भैरवगड-सातारा

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सातारा

उंची : २९२० फुट

श्रेणी : कठीण

सुमारे दोन हजार वर्षापूर्वीपासून दळणवळणासाठी कोकणातून घाटावर जाणाऱ्या घाटवाटा सह्याद्रीच्या कडेकपारीत अनेक ठिकाणी आढळतात. तत्कालीन राजांनी व्यापारासाठी या वाटांवर घाटरस्ते तयार केले व नंतरच्या काळात या घाटवाटांच्या रक्षणासाठी सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर गड किल्यांचे साज चढले. सारा सह्याद्री टप्प्या-टप्प्यांवरील गडकोटांनी सजला. यातील एक किल्ला म्हणजे गर्द जंगलाने वेढलेला वनदुर्ग भैरवगड. महाराष्ट्रात एकुण पाच भैरवगड आहेत. त्यातील सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात असलेला भैरवगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेशी एका लहानशा पायवाटेने जोडलेला आहे. सह्याद्रीच्या या रांगेवर वासोटा, प्रचितगड,पाली किल्ला, जुंगटी किल्ला, जंगली जयगड आणि भैरवगड अशी दुर्गसाखळी पहायला मिळते. भैरवगडावर जाण्यासाठी अनेक वाटा असल्या तरी घाटावरून पाथरपुंज येथुन तर कोकणातील पाते येथुन गडावर जाण्यासाठी दोन मुख्य वाटा आहेत. पहिला मार्ग सातारा-पाटण-गोवारे-पाथरपुंज-भैरवगड असा गाडीमार्ग असुन हे अंतर ९० कि.मी.आहे. ... यातील शेवटचा १५ किमी.रस्ता अभयारण्य असल्याने कच्चा असुन केवळ जीपसारखे वाहन या रस्त्याने जाऊ शकते. २०१२ साली भैरवगड अभयारण्य व्याघ्रप्रकल्प घोषित झाल्याने हेळवाकहून पाथरपुंज- भैरवगडकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर वनखात्याने चौकी बसवलेली असुन आत प्रवेश करण्यासाठी कडक नियम बनवले आहेत. अभयारण्यात प्लास्टिक वस्तू नेण्यास मनाई असुन या ठिकाणी प्रती व्यक्ती ३० रुपये वाहनाचे १५० रुपये व वाटाड्याचे ३०० रुपये असे प्रवेश शुल्क भरल्यावर आत प्रवेश दिला जातो. या वाटेने वाहनाने आपण थेट भैरवनाथ मंदीराकडे पोहोचतो. भैरवनाथ मंदीर व भैरवगड हि दोन्ही ठिकाणे अभयारण्यात असल्याने येथे राहण्यासाठी सक्त मनाई असुन संध्याकाळी ५ नंतर अभयारण्यात थांबल्यास मोठा दंड आकारला जातो. पावसाळा व काही ठरावीक दिवशी अभयारण्यात प्रवेश दिला जात नाही. गडावर येणारी दुसरी वाट कोकणातील पाते या पायथ्याच्या गावातुन थेट भैरवनाथ मंदिराकडे वर चढते. चिपळूण-आसुर्डे-तळवडे-गोवळपाते असा गाडीमार्ग असुन हे अंतर ४५ कि.मी.आहे. यातील शेवटच्या टप्प्यातील ४ कि.मी.रस्ता कच्चा असुन उजवीकडील रस्ता गोवळ गावात तर डावीकडील रस्ता पाते गावात जाते. पाते गावापर्यंत जाण्यासाठी चिपळूणहुन एसटीची सोय आहे. पाते गावात असलेल्या हनुमान मंदिरात राहण्याची सोय होते. या मंदिराच्या आवारात आपल्याला अर्धी तुटलेली तोफ पहायला मिळते. पाते गावातुन पायऱ्यांची वाट तासाभरात आपल्याला भैरवगडाखाली असलेल्या पठारावर आणुन सोडते. पुढे खड्या चढणीच्या वाटेने १ तासात आपण दरीच्या काठावर असलेल्या प्रशस्त भैरवनाथ मंदिरासमोर पोहोचतो. पाते गावातुन इथवर येण्यास २ तास पुरेसे होतात. कधीकाळी कौलारू असलेल्या या पुरातन मंदिराने आता सीमेंट-कॉन्क्रीटचे रूप धारण केले आहे. या भैरवनाथा मुळेच हा गड भैरवगड म्हणुन ओळखला जातो. मंदिरात दोन गाभारे असुन एका गाभाऱ्यात कालभैरव व जोगेश्वरी देवीची मुर्ती असुन दुसऱ्या गाभाऱ्यात विठलाई,लक्ष्मी व वाघजई देवीची मुर्ती आहे. काळ्या पाषाणात घडवलेल्या या मुर्ती साधारण २.५ ते ३ फुट उंच आहेत. मंदिराच्या आवारात एक लहान तुळशीवृंदावन असुन मंदिराच्या उजव्या बाजुला दुर्गप्रेमी शिवभक्तांनी एका खडकावर शिवरायांचा छोटा धातुचा पुतळा उभारला आहे. वनखात्याच्या कारवाईस सामोरे जाण्याची तयारी असल्यास या मंदिरात ३०-४० जण सहज राहू शकतात. वन्यजीवांचा येथे मोठया प्रमाणात वावर असल्याने बाहेर थांबणे धोकादायक आहे. नीलगाई व गवे येथे सहजपणे दर्शन देऊन जातात. मंदिराच्या मागे कोकणातील दुर्गवाडी गावात उतरणारी वाट असुन या वाटेने काही अंतर खाली आल्यावर एक बारमाही पाणी असलेली लहान चौकोनी विहिर आहे. याशिवाय पाथरपुंजकडून मंदिराकडे येणाऱ्या कच्च्या रस्त्याने चालत गेल्यास डावीकडे दरीत उतरणारी वाट दिसते. या वाटेने काही अंतर खाली उतरल्यावर एक पाण्याचं टाकं पहायला मिळते आहे. भैरवगड किल्ला मंदिरासमोरील डोंगरावर असुन एका चिंचोळ्या धारेने सह्याद्रीच्या मुख्य रांगेला जोडलेला आहे. मंदिराच्या डाव्या बाजूने पाते गावाकडे खाली उतरणाऱ्या पायवाटेने किल्ल्याच्या डोंगरावर पोहचल्यावर एक बांधीव बुरुज दिसतो. हा बुरुज व गडाचा डोंगर याला लागुन गडाचा पहिला उत्तराभिमुख दरवाजा असावा पण आज मात्र या दरवाजाचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. येथून डोंगराला वळसा मारत पुढे आल्यावर दरीच्या काठावर बुरुज असलेला ढासळलेल्या अवस्थेतील दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजाचा आज केवळ तळातील पायाच शिल्लक आहे. या दरवाजातून पुढे आल्यावर टेकडीच्या चढावावर तिसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजा शेजारील केवळ भिंती शिल्लक असुन वरील कमान पुर्णपणे ढासळली आहे. टेकाडाला वळसा मारून जाताना वाटेच्या डाव्या बाजुस उतारावर खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे पण ते केवळ समोरच्या टेकडावर गेल्यावरच नजरेस पडते. गडाच्या मागील बाजूस गेल्यावर येथे पाण्याची दोन जोडटाकी आहेत. यातील एक टाके कोरडे पडले असुन दुसऱ्या टाक्यातील पाणी शेवाळलेले आहे. भैरवगड दोन टेकड्यांचा मिळून बनला असुन दक्षिणोत्तर पसरलेल्या या दोन्ही टेकडाना जोडणारी निमुळती खिंड आहे. या दोन्ही टेकडीचा माथा साधारण १४ एकरवर पसरलेला असुन किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून २९१० फुर आहे. या सोंडेवरील वाटेने पलीकडे पश्चिमेच्या टेकडीवर जाता येते. या वाटेवर खडक खोदुन बांधकामासाठी काढलेल्या दगडाची खाण व पाते गावात उतरणारी कड्यावरील वाट दिसते. या टेकडीचा माथा फारच लहान असुन त्याच्या माथ्यावर एक व वाटेवर एक असे दोन लहान चौथरे पहायला मिळतात. टेकडाच्या पश्चिम बाजुला डोंगरउतारावर खडकात खोदलेले अजून एक टाके पहायला मिळते. उर्वरीत अवशेष असल्यास झाडीत हरवले आहेत. हि टेकडी पाहुन पाण्याच्या जोड्टाक्याकडे आल्यावर या टाक्याच्या मागील वाटेने किल्ल्याच्या दुसऱ्या टेकडीच्या माथ्यावर जावे. या टेकडीच्या माथ्यावर बऱ्यापैकी सपाटी असुन गडाची मुख्य वस्ती याच भागात असावी कारण येथे मोठया प्रमाणात घरांची जोती दिसुन येतात. गडाचा हा माथा तटबंदीने बंदीस्त केला असुन त्यात एका वाड्याचा चौथरा व भिंती पहायला मिळतात. या टेकडीला वळसा मारून उतरताना उतारावर आजही भिंतीसकट उभी असलेली वास्तु पहायला मिळते. या वाटेने टेकडीला वळसा मारत आपण प्रवेश केलेल्या तिसऱ्या दरवाजाच्या वरील बाजुस येतो व आपली गडफेरी पुर्ण होते. गडावरून लांबवर पसरलेलं कोयनेचं दाट जंगल तसेच प्रचितगड,जंगली जयगड, वासोटा, गुणवंतगड, दातेगड हे किल्ले नजरेस पडतात. संपुर्ण गड फिरण्यास २ तास पुरेसे होतात. १२ व्या शतकात शिलाहार राजा भोज याने या किल्ल्याची बांधणी केल्याचे मानले जाते. ह्या गडाला सारंगगड असे दुसरे नाव असुन ते फारसे प्रचलित नाही. गडाचे भौगोलिक स्थान व आकार पहाता याचा वापर केवळ टेहळणीसाठी होत असावा. बहामनी काळात शिर्के घराण्याच्या ताब्यातील हा किल्ला इ.स.१४५३ मधे मलिक उत्तुजार याने घेतला. शिवाजी महाराजांनी सन १६६१ च्या सुमारास दक्षिण कोकणावर स्वारी केली असता शृंगारपुर ताब्यात घेतले. त्याच काळात भैरवगड देखील त्यांच्या ताब्यात आला असावा.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!