुद्र अशा सौंदर्याने नटलेल्या कोकणात येऊन येथील निसर्गाच्या प्रेमात न पडलेला पर्यटक विरळाच. अशा या नितांत सुंदर कोकणातील बरेच किल्ले काळाच्या प्रवाहात नष्ट झाले असुन काही किल्ल्यांचे अवशेष शिल्लक असले तरी ते किल्ले मात्र विस्मृतीत गेले आहेत. मदगड हा असाच विस्मृतीत गेलेला एक किल्ला.श्रीवर्धन तालुक्यात बोर्लीपंचायतन येथे दिवेआगार समुद्रकिनारी जंगलांनी वेढलेल्या वांजळे गावात एका लहान टेकडीवर असलेला हा किल्ला आजही आपल्या अंगाखांद्यावर किल्ल्याचे अवशेष बाळगून असला तरी या किल्ल्याबाबत असलेल्या अपुऱ्या माहितीमुळे कोणीही या किल्ल्याकडे फिरकत नाही. चारही बाजुंनी घनदाट जंगलांनी वेढलेल्या वांजळे गावामागील टेकडीवर मदगड किल्ला आजही ठामपणे उभा आहे. मुंबईहुन इंदापुर-माणगाव-म्हसळा-बोर्लीपंचायतन मार्गे १८० कि.मी. अंतरावर असलेला हा किल्ला दिवेआगार पासुन फक्त ८ कि.मी. अंतरावर आहे. ... वांजळे गावात आल्यावर गावामागे भगवा झेंडा असलेली झाडीने भरलेली मदगडची टेकडी नजरेस पडते. किल्ल्यावर पाण्याची सोय नसल्याने गावातुन पाणी भरुन घेऊन नंतर या झेंडयाच्या दिशेने किल्ला चढाईस सुरवात करावी. काही स्थानिक तरुणांनी संस्थेचा फलक न लावता अतिशय सुंदर रीतीने या किल्ल्याचे संवर्धन केलेले आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी जागोजागी दिशादर्शक बाण लावुन पायवाट तयार केली आहे. मातीचा घसारा असलेली हि पायवाट सहजपणे चढण्यायोग्य बनवली आहे. या वाटेने गावामधुन अर्ध्या तासात एका उध्वस्त बुरुजावरून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. होडीच्या आकाराचा माथा असलेला हा किल्ला साधारण २ एकर परिसरावर पसरलेला असुन किल्ल्याची समुद्रसपाटी पासुन उंची ९२० फुट आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच खडकात खोदलेले पण दगडी चिऱ्यानी बांधलेले बुजलेले पाण्याचे टाके दिसुन येते. सध्या या टाक्याच्या संवर्धनाचे काम चालु आहे. टाक्याकडील पायवाटेने सरळ पुढे जाताना काही वास्तुंचे अवशेष तसेच डावीकडे टेकडीच्या काठावर रचीव तटबंदी पहायला मिळते. या वाटेवर जागोजागी संवर्धन करताना मिळालेले दगडी अवशेष मांडुन ठेवण्यात आले आहेत. येथुन पुढे जाणारी वाट आपल्याला एका चौसोपी वाडयाच्या आवारात नेते. या वास्तुचा संपुर्ण चौथरा शिल्लक असुन हि वास्तु किल्ल्याची सदर अथवा किल्लेदाराचा वाडा असावी. या ठिकाणी भगवा झेंडा लावुन महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली आहे. वाटेच्या पुढील भागात एक भलामोठा उंच चौथरा असुन असुन या चौथऱ्यावर तीन कबर आहेत. या कबरीवर दिवा लावण्याची सोय करण्यात आली आहे. या चौथऱ्यावर एका मंदिराचे अवशेष ठेवलेले आहेत. चौथरा पाहुन सरळ पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या दुसऱ्या टोकास पोहोचतो. या ठिकाणी एका विहिरीचे अवशेष पहायला मिळतात. संवर्धन करताना केवळ या वास्तुवरची झाडी साफ केल्याने आज हे सर्व अवशेष पहायला मिळतात. याशिवाय इतरही लहानमोठे चौथरे व एक बुजलेले टाके पहायला मिळते. किल्ल्याच्या इतर भागात मात्र आजही मोठया प्रमाणात झाडी असुन त्यात अनेक अवशेष लुप्त झाले आहेत. मदगडावरून सभोवतालच्या श्रीवर्धन, दिघी, दिवेआगर, बाणकोट या परिसराचे सुंदर दर्शन होते. संपुर्ण किल्ला फिरण्यास पाउण तास पुरेसा होतो. मदगडचे शिवकालीन संदर्भ नसले तरी बाणकोटच्या खाडीपासून म्हसळा खाडीपर्यंत पसरलेला सागरीकिनारा व त्याजवळील प्रदेशात हा एकमेव किल्ला असल्याने टेहळणीसाठी हा महत्वाचा किल्ला असावा. संभाजी राजांच्या मृत्युनंतर मदगड सिद्दीच्या ताब्यात गेला पण जुन १७३३ मध्ये मराठयांनी गड पुन्हा स्वराज्यात आणल्याचे उल्लेख येतात. डिसेंबर १७६९ मध्ये राघोजी आंगरे व सिद्धी यांच्या चकमकीत हा किल्ला पेशव्यांनी जंजिरेकरांना दिला. २३ मार्च १७७० मध्ये अब्दुल रहिमखान सिद्दीने किल्ल्याचा ताबा पुन्हा पेशव्यांना दिला. १७ व्या शतकात किल्ला सिद्धीच्या ताब्यात असताना १७७२ साली श्रीमंत रमाबाई पेशवे हरिहरेश्वरला देवदर्शनासाठी आल्या असता त्यांच्या सन्मानार्थ किल्यावरुन तोफांची सलामी देण्यात आली व त्यांना हत्तीवरून नजराणा पाठविण्यात आला असा उल्लेख पेशवे दप्तरात येतो. सन १८३० च्या सुमारास जंजिरेकर सिद्दी मोहम्मद खाननी हा किल्ला उध्वस्त केला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!