मढ / वर्सोवा

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : मुंबई

उंची : 0

श्रेणी : सोपी

पश्चिम रेल्वेवर असलेल्या मढ-मार्वे समुद्रकिनारा मुंबईकरांना चांगलाच परिचयाचा आहे. मढ गाव मालाड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला साधारण १४ कि.मी. अंतरावर समुद्रकिनारी वसलेलं आहे. या मढ गावाबाहेर एका लहानशा टेकडीवर वर्सोवा किंवा मढचा किल्ला बांधलेला आहे. मढ परीसरात एकुण मढ कोट, वर्सोवा किंवा मढचा किल्ला, एरंगल बुरूज व अंबोवा बेटावरील बुरुज असे एकुण ४ कोट आहेत. यातील मढचा किल्ला आजही आपल्या गतवैभवाची साक्ष देत आपले अस्तित्व जपून आहे. किल्ला नौदलाच्या ताब्यात असुन येथे सर्वसामान्य जनतेला प्रवेशास बंदी आहे परंतु किल्ला बाहेरच्या बाजूने पहाता येतो. आज मुंबईच्या सर्व किल्ल्यांमधील हा सर्वात सुंदर किल्ला आहे. किल्ल्याची संपूर्ण तटबंदी व बुरुज शाबूत आहेत. मालाड पश्चिमेहून सुटणाऱ्या बेस्टच्या २७१ क्रमांकाच्या बसने १५ कि.मीवरील मढ गावात जाता येते. ... मालाडहुन मढ गावात मासळीबाजार थांब्यावर उतरुन पुढे हरबादेवी मंदिराकडून उजव्या बाजूला व अंधेरीवरून बोटीने आल्यास डाव्या बाजूला किल्लेश्वर महादेव मंदिराकडे चालत गेल्यास आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूस पोहचतो. किल्ल्याकडे जाणारा रस्ता डांबरी असुन वाटेच्या दोन्ही हाताला गर्द झाडी आहे. या झाडीचे निरीक्षण करत गेले असता या झाडीत उजव्या बाजुला दोन विहीरी दिसून येतात त्यातील एका विहीर पक्क्या बांधणीची आहे तर एक विहीर पावसाळी पाण्याच्या साठवणीची आहे. किल्लेश्वर मंदिर चांगलेच ऐसपैस असून किनाऱ्यालगतच आहे. या शिवमंदिरापाठी वेसाव्याच्या किल्ल्याची तटबंदी व बुरूज नजरेस पडतात. वर्सोवा ते मढ यांच्या मधोमध अंदाजे हजार ते बाराशे फुटाची छोटी खाडी आहे. या खाडीच्या मुखावर सोळाव्या शतकाच्या सुरवातीस पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला. किल्ल्याच्या दोन बाजुस समुद्र असुन उर्वरीत दोन बाजुस जमीन आहे. पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा उपयोग वर्सोवा/मार्वे खाडीवर नजर ठेवण्यासाठी केला तर ब्रिटीशांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणुन झाला. (आता याचा वापर छायाचित्रणासाठी केला जातो.) महादेव मंदिराच्या मागच्या बाजूने एक पायवाट किल्ल्याच्या तटबंदीजवळ जाते. येथे काही नवीन व काही जुनी पोर्तुगीजकालीन बांधकामे पाहण्यास मिळतात. ह्या पायवाटेने तटबंदी व बुरुजांच्या कडेने आपण किल्ल्याला बाहेरुन फेरी मारु शकतो. किल्ला सशस्त्र दलाच्या ताब्यात असल्यामुळे परवानगी शिवाय किल्ला आतून पहाता येत नाही तसेच छायाचित्रणास मनाई आहे. किल्ल्याचे बुरूज गोलाकार व उंच असून भव्य आहेत. तटबंदीही मजबूत असून तिची उंची वीस ते पंचवीस फुटापर्यंत आहे. तटबंदीवर ठरावीक अंतरावर ठिकठिकाणी तोफांसाठी कोनाडे केलेले आहेत पण आत जाता येत नसल्याने येथे तोफा आहेत की नाही हे समजण्यास मार्ग नाही. किल्ल्याच्या तट व बुरुजांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर जंग्यांची रचना करण्यात आलेली आहे. किल्ल्याला एकुण दोन दरवाजे असुन समुद्राकडील बाजूस असणारा दरवाजा सध्या दगडांनी बंद केलेला आहे. या दरवाजावर एक नागशिल्प कोरलेले आहे. किल्ल्याच्या तटबंदीलगत खालच्या बाजूने गोलाकार वळसा पूर्ण करून थोडासा उंचवटा चढून आपण वर्सोवा किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारासमोर येतो. जमिनीकडील हे प्रवेशद्वार बंद करुन उजव्या हाताच्या बुरुजातूनच किल्ल्यात जाण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत. पण येथे लोखंडी दरवाजा लावून दरवाजाला टाळे ठोकले आहे. किल्ल्यासमोरच प्रशस्त पटांगण आहे. या पटांगणावर ताड वृक्षाची मोठमोठी झाडं आहेत. किल्ला पाहण्यास अर्धा तास पुरेसा होतो. याशिवाय मढ गावात दुसऱ्या एका टेकडीवर हरबादेवीचे मंदिर असुन त्यातील काही पुरातन मुर्ती प्रेक्षणीय आहेत. मढ म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यातील साष्टी बेटाचं दक्षिण टोक. या बेटात सहासष्ट गावं होती म्हणून सासष्टी व त्याचा अपभ्रंश साष्टी असा झाला. माहीम/वर्सोवा खाडीमुळे मुंबई बेटे मुख्य जमिनीपासून वेगळी झाली होती. या खाडीमार्गे चालणाऱ्या व्यापारामुळे इतिहासात ह्या भागाला खुप महत्व होते. पोर्तुगीज व ब्रिटिश यांच्यामध्ये असलेल्या व्यापारी स्पर्धेमुळे त्यांच्यातली तेढ मूळ धरून होती. त्यामुळे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या साष्टीचं मुख्य समुद्रावरून होणा-या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी टेहळणीसाठी बेटाच्या समुद्रात शिरलेल्या भूशिरावर १६०० साली मढचा किल्ला बांधून ह्या भागाच्या रक्षणाचा कायमचा बंदोबस्त केला. पुढे याचा उपयोग ब्रिटीशांच्या ताब्यातील मुंबई बेटांना शह देण्यासाठी झाला. १७३७साली मराठ्यांच्या वसई आक्रमणाच्या वेळी या किल्ल्याभोवती बरीच आरमारी युद्धं झाली. खंडोजी मानकर या चिमाजी आप्पांच्या सरदाराने या किल्ल्यावर १७३७ साली दोन वेळा हल्ला चढवल्याची नोंद आढळते. यावर्षी पूर्ण साष्टी जिंकूनही वांद्रे व वेसावे हे किल्ले मराठ्यांना जिंकता आले नाहीत पण १७३९ सालच्या स्वारीत मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. वसई मोहिमेत हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातुन उच्चाटन झाले. नंतरच्या काळात किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!