मंगळगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : २४५० फुट

श्रेणी : मध्यम

महाड शहराला सातव्या शतकापासूनचा वैभवसंपन्न इतिहास आहे. महाहट्ट म्हणजेच मोठी पेठ या पाली शब्दाचा अपभ्रंश होत पुढे महाड हे नाव झाले. महाड ही या परिसरातील मोठी बाजारपेठ होती. सावित्री नदीच्या मार्गाने याठिकाणी गलबतातुन मोठया प्रमाणात व्यापार चालत असे. महाडात उतरलेला माल भोपघाट, वरंध घाट व अस्वलखिंड या घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांत जात असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी किनारपट्टीवर दौलतगड,सोनगड,महेंद्रगड हे किल्ले तर घाट मार्गावर चंद्रगड मंगळगड या सारख्या किल्ल्यांची साखळी निर्माण केली गेली. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची निवड केल्यावर रायगडाच्या प्रभावळीत घाटमाथ्यावरून कोकणात उतरणाऱ्या वाटांवर असलेल्या कोकणदिवा, मंगळगड यासारख्या किल्ल्यांना राजधानीच्या संरक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्व प्राप्त झाले. या किल्ल्यांच्या साखळीमुळे शत्रुला राजधानीपर्यंत सहज पोहोचणे कठीण होते. ... घाटमार्गावर असलेल्या किल्ल्यांपैकी मंगळगड उर्फ कांगोरीगड जावळीच्या खोऱ्यातील एका उंच डोंगरावर वसलेला आहे. या गडाची निर्मिती नेमकी कोणत्या काळात झाली हे लिखीत स्वरुपात नसले तरी जावळीचे चंद्रराव मोरे यांनी या किल्ल्याची उभारणी केल्याचे सांगितले जाते. कोकणात उतरणाऱ्या वाटेवरील रायगडचा उपदुर्ग असलेला हा किल्ला टेहळणीसाठी एक महत्वाचा किल्ला होता. महाड तालुक्यात असलेल्या मंगळगडला भेट देण्यासाठी महाड भोर मार्गावरील ढालकाठी गाव गाठावे. या गावातुन उजवीकडे वळणारा रस्ता किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पिंपळवाडी गावात जातो. महाडपासून हे अंतर २५ कि.मी. आहे. पिंपळवाडी गावातील गोगावलेवाडी येथुन एक कच्चा रस्ता किल्ल्याखालील टेकडीवर असलेल्या विस्तीर्ण पठारावर जातो. या टेकडीमुळे गोगावले वाडीतुन किल्लादर्शन होत नाही. गोगावले वाडीत असलेल्या सिध्देश्वर मंदिराच्या मागील बाजूस विरगळ व प्राचीन मुर्ती पहायला मिळतात. वाडीतून टेकडीच्या पठारावर जाण्यास अर्धा तास लागतो. हा रस्ता पठारावर जेथे संपतो त्या ठिकाणी किल्ला असलेल्या डोंगराची सोंड उतरली आहे. कच्चा रस्ता बांधताना हि सोंड काही प्रमाणात तोडली असल्याने सोंडेवर चढणारी वाट लगेच लक्षात येत नाही. या सोंडेवरून चढायला सुरवात केल्यावर समोरील डोंगरावर डाव्या बाजुला कांगोरी देवीचे मंदीर व समोर टोकावरील बुरुज दिसतो. या बुरुजाच्या दिशेने चढत गेल्यावर वाटेत छोटासा दगडांचा टप्पा पार करत आपण बुरुजाखालील कातळ टप्प्यावर पोहोचतो. या टप्प्यावर चढताना एका ठिकाणी कातळात कोरलेल्या चार-पाच पायऱ्या दिसुन येतात. हा चढ चढुन आपण बुरुजाखालील टप्प्यावर येतो. येथुन डावीकडे जाणारी वाट आपल्याला उभा चढ चढत गडाच्या दरवाजात घेऊन जाते. या वाटेवर मोठया प्रमाणात झाडे असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नाही. वाटेवर काही ठिकाणी तुटलेले लोखंडी कठडे दिसतात. बुरुजाखालुन अर्ध्या तासात उध्वस्त पुर्वाभिमुख दरवाजाच्या अवशेषातुन आपला गडात प्रवेश होतो. गड समुद्रसपाटीपासून २२९५ फुट उंचावर असुन गडाचा परीसर ९ एकरमध्ये पुर्व-पश्चिम पसरला आहे. दरवाजाच्या खालील बाजूस दहाबारा पायऱ्या बांधलेल्या असुन दरवाजा शेजारील बुरुज व तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहेत. गडाचा विस्तार बऱ्या‌पैकी असुन डावीकडे गडाची माची तर उजवीकडे बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यावर जाण्याआधी माचीचा भाग फिरून घ्यावा. माचीच्या उंच भागात कांगोरी देवीचे मंदीर असुन या मंदिराकडे जाताना वाटेच्या उजव्या बाजुला पायऱ्या असलेले खडकात खोदलेले टाके पहायला मिळते. या टाक्याच्या पुढे वाटेवरच दुसरे टाके असुन या टाक्याजवळ किल्ल्यावरील झीज झालेल्या अनेक मुर्त्या ठेवल्या आहेत. कांगोरी देवीचे मंदीर उंचवट्यावर असल्याने १२ पायऱ्या चढल्यावर गोलाकार कमानीतुन आपला मंदिरात प्रवेश होतो. मंदिराची गर्भगृह व सभामंडप अशी रचना असुन सभामंडपावरील छत कोसळलेले आहे. गाभाऱ्यात काळभैरव व कांगोरीदेवीच्या मुर्तीबरोबर अजुन दोन दगडी मूर्त्या असुन गाभाऱ्याबाहेर काही भग्न दगडी मुर्ती ठेवल्या आहेत. मंदीरासमोर लहानशी दीपमाळ आहे. मंदिरात दरवर्षी यात्रा भरत असल्याने गावकऱ्यानी मंदिरात स्वयंपाकाची भांडी ठेवली आहेत. गडावर रहायचे झाल्यास पावसाळा सोडुन येथे रहाता येईल. मंदिरामागे असलेली छोटी माची तटबंदीने बांधुन काढली असुन या तटबंदीत मंदिराशेजारी दोन्ही बाजुला दोन बुरुज व टोकाला अर्धगोलाकार बुरुज पहायला मिळतो. मंदिरामागुन खाली उतरणारी पायवाट थेट माचीच्या टोकाशी असलेल्या या बुरुजावरील ध्वजस्तंभापर्यंत जाते. माचीच्या या टोकावरुन जावळीच्या खोऱ्यातील दूरवरच्या प्रदेशावर नजर ठेवता येते. माचीचा हा भाग पाहुन झाल्यावर मुख्य दरवाजाकडे येऊन उजवीकडील वाटेने माचीपासून उंचावलेल्या बालेकिल्ल्याकडे निघावे. बालेकिल्ल्याची सुरुवातीची वाट अत्यंत निमुळती असुन एकावेळी एकच माणूस जाऊ शकतो. या वाटेने पाच मिनिटात घसाऱ्याच्या वाटेने आपण बालेकिल्ल्याखाली असलेल्या सर्वात मोठया टाक्यापाशी येऊन पोहोचतो. येथुन वर जाणारी वाट बालेकिल्ल्याच्या टोकावर जाते तर उजवीकडील वाट बालेकिल्ल्याला वळसा मारत उत्तर दिशेला बालेकिल्ल्याच्या पोटात असलेल्या पाण्याच्या टाक्याकडे जाते. येथे खडकात खोदलेली दोन खांबटाकी असुन यातील एका टाक्यांत वर्षभर पिण्यायोग्य पाणी असते. खांबटाकी पाहुन आल्या वाटेने पुन्हा आधीच्या टाक्याकडे यावे व तेथुन थोडासा चढ चढून बालेकिल्ल्याकडे जावे. बालेकिल्ल्यावर चढून गेल्यावर दोन वास्तुंचे अवशेष दिसतात. यात एक वाड्याचा चौथरा असुन दुसऱ्या वास्तुच्या पडक्या भिंती शिल्लक आहेत. या भिंती आठ ते दहा फुट असून त्यात एक खिडकी असलेली दिसते. चौथऱ्याच्या अलीकडे एक उंचवटा असुन या उंचवट्यावर दोन घडीव शिवलिंग आहेत. शिवलिंगापासून काही अंतरावर भग्न झालेला नंदी पहायला मिळतो. या नंदीला लागुन एक मुर्ती ठेवलेली आहे. येथुन थोडे खालच्या बाजूस उतरून गेल्यावर आपण चढून येताना दिसत असलेल्या बुरुजाच्या टोकाशी जाऊन पोहचतो. हा बुरुज २०-२५ फुट उंच बांधकाम करून बांधला आहे. या बुरूजाच्या खाली दोन लहान सुळके असुन स्थानिक लोक त्यांना नवरानवरीचे सुळके म्हणतात. गडावरुन मकरंदगड, प्रतापगड, रायगड, लिंगाणा हे किल्ले व रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वरचे पठार पहायला मिळते. पायथ्यापासुन गडावर येण्यास २ तास तर संपुर्ण गड फिरण्यास १ तास पुरेसा होतो. बालेकिल्ला उतरुन माचीवर आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. जानेवारी १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतल्यावर कांगोरीगड, वासोटा,ढवळगड, रायरी हे किल्ले स्वराज्यात सामील झाले. कांगोरीगडाची दुरुस्ती करुन शिवाजी महाराजांनी त्याचे नाव मंगळगड ठेवले. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगडास वेढा पडला असता तेथील खजीना प्रथम कांगोरीगड येथे हलवून नंतर पन्हाळा येथे नेण्यात आला. मार्च १६८९ मध्ये झुल्फीकारखानाने रायगडची नाकेबंदी करताना आजूबाजूचे किल्ले ताब्यात घेतले त्यावेळी मंगळगड मोगलांच्या ताब्यात गेला. इ.स १६९० मध्ये रामचंद्रपंत अमात्य यांनी मंगळगड जिंकून घेतला. राजधानी रायगडच्या जवळ असल्यामुळे मंगळगडचा उपयोग राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला गेला. इ.स.१८१७ मध्ये सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजीमेंट मधील कर्नल हंटर व मॉरीसन या इंग्रज अधिकाऱ्यांना अटक करुन मंगळगडावर कैदेत ठेवले होते. मे १८१८ मध्ये इंग्रजांनी रायगडला वेढा दिला असता मंगळगडावरून एक तुकडी रायगडाच्या संरक्षणासाठी आली असता बिरवाडीजवळ तिची इंग्रज सैन्याबरोबर लढाई झाल्याचा उल्लेख आढळतो. इ.स. १८१८ मध्ये रायगडच्या पराभवानंतर कर्नल प्रोर्थर या इंग्रज अधिकाऱ्याने हा किल्ला ताब्यात घेतला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!