मंदाकिनी पर्वत

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पालघर

उंची : ८५० फुट

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्रातील अनेक डोंगरांवर देवतांची मंदीरे असुन काही ठिकाणी मंदिर असलेल्या या डोंगरांचे गड असे नामकरण करण्यात आले आहे. मुळात गड म्हणजे किल्ला अथवा डोंगरावर लष्करी ठाणे असलेले ठिकाण पण असे न घडता काही ठिकाणांना सरसकट गड म्हणुनच संबोधले जाते. यात खासकरून देवतांची मंदीरे असलेली ठिकाणे येतात. पण अलीकडील काळात डोंगरावर जरा काही वास्तु अवशेष दिसले कि ते डोळसपणे न पारखता गड म्हणुन संबोधण्याचा प्रघात सुरु झाला आहे. वज्रेश्वरी जवळ असणारा मंदाकिनी पर्वत नावाने ओळखला जाणारा डोंगर याचे एक उदाहरण. हा गड नसुन डोंगर आहे हे सांगण्यासाठी या लेखाचा खटाटोप केलेला आहे. वज्रेश्वरी मार्गावरील आकलोली येथे जाणाऱ्या रस्त्यावर केळठण गावाच्या हद्दीत मंदाकिनी पर्वत येतो. दुर्गप्रेमींनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे हा कोणत्याही प्रकारचा गड अथवा किल्ला नसुन एक नैसर्गिक गुहा व चिरे काढल्याने निर्माण झालेले पाण्याचे टाके असलेले ठिकाण आहे. कोणत्याही प्रकारचा ऐतिहासिक अथवा कागदोपत्री पुरावा नसलेल्या या डोंगराचा अलीकडील काळात काही हौशी लोकांनी गड म्हणुन उल्लेख केला आहे. ... इतिहासात कोठेही या किल्ल्याचा उल्लेख दिसुन येत नाही पण काहीही प्रमाण नसलेल्या कथा या डोंगराला चिटकवल्या जात आहेत. वज्रेश्वरीजवळ गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिध्द असलेल्या आकलोली जवळ असलेला हा डोंगर भिवंडीपासुन २० तर विरारपासून ३० कि.मी.अंतरावर आहे. गावातुन डोंगरावर जाण्यासाठी मळलेली वाट असुन एकदा का ओढा पार करून वाटेला लागलो कि चुकण्याची शक्यता नाही. डोंगराच्या सोंडेवरील उभा चढ चढून माथ्याखाली आल्यावर हि पायवाट उजवीकडे वळते. थोडे पुढे आल्यावर हि वाट डावीकडे वळुन दरीच्या दिशेने उतरत जाते. दरीच्या या उतारावर दोन ठिकाणी अलीकडच्या काळात १०-१२ पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. या पायऱ्या उतरून आपण घळीत असलेल्या नैसर्गीक गुहेजवळ पोहोचतो. या गुहेत जंगली प्राणी जाऊ नये यासाठी तोंडावर बांधकाम करून लोखंडी जाळीचा दरवाजा बसवलेला आहे. साधारण ५० फुट लांब असलेली ही गुहा आतील बाजूस निमुळती होत गेली आहे. डोंगरातून पाझरणारे पाणी या गुहेत साठते व साधारण मार्च महिन्यापर्यंत ते पिण्यासाठी उपलब्ध असते. गुहेत सुरवातीस नित्यानंद स्वामींची मूर्ती व शिवलिंग मांडलेले आहे. स्थानीक लोक या गुहेला देवदार गुहा म्हणुन ओळखतात. डोंगराचा दुसरा भाग या गुहेसमोर असुन समोरील चढाव चढून गेल्यावर आपण लहानशा सपाटीवर पोहोचतो. या ठिकाणी काही घडीव चिरे पसरलेले आहेत. येथुन डोंगराच्या दुसऱ्या टोकाच्या दिशेने सरळ गेल्यावर कातळात कोरलेले लहान टाके असुन टाके कोरताना निघालेले चिरे त्याच्या काठावर रचलेले आहे. डोंगरावर संरक्षणदृष्ट्या केलेले कोणतेही काम दिसुन येत नाही. या भागातील हा उंच डोंगर असल्याने येथुन खूप दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो पण या डोंगरावर कोणत्याही प्रकारचे किल्लेवजा अथवा सरंक्षणदृष्टया केलेले बांधकाम दिसुन येत नाही.येथुन दूरपर्यंत दिसणारा प्रदेश या डोंगराचे महत्व अधोरेखित करतो पण येथे कोणताही किल्ला नाही. सकाळी लवकर सुरवात केल्यास मंदाकिनी डोंगर फिरण्यासाठी अर्धा दिवस पुरेसा होतो. टीप – हा केवळ एक पाण्याचे टाके व नैसर्गिक गुहा असलेला डोंगर असुन याला गड/किल्ला म्हणुन संबोधणे योग्य नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!