भैरवगड-नरडवे

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सिंधुदुर्ग

उंची : २१६० फुट

श्रेणी : मध्यम

भैरव हे जनमानसात रुळलेले शिवाचे एक रूप. सामान्य जनमानसात लोकप्रिय असलेल्या या देवतेची केवळ मंदीरे बांधून पूजा केली गेली नाही तर अनेक डोंगरांना व किल्ल्यांना या देवतेचे नाव दिले गेले आणि याचमुळे आपल्याला महाराष्ट्रात भैरवगड नावाचे एक दोन नव्हे तर तब्बल सहा दुर्ग आढळतात. यातील दोन किल्ले कोकणात दोन किल्ले देशावर एक किल्ला मराठवाडयात तर एक किल्ला उत्तर कोकणात आहे. यातील सर्वात अपरिचित व दुर्गम भैरवगड म्हणजे कणकवली तालुक्यातील नरडवे येथील भैरवगड. या गडाच्या आसपासचा घनदाट जंगल पाहता हा केवळ गिरीदुर्गच नाही तर वनदुर्ग देखील आहे. नरडवे हे या किल्ल्याजवळील मोठे गाव असल्याने हा नरडवेचा भैरवगड म्हणुन ओळखला जात असला तरी गडावर जाण्याच्या वाटा दिगवळे रांजणवाडी आणि नरडवे भेर्देवाडी येथुन आहेत. कणकवली बस स्थानकातून दिगवळे रांजणवाडी येथे जाण्यासाठी बसची फारशी सोय नसल्याने नरडवे भेर्देवाडी येथुन गडावर जाणे व रांजणवाडी येथे उतरणे जास्त सोयीचे आहे. ... कणकवली ते नरडवे अंतर २६ कि.मी.असुन भेर्देवाडी तेथुन ३ कि.मी.अंतरावर आहे. भेर्देवाडी गावात शिरण्याआधी मुख्य रस्त्याला लागुनच डावीकडे एक पायवाट गडाच्या डोंगरावर जाते. गावकऱ्यांचे गडावरील भैरवनाथ मंदिरात सतत ये-जा असल्याने वाट चांगलीच मळलेली असुन कोठेही चुकण्याची शक्यता नाही. गडाची सोंड वगळता संपुर्ण वाटेवर जंगल असल्याने फारसे उनही जाणवत नाही. गडावरील पाण्याचे ठिकाण सहजपणे सापडत नसल्याने पुरेसे पाणी सोबत घेऊनच चढाईला सुरवात करावी. पायथ्यापासुन साधारण तासाभरात आपण गडाच्या सोंडेवर पोहोचतो. या वाटेवर काही ठिकाणी लोखंडी कठडे बांधले आहेत. सोंडेवरून गडासमोरच्या माचीवर पोहोचण्यास २० मिनीटे लागतात पण हा चढ चांगलाच थकवतो. वाटेच्या शेवटच्या टप्प्यात दगडी पायऱ्या बांधलेल्या असुन सुरक्षेसाठी लोखंडी कठडे उभारले आहेत. गडासमोरील माचीवर थोडीफार सपाटी असुन या ठिकाणी एखादी चौकी असावी. माचीवरून सोनगड व गड नदीचे संपुर्ण पात्र नजरेस पडते. समुद्रसपाटीपासुन २१६० फुट उंचावर असलेला गडाचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेला हा डोंगर एका लहान डोंगरधारेने सह्याद्रीशी जोडला गेला आहे. गडाचा परीसर ६-७ एकरमध्ये सामावलेला असावा. माचीवरून पाच मिनिटे चालत पुढे गेल्यावर आपण गडाच्या उध्वस्त तटबंदीत पोहोचतो. गडाला माचीपासुन वेगळे करण्यासाठी तटाबाहेर खंदक खोदलेला असुन तटबंदीचे दगड या खंदकात कोसळलेले आहेत. या तटबंदीत एक बुरुज असुन बुरुजाच्या मध्यभागी असलेला तोफेचा चौथरा व बुरुजातील मारगीरीच्या जंग्या पहायला मिळतात. या ठिकाणी गडाचा दरवाजा असावा पण सध्या त्याचे कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. येथुन पुढे जाताना वाटेच्या डाव्या बाजुस असलेल्या उंचवट्यावर चौथऱ्याचे अवशेष दिसुन येतात. चौथऱ्याच्या पुढील भागात सपाटीवर काही घराचे अवशेष आहेत. येथुन पुढे आपण गडावरील मुख्य वास्तु असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरात पोहोचतो. जुन्या मंदिराच्या पायावर नव्याने उभारलेल्या या मंदिराची मुळ रचना कायम ठेवण्यात आली असुन त्यावर चौखापी कौलारू छप्पर आहे. मंदिरात लाकडी गाभारा असुन त्यात तीन देवता तांदळा स्वरुपात विराजमान आहेत. मंदिराबाहेर एका चौथऱ्यावर जांभ्या दगडात बांधलेली १२ फुट उंचीची दीपमाळ असुन ४ फुट लांबीच्या २ तोफा स्टीलच्या गाड्यावर ठेवलेल्या आहेत. दिपमाळेच्या चौथऱ्यावर दगडी वृंदावन व काही कोरीव अवशेष ठेवलेले आहेत. मंदिरात जेवणासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी मोठ्या प्रमाणात असुन गडावर मुक्काम करण्यासाठी हे सुंदर ठिकाण आहे. पाण्याची सोय मात्र थोडी अडचणीची आहे. मंदिराच्या मागील बाजुस खाली उतरत जाणाऱ्या वाटेवर पाण्याचे टाके असुन या टाक्यात मार्च महिन्यापर्यंत पाणी असते. याशिवाय रांजणवाडीच्या वाटेवर वाघिणीचे पाणी नावाचा वर्षभर वहाणारा झरा आहे पण आम्हाला तो सापडला नाही. भैरवनाथाचे दर्शन घेऊन आपण आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करायची. दिपमाळेच्या पुढील भागात एक उध्वस्त चौथरा असुन या चौथऱ्यावर लहान हनुमान मुर्ती आहे. हि मुर्ती अलीकडील काळातील असावी. मंदिराकडील वाटेने पुढे निघाल्यावर डावीकडे झाडीत एक मोठा चौथरा व उध्वस्त बांधकाम पहायला मिळते. या ठिकाणी किल्लेदाराचा वाडा अथवा गडाची सदर असावी. येथुन वाटेतील २-३ उध्वस्त चौथरे पहात पुढे गेल्यावर आपण गडाच्या उत्तर दिशेला असलेल्या उध्वस्त तटबंदीजवळ पोहोचतो. या ठिकाणी एक मोठा बुरुज असुन त्यावर मोठमोठी झाडे वाढलेली आहेत. या ठिकाणी कधीकाळी दरवाजा असल्याच्या खुणा ठळकपणे जाणवतात. पायऱ्यांची हि वाट तटबंदीला वळसा घालत खाली असलेल्या सोंडेवर उतरत जाते. हि सोंड सह्याद्रीच्या डोंगररांगाना भिडली आहे. या ठिकाणी आपली एक तासाची गडफेरी पुर्ण होते. येथुन आल्यामार्गे परत फिरावे किंवा सोंड उजवीकडे ठेऊन डावीकडे गेल्यास उतरत जाणारी वाट तासाभरात आपल्याला दिगवळे रांजणवाडीत घेऊन जाते. या वाटेच्या तळातील भागात १००-१५० सिमेंटच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. रांजणवाडीत दिवसभरात ४ एस.टी बस येतात अन्यथा खाजगी रिक्षाने कनेडी गाव व तेथुन कणकवलीला जाता येते. शिवकाळात या गडाचा उल्लेख येत नसला तरी परिसरातील नरडवे व घोटगे घाट पहाता या घाटांच्या टेहळणीसाठी हा दुर्ग पुर्वीपासून अस्तित्वात असावा. फोंड सावंत (१७०९-३८ ) हा किल्ला बांधल्याचे सांगीतले जाते पण त्याला कागदोपत्री आधार नाही. करवीरकर व सावंतवाडीकर यांच्या सततच्या कुरबुरीत सावंत नेहमी भैरवगड व सोनगड या किल्ल्यास उपद्रव करत पण एप्रिल १७८२ मध्ये रांगण्याचा वेढा उठवल्यावर सावंतानी या किल्ल्यास उपद्रव होणार नाही असे वाचन दिले. सन १८२२ मध्ये सोनगड व भैरवगड या किल्ल्यांचा तनख्याचा निकाल ब्रिटीश सरकारने करवीरकरांच्या बाजूने दिला. इ.स.१८४२ आबाजी सदाशिव गडाचे सबनीस तर मुंजाजी जाधव यांची किल्लेदार म्हणुन नेमणुक होती. यानंतरच्या काळात गडाची कोठेही नोंद दिसुन येत नाही. सन १८६२च्या पहाणीत या गडावरील सर्व अवशेष नष्ट झाल्याचे नोंदले आहे म्हणजे १८४४ मधील करवीर मधील गडकऱ्यांच्या उठावात इंग्रजांनी बहुदा या किल्ल्यावरील वास्तुची तोडफोड केली असावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!