भैरवगड-शिरपुंजे

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नगर

उंची : ४०३५ फुट

श्रेणी : मध्यम

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणारा हरिश्चंद्रगड हा दुर्ग भटक्यांचा आवडता किल्ला. या हरिश्चंद्रगडाच्या परीसरात या किल्ल्याकडे येणाऱ्या विविध मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी प्राचीन काळी कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड (कोथळे), कलाडगड, भैरवगड (शिरपुंजे) हे किल्ले बांधले गेले. या चार गिरिदुर्गापैकी राजुरमार्गे हरीश्चंद्रगडावर येणाऱ्या वाटेवर तसेच मुळा नदीच्या खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंजे आणि कुमशेत या गावांच्या मध्ये भैरवगड हा टेहळणीचा किल्ला बांधला गेला. भैरवगडावरील भैरोबा हे स्थानिक लोकांचे दैवत असुन येथे हा गड भैरोबागड म्हणून ओळखला जातो. दरवर्षी अश्विन महीन्यात या भैरोबाची यात्रा असते. गडावरच्या भैरोबाला स्थानिक गावकऱ्याची ये-जा असल्याने गडावर जाणारी वाट बऱ्यापैकी मळलेली आहे. भैरोबागड कळसुबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या कक्षेत असल्याने व भाविक गडावर येत असल्याने वनखात्याने धोक्याच्या ठिकाणी लोखंडी कठडे बसविलेले आहेत. ... हरिश्चंद्रगडाच्या दक्षिणेला भैरवगड असुन गडाची एकुण रचना पहाता हा किल्ला हरिश्चंद्रगडाला समकालीन असावा. भैरवगडला भेट दयायला मुंबईहुन माळशेज घाटमार्गे ओतूर-बामणवाडा-कोतुळ-कोथळे-लव्हाळी-आंबीत किंवा मुंबई-घोटी– भंडारदरामार्गे राजूर- माणिकओझर-खडकी-आंबीत या मार्गाने शिरपुंजे गावात जावे लागते. शिरपुंजे गावाच्या आधी नदीवरील पुल पार केल्यावर डाव्या बाजुस एक रस्ता वर जाताना दिसतो. येथे कळसुबाई हरीशचंद्र अभायारण्य अशी पाटीही लावली असुन हा रस्ता भैरवगडाच्या पायथ्याशी जातो. या भागात वाहनांची सोय नसल्याने स्वतःचे वाहन असेल तर उत्तम शिवाय थेट गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. येथुन भैरवगडाच्या मधल्या आणि उजवीकडच्या कातळकडय़ाच्या मधोमध भैरोबाची गुहा, बाहेरचा कठडा व गुहेवर फडकणारे झेंडे दिसुन येतात. वाहनतळाशेजारी वनखात्याने सिमेंटचा निवारा बांधलेला असुन समोरच श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान, शिरपुंजे असे लिहिलेली लोखंडी कमान आहे. या कमानीपासून काही बांधीव तसेच काही कातळकोरीव पायऱ्या चढुन व तासभर नागमोडी खडी चढाई करून आपण वनखात्याने लावलेल्या लोखंडी कठड्यापाशी येतो. हे कठडे पार केल्यावर आपण भैरवगड आणि शेजारच्या घनचक्कर डोंगराच्या मधोमध असणा-या खिंडीत येतो. या खिंडीत आल्यानंतर पलीकडे आंबित गाव दिसते. आंबित गावातूनदेखील एक वाट निघून येथे याच खिंडीत येऊन मिळते. खिंडीच्या वरच्या बाजुला एक उध्वस्त टाक असुन उभा चढ असलेल्या काहीशा गोलाकार कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढुन उत्तराभिमुख असलेल्या उध्वस्त प्रवेशव्दारातुन आपला गडावर प्रवेश होतो. या दरवाजाशेजारील बुरुजाचा केवळ पाया शिल्लक असुन कड्यावर काही प्रमाणात तटबंदीचे अवशेष दिसुन येतात. भैरवगडाची उंची समुद्रसपाटीपासून साधारण ३५०० फुट असुन आटोपशीर सपाट माथा असलेला हा गड पुर्व-पश्चिम साधारण ७ एकर परीसरात पसरलेला आहे. गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला खडकात खोदलेली ४ जोडटाकी व त्याच्या पुढे एक कोरड टाक आहे. हि टाकी पाहुन पुढे न जाता मागे वळून डावीकडुन गड फिरण्यास सुरवात करावी. या बाजुस पाण्याचे एक जोडटाके असुन येथुन गडावर येणारा मार्ग नजरेस पडतो. हे पाहुन पुढे निघाल्यावर डाव्या बाजुला मोठ खांब टाक आहे. या टाक्याची रचना अभ्यासनीय आहे. सध्या या टाक्याला जलकुंभ नाव दिलेले आहे. खडकात खोदलेल्या या बंदीस्त खांब टाक्यापर्यंत जाण्याची वाटही खडकात खोदलेली असुन या टाक्यासमोर खडकात एक गुहा खोदलेली आहे. या गुहेला वरील बाजूने छप्पर घालण्याची सोय केलेली असुन टाक्याच्या वर चारही बाजुस चर खोदुन त्यातुन पावसाचे पाणी गुहेत उतरवले आहे. या गुहेत भर उन्हातही थंडावा जाणवतो. या टाक्याच्या बाजुला एक रांजण खळगा कोरलेला असुन टाक्याच्या वरील बाजुस बरेच नैसर्गिक रांजणखळगे आहेत. या वाटेने भैरोबाच्या गुहेकडे जाताना उजव्या बाजुला खडकात खोदलेला ४ टाक्याचा समुह व त्याच्या वरील बाजुस ५ टाक्याचा समुह अशी ९ टाकी दिसतात. भैरोबाच्या गुहेच्या अलीकडे उजव्या बाजुला वाटेवर एक अलीकडच्या काळात कोरलेली साडेचार फुट उंच वीरगळ आहे. पुढे गुहेच्या वर डाव्या बाजूला चारही बाजू कोरलेली एक चौकोनी उंच वीरगळ असुन या विरगळी जवळ दोन गणपतीच्या व इतर काही झिजलेल्या मुर्ती शेंदुर फासुन ठेवलेल्या आहेत. पुढे खडकात खोदलेल्या पायऱ्या उतरुन कड्यातील भैरवाच्या गुहेत जाताना बाहेर अजुन एक वीरगळ दिसते. गुहा दोन दालनांची असुन एका दालनात भैरोबाची रंगवलेली पाच फुट उंच अश्वारुढ मुर्ती व काही कोरीवकाम केलेले शीळास्तंभ आहेत तर त्याच्या शेजारच्या दालनात दहा जण राहु शकतील इतपत जागा आहे. या गुहेत एक चूल असुन काही भांडी सुद्धा ठेवली आहेत म्हणजे ट्रेकसाठी येणाऱ्या लोकांची जेवण बनवण्याची व राहण्याची सोय होऊ शकते. गुहेच्या कड्याला लोखंडी कठडे बसवले असुन त्यात एका बाजुला फाटक बसवले आहे. तेथुन खाली उतरण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या असुन त्या काही प्रमाणात तुटल्या आहेत. या पायऱ्याच्या खालील बाजुस एक १०x १२ आकाराची एक गुहा आहे. येथुन शिरपुंजे गाव आणि आजुबाजूचा परीसर दिसतो. गुहेच्या समोर थोडयाशा उंचीचा गडमाथा आहे. गुहेसमोरून डाव्या बाजुने गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे चालायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेल एक मोठ टाक पाहायला मिळत. हे टाके पाहुन आपण आधी पाहिलेल्या ५ टाक्याच्या समूहाच्या वरील बाजूस निघावे. येथे कातळात खोदलेली दोन खांबी मोठी गुहा आहे. या गुहेला दोन दरवाजे असुन एका मोठया दरवाजावर कमान कोरलेली आहे. या गुहेत पाणी साठल्याने ती एखाद्या टाक्यासारखी दिसते. गुहा पाहुन ५ मिनिटात आपण गडमाथ्यावर पोहोचतो. इथे कातळात कोरलेली पाण्याची ३ टाकी असुन एका मोठया वाड्याचे अवशेष आहेत. गडमाथ्यावरुन आसमंतात नजर टाकल्यास कळसुबाई, हरीश्चंद्रगड, कलाडगड, कुंजरगड, नाणेघाट असा खूप मोठा परीसर नजरेस पडतो.गडाच्या माथ्यावरुन आल्यावाटेने न जाता प्रवेशव्दाराच्या दिशेने उतरायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला दोन लांबलचक पाण्याची टाकी पाहायला मिळतात. ती पाहुन प्रवेशव्दाराजवळ आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गडफेरीस एक तास लागतो. गडावरील अवशेष ब पाण्याची टाकी पहाता गड नांदत असताना गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी. गडावर पाण्याच्या २३ टाक्या असल्या तरी पिण्यायोग्य पाणी फक्त दोन टाक्यात आहे. भैरवगडाचं सौंदर्य हे एकदा तरी अनुभवायला हव असंच आहे. भैरवगडचा इतिहासात उल्लेख असला तरी भैरवगड हे नाव अनेक गडांना असल्याने इतिहासात त्याचा नेमका संदर्भ लावणे कठीण जाते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!